24 November 2017

News Flash

जीवचित्र : टोरी नो  ई !

जपानची संस्कृती ही खूप जुनी असल्याने चित्रप्रकारातदेखील वैविध्य दिसतं.

श्रीनिवास आगवणे | Updated: July 16, 2017 12:57 AM

जपानची संस्कृती ही खूप जुनी असल्याने चित्रप्रकारातदेखील वैविध्य दिसतं.

काही दुष्ट पालकांचा अपवाद वगळल्यास आपल्याला ‘शिन चॅन व डोरेमॉन’ ही धम्माल कार्टून पाहता येतात. नाहीच तर कुंफुपांडा, सामुराई-निन्जा, जॅकी चॅन वगैरेंमुळे जपान या देशाची, तिथल्या संस्कृतीची ओळख झालीच असेल. काय एकेक नावं असतात यांची.. ब-टाटा, ट-माटा , कामा-ची, उपा-शी अर्रर्रर्रर्र!

म्हणून असेच ‘पक्षी’ शब्दाचे गुगल ट्रान्सलेशन करून पाहिलं तर ‘टोरी’आलं. केलेलं भाषांतर हे किती योग्य आहे ते जापनीज देवच जाणे. असो. पण ‘चित्रा’ला ते लोक फक्त ‘ई’ बोलतात याची गंमत वाटली. हे ‘नो’ का आलं, हे मला विचारू नका!

भूकंप, ज्वालामुखी, युद्ध या समस्यांनी ग्रासलेला असा छोटा भूभाग! बहुतेक म्हणूनच त्यांच्या छोटय़ाश्या जगण्यात खूप सुंदरता भिनली असावी. काही वर्षांपूर्वी अणुस्फोटात हादरलेल्या, पण त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेतलेल्या शिस्तप्रिय, वक्तशीर, रसिक स्त्री-पुरुषांचा हा देश आहे. डोरेमॉनचे गॅजेट जसे आपल्याला आवडतात तसे जापनीज गॅजेट्स, यंत्रतंत्र आख्ख्या जगाला आवडतात.

जपानची संस्कृती ही खूप जुनी असल्याने चित्रप्रकारातदेखील वैविध्य दिसतं. चित्रांचा (सुंदरतेचा) वापर रोजच्या जगण्यात, वापरातल्या वस्तूत आणणारे लोक. किमोनो या जपानी पारंपरिक ड्रेसवर, लाकडी वस्तूवर, भिंतीवरील स्क्रोलचित्र, कागदी-कापडी फोल्डिंग पॅनल, दरवाजे, हस्तिदंतावरील कोरीवकाम, बोधरेखाचित्र (एलुस्ट्रेशन्स) चिनीमातीची भांडी यांवरील चित्र, कापडावरील प्रिंट या सर्वावर ही चित्रं आली. आजही ही चित्रं संग्रहालयात पाहता येतील.

या कलाकारांचे वैशिष्टय़ म्हणजे भोवतालचे नीट पाहणे, त्याला आत्मसात करणे आणि त्या तत्त्वाला मिनीमल करून कलावस्तूत उतरवणे. तुम्ही जापनीज बोन्साय पाहिलेत का? मोठय़ा डेरेदार झाडांना अगदी टेबलावर ठेवता येतील इतके छोटे केले जाते. तरी त्याला फुले-फळे येतात.

हे म्हणजे मोठी वस्तू छोटी करण्यात डोरेमॉनच्या एका अत्याधुनिक बॅटरीसारखे झाले नै. अशीही जागेची अडचण या देशाला होतीच.

सोबत दिलेलं चित्र हे क्रेन या पक्षाचे! ‘क्रेन’ची फायटिंग स्टाईल आपण कुंफुपांडा मध्ये पाहिलीच आहे. आणि सोबत असलेले हे कॅटफिश देखील जापनीज मंदिरात, सार्वजनिक स्थळी, बगीच्यात अगदी प्रत्येकाच्या घरात दिसतील. तर या क्रेन व माशाची चित्रं तुम्हाला  जापनीज कलावस्तूंवर खूपदा पाहायला मिळतील. चिनी चित्रांप्रमाणे एकदम सहज, उत्स्फूर्तपण नाही व पाश्चात्य चित्रांप्रमाणे एकदम थंड व काटेकोरपणा नाही.

यांच्या रेखाटनात पारंपरिक नक्षीकामासारखं कौशल्यदेखील दिसतं व रचना ही पूर्व आशियाई संस्कृतीची ओळख अधोरेखित करते. चित्रातील या बदलाचे कारण म्हणजे जपानी कलाकारांनी, जापनीज चित्रकारांनी आधी चीनच्या जुन्या झेनचित्रांचा आधार घेतला. सुरुवातीच्या काळात काळी इंक व  ब्रशच्या स्ट्रोकची चित्र काढली गेली. मोठा ब्रश उभा पकडून काढलेली जापनीज अक्षरे तुम्ही जापनीज अ‍ॅनिमेशन चित्रपटात पाहिली असतील. मग पुढे पुढे स्वत:चं काही वेगळं असावं असं वाटणाऱ्या चित्रकारांनी त्यात मस्त रंग वगैरे आणले आणि काळ्या शाईच्या बंधनातून बाहेर पडू पाहिलं.

त्यांचे विषय देखील निसर्गचित्रांच्या पुढे गेले. यासाठी नव्याने ओळख झालेल्या पाश्चिमात्य देशांच्या (युरोप) कलेची त्यांना भुरळ पडली. सध्या दिलेल्या पक्ष्यांच्या चित्रांची मजा घ्या. याबद्दलची अधिक माहिती गुगलवर मिळेल. त्यापेक्षाही अधिक माहिती मिळविण्यासाठी जपानलाच जावे लागेल. सायोनारा!

श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in

First Published on July 16, 2017 12:57 am

Web Title: article about japanese art