16 December 2017

News Flash

जलपरीच्या राज्यात : राक्षस? अहं, तरबेज शिकारी!

निमुळतं शरीर आणि कास्थिल लवचिक सांगाडय़ामुळे शार्क मासे वेगवान असतात.

ऋषिकेश चव्हाण | Updated: July 9, 2017 1:43 AM

या आधी आपण व्हेल अर्थात देवमासे आणि व्हेल शार्कची ओळख करून घेतली. आज आपण शार्कविषयी जाणून घेणार आहोत. शार्क माशांना लोक घाबरतात, त्यांच्याविषयी बऱ्याच गैरसमजुतीदेखील आहेत. मात्र, शार्कविषयी जनमानसामध्ये खूप आकर्षण आणि आदरदेखील आहे.

कास्थिल गटात मोडणारे शार्क मासे डायनॉसॉर्सच्या काळापासून अस्तित्वात आहेत. शार्क माशांच्या एकूण ४०० प्रजाती आहेत, त्यांपैकी आदमासे १६० प्रजातींचे शार्क भारतात दिसतात. शार्क मासे अन्नसाखळीच्या टिपेला असणारे भक्षक आहेत, आणि इतर तरबेज भक्षकांप्रमाणेच शार्क माशांमध्येही शिकारीकरता उत्कृष्ट अनुकूलन पाहायला मिळतं.

निमुळतं शरीर आणि कास्थिल लवचिक सांगाडय़ामुळे शार्क मासे वेगवान असतात. शार्क माशांची दृष्टी उत्तम असते. अगदी मांजर आणि लांडग्यांपेक्षाही त्यांची नजर तीक्ष्ण असते. त्यांच्या उत्तम घ्राणेंद्रियांमुळे समुद्राच्या पाण्यात मिसळलेल्या रक्ताच्या एका थेंबाचा वासही त्यांना तब्बल पाच किलोमीटर दुरून घेता येतो. शार्कच्या तोंडामध्ये असंख्य दंतपक्ती असतात. शिवाय एखादा दात पडलाच तर आयुष्यभर त्या जागी दुसरा दात येत राहतो. इतर प्राण्यांच्या शरीरातून निघणाऱ्या विद्युतीय लहरींचाही- उदाहरणार्थ हृदयाची स्पंदनं- सुगावा शार्क माशांना सहज लागतो.

काही शार्क्‍सना आयुष्यभर हालचाल करत राहावं लागतं; जेणेकरून त्यांच्या गिल्सवरून पाण्याचा प्रवाह आणि त्यायोगे त्यांच्या शरीराला प्राणवायूचा पुरवठा होत राहील. शार्क पोहायचे किंवा हालचाल करायचे थांबले तर प्राणवायूच्या पुरवठय़ाअभावी गुदमरून त्यांचा मृत्यू ओढवतो. मात्र आजमितीला बहुतकरून शार्कचा मृत्यू मासेमारीमुळे, अन्नाकरता केला जातो. शार्क माशाच्या पाठीवरच्या पंखांकरता प्रामुख्याने शार्कची शिकार केली जाते, ज्यामुळे शार्कची संख्या जगभरच्या समुद्रांमध्ये खूपच कमी झाली आहे.

ऋषिकेश चव्हाण rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

First Published on July 9, 2017 1:43 am

Web Title: article about shark fish information