26 January 2021

News Flash

हेही दिवस जातील..

हेरून नवीन सामान आलं की ते काही काळ तिथेच ठेवलं जाई.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची मोकाशी

दारावरची बेल वाजली. प्रियाने धावतच दार उघडलं. दादा वाणसामानाची पिशवी घेऊन उभा होता. प्रियाने पिशवी घेतली आणि घराच्या एका ठरलेल्या कोपऱ्यात ठेवली. त्या कोपऱ्याचं नाव आता ‘क्वारंटाइन कॉर्नर’ असं पडलं होतं. बाहेरून नवीन सामान आलं की ते काही काळ तिथेच ठेवलं जाई. दादा स्वच्छ व्हायला बाथरूममध्ये पळाला. प्रियानेही साबणाने हात स्वच्छ धुतले.

‘‘या न्यू नॉर्मलचा आईला छान फायदा झालाय. एरव्ही ‘हात-पाय धुवा, घरात चपला-बुटांमध्ये वावरू नका’ सांगून ती दमायची. पण आता बघ, आपण कशी शहाणी मुलं झालोय.’’ प्रिया हसत म्हणाली.

‘‘आई नाही आली अजून बँकेतून?’’ दादाने स्वच्छ होऊन आल्यावर लगेचच कपडे मशीनला लावले.

‘‘आज क्लोझिंगमुळे उशीर! बाबाचाही कॉल सुरूआहे. बाबा घरी आणि आई ऑफिसला असं चित्र या करोनानेच दाखवलं- नाही?’’

‘‘तू महिला सबलीकरणाचा ट्रॅक पकडते आहेस का?’’

‘‘नाही रे! जस्ट एक विचार आला मनात. बाबा आय. टी.मध्ये असल्याने घरून काम करू शकतो, पण आईप्रमाणे ज्यांना बाहेर जाण्यावाचून पर्याय नाही, ते जातातच नं सगळी काळजी घेत!’’

‘‘सगळे सजग झालेत.’’

‘‘पण मास्क न लावणाऱ्या अतिशहाण्यांचीही कमतरता नाहीये. त्यांना अजूनही वाटतं की, ‘दुनिया मेरी मुठ्ठी में हैं.’ ते सोड! नवीन वर्षांचं स्वागत कसं करायचं?’’

‘‘या वर्षी मूडच नाहीये! आपल्या जवळपासचे कितीतरी जण दगावले करोनामुळे. सेलिब्रेशनची इच्छा तर व्हायला हवी! आपणही कुठे सुटलो? बाबा दोन महिने लंडनला अडकला. आल्यावर पंधरा दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन! तोपर्यंत आपण टेन्शनमध्ये. बेकार दिवस होते ते!’’

‘‘दादा, त्यापेक्षा पॉझिटिव्ह काहीतरी आठवू या नं!’’

‘‘२०२०ने आठवण ठेवण्यासारखं काय पॉझिटिव्ह दिलंय?’’

‘‘का? कोव्हिड वॉरियर्सना विसरलास इतक्यात? त्यांच्याकडे पाहून तरी आपण निगेटिव्ह होताच कामा नये. आणि आपल्या वरच्या मजल्यावरची सुवर्णाकाकू! देसाईकाकांची ट्रॅव्हल फर्म करोनामुळे बंद झाली, तर काकूने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला आणि खुलवला. काकांनी त्याला हातभार लावला. दोघे खचले नाहीत. पेपर, इंटरनेटवर अशा कित्तीतरी लोकांची उदाहरणं मिळतील.’’

‘‘खरंय! यांची खरी क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स!’’

‘‘आणि आपलं ‘ऑनलाइन’ शिक्षण! तंत्रस्नेही नसूनही शिक्षक नियमित वर्ग घेताहेत. ऑफलाइन व्हिडीओ, ऑनलाइन सेशन्स, शंका सोडवण्यासाठी वेगळा वेळ.. ते सर्वस्वाने प्रयत्न करतातच आहेत. त्यांच्याही कामाच्या वेळा वाढल्या आहेत. गावागावांमधून कितीतरी शिक्षकांनी वैविध्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांपर्यंत या काळात शिक्षण पोहोचवलं. एक प्रकारे हे शिक्षकही ‘कोव्हिड वॉरियर्स’ आहेत. सध्याच्या डिप्रेसिंग परिस्थितीत ते विद्यार्थ्यांचे काऊन्सिलर्सही बनलेत.. पालकांना मदत करताहेत. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी नाहीत?’’

‘‘एकदम पटलं!’’

‘‘थोडक्यात काय, करोनाचा धोका जरी संपला नसला तरी यंदा नवीन वर्षांचं स्वागत सकारात्मक विचारांनी आपण नक्कीच करू शकतो.’’

‘‘करेक्ट! कारण हेही दिवस जातील..’’

mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 12:00 am

Web Title: balmaifal article these days will pass abn 97
Next Stories
1 गाठोडय़ांचं गुपित
2 मनमैत्र : उत्तरापेक्षा प्रश्न महान
3 लॉकडाऊनमधली मैत्री
Just Now!
X