माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुमच्यापैकी किती मित्रांना फुलपाखरांची भीती वाटते? कुणाला पावसात भिजायला अजिबात आवडत नाही? तुम्ही कधी आभाळात उडणाऱ्या, घराजवळ आवाज करणाऱ्या पक्ष्यांना पाहिलं आहे? असे किती पक्षी तुम्हाला ठाऊक आहेत? घराजवळच्या लहानमोठय़ा झाडांची, त्यांच्या फुलांची माहिती तुम्हाला आहे का?
आज मी तुम्हाला माझ्या एका वयाने मोठय़ा, पण तुमच्याहूनही लहान असणाऱ्या मैत्रिणीची गोष्ट सांगणार आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या सव्वाशे वर्षांहून जुन्या असणाऱ्या निसर्गसंवर्धन, संशोधन आणि निसर्गशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत स्वयंसेवकांसाठी असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मी तिला भेटलो. केटी बगली तिचं नाव. अस्सल पारशी.. शांत, फारशी कुणाशी न बोलणारी, मात्र मैत्री झाली की जीव लावणारी. साधारण आजीच्या वयाची ही माझी मैत्रीण म्हणजे साक्षात उत्साहाचा झरा. नवं शिकण्याची अपार उत्सुकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिला लहान मुलांमध्ये सहज मिसळता येतं. इतकंच काय, तिला मोठय़ांनाही लहान करता येतं!
स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग करून आम्ही संस्थेच्या कामात हातभार लावायला, निसर्गसंवर्धनाच्या क्षेत्रात काम करायला सज्ज झालो. अलका मावशी पक्षी निरीक्षणात रमली. ती पक्षी पाहात, त्यांच्याविषयीची निरीक्षणं टिपत जगभर फिरते. शुभदा, डॉ शीला आणि हुतोक्षी राणीबागेकरिता लढा देण्यात गुंतल्या. डॉ. केतकी आणि खरोखरच आजीच्या वयाच्या डॉ. उषा सोसायटीच्या स्वयंसेवक म्हणून काम करण्यात रमल्या. केटी मुलांच्यात रमली. गोष्टीवेल्हाळ, अष्टपैलू आणि उत्तम लिहू शकणारी ही आमची मैत्रीण पुस्तकांमध्ये रमली.
आमच्या संस्थेच्या गोरेगावच्या संवर्धन प्रशिक्षण केंद्रामध्ये जंगल सफरींकरिता जायला अनेक शाळांच्या सहली यायच्या. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमांतून निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंशी लोकांची ओळख करून द्यायचो. जंगलातल्या पायवाटांवरून निसर्गाचे अनेक चमत्कार दाखवत फिरायचो. निसर्गाविषयीचे माहितीपट, स्लाईड शो दाखवायचो. केटी आमच्या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि लहान मुलांची आवडती असायची. तुमच्यासारख्या उडय़ा मारायची, धावायची, अवखळपणा करायची, गाणी गात टाळ्या वाजवत ठेका धरायची. मुलात मूल होऊनही आजीच्या जबाबदारीने, मायेने ती त्यांना निसर्गाची सफर घडवायची.
सगळ्यात धम्माल म्हणजे निसर्गातल्या अतिशय साध्या सोप्या घटनांमध्येही तिला गोष्ट दिसायची. ज्वालामुखी, आग यांसारख्या निसर्गातल्या रौद्र वाटणाऱ्या घटनादेखील कशा निसर्गोपयोगी कामं करतात याविषयी तिने एक अतिशय सुंदर असा स्लाईड शो तयार केला होता. सुरुवात व्हायची पृथ्वीच्या जन्मापासून. ती कशी थंड होत गेली आणि पृथ्वीच्या पोटात धगधगता लाव्हारस कसा दडला इथपर्यंत ती यायची. मग लाव्हारस ज्वालामुखीतून उफाळून बाहेर येतोय ती दृश्य दाखवणारी एक छोटी फिल्म. त्यासोबतच समुद्राच्या पाण्यात हा लाव्हा कसा पटकन थंड होत त्याचा दगड बनतो वगैरेची गोष्ट. मग एकेक करत त्या लाव्हारसासोबत बाहेर येणारी राख, खनिजं आजूबाजूच्या मातीला कशी समृद्ध करतात वगैरे माहिती. साधारण पाऊण तास तुमच्यासारख्याच वयाचा सारा चिमुकला श्रोता पडद्यावर घडणाऱ्या घटनांमध्ये आणि केटीच्या गोष्टींमध्ये रमून जायचा. केटी अशाच प्रकारे पाण्याचं चक्र, बीपासून वृक्षाचं वाढणं, अंडं-अळी-कोष ते रंगीबेरंगी फुलपाखरांचा जीवनक्रम अशा अनेक गोष्टी केटी खुबीने विणायची. केटीसोबत निसर्गसफरीवर जायची एकही संधी मी सोडत नसे. तिच्यासोबत फिरताना माझं वय कमी होत असे. शिवाय तिच्या प्रत्येक सहलीवेळी काही नवंच सांगायची, त्यामुळे साहजिकच कधीच कंटाळा यायचा नाही.
पुढे या मैत्रिणीशी संपर्क कमी झाला. साधारण २०१२ मध्ये मला तिने एक पुस्तक स्वाक्षरीसोबत पाठवलं. पक्ष्यांविषयी असलेलं हे पुस्तक म्हणजे केटीच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच होता जणू! त्यात गोष्टी होत्या, चटपटीत किस्से होते, पक्ष्यांचीच पात्रं असलेल्या चिमुकल्या नाटय़छटा होत्या आणि केटीने स्वत: रेखाटलेली उत्तम चित्रं होती. हे पुस्तक मी एका बैठकीत वाचलंच, मात्र ते वाचताना, त्यातल्या कोडय़ांची मनातल्या मनात उत्तरं देताना आणि त्यातल्या रेखाचित्रांना पाहताना मी पार छोटासा मुलगा झालो होतो. हे पुस्तक अथपासून इतिपर्यंत तिने स्वत: तयार केलं होतं. त्याची दखल वाचकांनी घेतलीच, प्रकाशकांनीही घेतली. मग केटीने सस्तन प्राणी, कीटक, पृथ्वी, समुद्र अशा अनेक विषयांवरची पुस्तकं लिहिली. ती सारीच वाचनीय आहेत, मात्र सोबतच तुम्हा मुलांना गोष्टी सांगता सांगता निसर्गाच्या प्रेमात पाडायला लावणारी आहेत. मॅमल्स-माईटी अ‍ॅण्ड मीक, बर्डस् ऑफ डिफरण्ट फिदर्स, इंट्रिगिंग इन्सेक्ट्स, हाऊ ब्लू इज अवर प्लॅनेट? द लेस लाईक्ड लवेबल्स ही केटीने लिहिलेल्या या इंग्रजीतल्या पुस्तकांची शीर्षकंच इतकी धम्माल आहेत, की नुसत्या त्यांच्या प्रेमात पडून ही पुस्तकं घ्यावीशी वाटतील. या नव्या युगाच्या आजीने लिहिलेली ही पुस्तकं तुम्हाला रिझवतील, रमवतील आणि खूप शिकवतील, हे नक्की!
माझ्या छोटय़ा वाचक मित्रांनो, ही पुस्तकं नक्की वाचा. तुम्ही अजून वाचायला शिकला नसाल तर आई-बाबांना, ताई-दादांना, आजी-आजोबांना यातल्या गोष्टी वाचायला सांगा. यातली नाटुकली बसवून मित्रांच्यात सादर करा. हसत खेळत, गाणी-गोष्टींच्या माध्यमांतून तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या आणि तुमच्या आसपास हरवत चाललेल्या निसर्गाविषयी खूप खूप शिका.
हे पुस्तक कुणासाठी? स्टुअर्ट लिट्ल आवडणाऱ्या आणि आवडू शकणाऱ्या प्रत्येक लहानथोर वाचकांकरिता.
पुस्तकं : मॅमल्स-माईटी अ‍ॅण्ड मीक, बर्डस् ऑफ डिफरण्ट फिदर्स,
इंट्रिगिंग इन्सेक्ट्स, हाऊ ब्लू इज अवर प्लॅनेट?, द लेस लाईक्ड लवेबल्स.
लेखक : केटी बगली
प्रकाशक : श्री बुक सेंटर
ideas@ascharya.co.in