ज्योती देशपांडे

lokrang@expressindia.com

Abortion is permitted due to defects in the foetus
गर्भावस्थेतील बाळात दोष आढल्याने गर्भपातास परवानगी
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

मुलांनो, आपल्या सगळ्यांनाच सतत काम करायचं म्हटलं की कंटाळा येतो, नाही का? मग  आपल्याला वाटतं, आपल्याला कामातून जरा मधे सुटी मिळायला हवी.  तुम्हालाही आठवडाभर शाळा झाली की रविवारी सुटी मिळते. मोठय़ा माणसांनासुद्धा रविवारी सुटी मिळते. सगळ्यांची सुटी पाहून चांदोबाला वाटलं की, त्याला स्वत:लाही सुटी मिळायला हवी.

रोज आपलं रात्री उगवायचं, मग मावळायचं आणि पुन्हा उगवायचं. तेच तेच काम करून त्याला कंटाळा आला होता. त्यामुळे त्याला एखाद् दिवस आराम करावा, सुटी घ्यावी असं वाटू लागलं. पण चांदोबा उगवला नाही तर रात्री प्रकाश कुठून मिळणार? सगळ्याच रात्री नुसत्या अंधाऱ्या होतील. मग यावर काहीतरी उपाय शोधायचा म्हणून चांदोबा सूर्याकडे गेला आणि त्याला आर्जवी स्वरात म्हणाला, ‘‘सूर्यदादा, मला रोज रोज त्याच त्याच वेळी तेच तेच काम करून खूप खूप कंटाळा आलाय. मला एखाद् दिवस सुटी घ्यायची म्हटलं तर तू माझ्याऐवजी रात्री काम करशील का? मीसुद्धा कधीतरी तुझ्या जागी तुझ्याऐवजी काम करेन.’’

मग सूर्य चांदोबाला थोडंसं हसत अन् थोडं समजावत म्हणाला, ‘‘अरे, माझा प्रकाश एवढा प्रखर आहे, तो रात्रीसाठी कसा चालेल.? तुझ्या प्रकाशासारखा तो शीतलही नाही आणि तुझा सौम्य प्रकाश दिवसा उजेड देण्याइतका प्रखर नाही, समजलं?’’ सूर्याने समजवल्यावर चांदोबालाही ते म्हणणं पटलं.

‘आता कुणाची बरं मदत घ्यावी?’ असा विचार करत चांदोबा गेला गरुडाकडे आणि त्याला आपल्या स्वत:च्या जागी काम करण्याची विनंती केली. तेव्हा गरुडही त्याला म्हणाला, ‘‘अरे, हे कसे शक्य आहे? एक तर मी तुझ्यासारखा आकाशात हळूहळू फिरत नाही. चांगला जोरात भरारी घेऊन उडतो. आणि दुसरे म्हणजे मी काही तुझ्यासारखा पांढराशुभ्रही नाही, की मी थोडाफार तरी पांढरा प्रकाश पसरवू शकेन. तेव्हा हे काही जमणार नाही.’’

गरुडानेही नाही म्हटल्यावर चांदोबा जरा निराश झाला. खूप विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की समुद्रपक्षी वाऱ्यावर छान चंद्राच्या गतीने उडू शकतात. पण ते तरी पांढराशुभ्र प्रकाश किती आणि कसा देणार? मग इतर कुठल्या पांढऱ्याशुभ्र पक्ष्यांना रात्रभर थव्याने एकत्र उडण्याची विनंती केली तर काही उपयोग होईल का, असे नाना विचार चांदोबाने करून पाहिले. पण कशाचाच उपयोग होणार नाही, हे लक्षात आल्यावर चांदोबा जरा चिंतेत पडला. कामाचा खूप कंटाळा आला असल्याने सुटी मिळवण्याबाबत विचार करतानाच चंद्राला एकदम चांदण्यांची आठवण झाली. तो स्वत: चांदण्यांकडे गेला आणि त्याने साऱ्या चांदण्यांना विचारले, ‘‘तुम्ही मला एका कामासाठी मदत कराल का?’’

‘‘कसली?’’ सगळ्या चांदण्यांनी चंद्राला विचारताच तो म्हणाला, ‘‘हे पाहा, मला रोज त्याच त्याच कामाचा खूप कंटाळा आलाय. मला महिन्यातून एखाद् दिवस सुटी घ्यायची म्हटलं तर त्या रात्री तुम्ही सगळ्याजणी मिळून माझ्याऐवजी काम करून पृथ्वीवरच्या लोकांना छानसा प्रकाश द्याल का?’’

‘‘हो, नक्कीच. तुझ्याइतका नाही तरी आमच्या परीने आम्ही चमचम करत लोकांना प्रकाश देऊच.’’ दुसऱ्याच रात्री चांदोबाने सुटी घेतली आणि चांदण्यांनी प्रकाश दिला. तेव्हापासून चांदोबा महिन्यातून एकदा सुटी घेतो. त्यालाच आपण अमावास्या म्हणतो. त्या रात्री आकाशात चांदण्या जास्तच चमचम करत चमकताना दिसतात.

‘‘मुलांनो, आता हल्ली शहरातील खूप दिवे आणि विजेच्या प्रकाशामुळे तुम्हाला अमावास्येलाही चांदण्यांचं ते चमचमणं जाणवत नाही. पण अमावास्येच्या रात्री शहरापासून दूर छोटय़ा गावात वा माळरानावर गेलात तर खूप साऱ्या चमचम करणाऱ्या सुंदर चांदण्यांची नक्षी तुम्हाला आभाळ भरून दिसेल. तेव्हा नक्की जाऊन पाहाच.

आणि बरं का, अमावास्येला सुटी घेतल्यावर मात्र चांदण्यांना एक दिवस आराम देण्यासाठी म्हणून महिन्यातून एकदा चंद्र संपूर्ण मोठय़ा गोलाकारात उगवतो आणि आपल्याला शीतल शुभ्र प्रकाश देतो. त्यालाच आपण म्हणतो पौर्णिमा.

(स्पॅनिश लोककथेवर आधारित)