डॉ. तेजस्विनी कुलकर्णी – dr.tejaswinikulkarni@gmail.com

घाबरू नका मंडळी, मी काही आज करोनावर लेक्चर देणार नाही हं तुम्हाला! मला माहिती आहे की, आत्ता दशदिशांमधून फक्त करोनाची माहिती, घ्यायची काळजी आणि त्याविषयीच्या बातम्यांचा भडिमार चालू आहे तुमच्यावर. (आणि तुम्ही सगळी काळजी घेत असाल याची खात्रीदेखील आहे.) सक्तीने घरीसुद्धा बसावं लागतंय, ही त्या कंटाळ्यात भर! पण गंमत सांगू का, या सक्तीच्या विश्रांतीतून आपण खूप काही  सकारात्मक आणि सृजनात्मक गोष्टी करू शकतो. मीही माझ्या घरी बसून करते आहे अशा गंमत गोष्टी. तुम्हीही करणार माझ्यासोबत?

सुरुवात करू या ती या लॉकडाऊनची नकारात्मक बाजू उगाळणं थांबवून. आपण आगोदर एकदा नकारात्मक विचारांवर आपलं लक्ष केंद्रित करण्याविषयी बोललो होतो, आठवतं? त्यासाठी टोमॅटोच्या झाडाची युक्तीसुद्धा आपण पाहिली. नकारात्मक गोष्टींवर फोकस केल्याने आपण अजून अजून नकारात्मकतेमध्ये अडकत जातो. आत्ता सक्तीने घरी बसावं लागत आहे हे मान्य. त्यामुळे बाहेर खेळायला जाता येत नाहीये, मित्र-मैत्रिणींना भेटता येत नाहीये. फिरायला जाण्याचा तर प्रश्नच नाही. हो ना? घरात बसून कंटाळा येतोय, चिडचिडसुद्धा होतेय कधी कधी. बरोबर? या सगळ्या गोष्टी होताहेत, कारण आपण लॉकडाऊनमुळे काय काय करता येत नाही, या विचारचक्रात अडकलो आहोत जणू!

यातून बाहेर पडण्यासाठी एक खेळ खेळू या. जशा नाण्याला दोन बाजू असतात, तशाच या लॉकडाऊनलासुद्धा दोन बाजू आहेत बरं! ‘काय करता येत नाहीये’ ही झाली एक बाजू, पण ‘काय काय करता येऊ शकतंय- ज्याच्यासाठी आधी फार वेळ मिळत नव्हता?’ ही झाली दुसरी आणि सकारात्मक बाजू. विचार करून पाहा बरं स्वत:च्या मनाशी. हा कंटाळा कमी करून लॉकडाऊनची मजा घ्यायचा हा खेळ आहे. आपल्या खेळाचं नावच आहे- ‘लॉकडाऊनच्या नाण्याची दुसरी बाजू.’

पण हा खेळ खेळायचा कसा? सांगते. कोणतंही एक नाणं घ्या. एक वही किंवा कागद आणि पेन्सिल घ्या. आता जेव्हा जेव्हा घरी बसायचा कंटाळा येईल, तेव्हा हे नाणं घ्या आणि करा टॉस. काय आलं? छापा की काटा? जे काही आलं असेल ती बाजू कागदाच्या खाली ठेवा आणि पेन्सिल कागदावर फिरवून त्या नाण्याचा छाप उठवा. हा छाप उठवायचा कसा ते माहिती नसेल तर तुमच्या ताई-दादा, आजी-आजोबा किंवा आई-बाबांना विचारा. त्यांनी त्यांच्या लहानपणी या गमतीजमती नक्की केल्या असतील.

उठवलात छाप? आता त्यापुढे तुम्हाला जी काही गोष्ट करावी वाटत होती आणि घरी बसल्यामुळे करता येत नाहीये, ती लिहा. काही खास गोष्ट नसेल, तर नुसतं ‘घरी बसून कंटाळा आलाय’ असं लिहिलंत तरी चालेल. आता त्याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा छाप त्या खालोखाल उठवा आणि त्यापुढे लिहा ‘मी काय काय सकारात्मक करू शकतो/ते घरात बसल्या बसल्या?’ आणि एक कोणतीही गंमतीदार, सकारात्मक गोष्ट लिहून टाका- जी तुम्ही आत्ता करू शकता. जसं की, चित्रकला, पत्ते खेळणं, कॅरम खेळणं, हस्ताक्षर सुधारणं, एखादा नाच बसवणं, गावी राहणाऱ्या नातेवाईकांशी, भावंडांशी फोन वा व्हिडीओ कॉलवर गप्पा मारणं, घरी आई-बाबांना कामात मदत करणं, इत्यादी. जेव्हा केव्हा कंटाळा येईल, तेव्हा काढा ही वही आणि शोधा दरवेळी करता येतील अशा नवनव्या गोष्टी. काही दिवसांतच तुमच्याकडे एवढी मस्त मोठी यादी तयार होईल, की त्या सगळ्या गोष्टी करायला वेळच पुरणार नाही. तय्यार खेळायला? करा लगेच सुरुवात.

मित्रांनो, घरात बसणं हे खरंच खूप कंटाळवाणं असू शकतं ही गोष्ट कोणीच अमान्य करणार नाही. मात्र आता आलेली परिस्थिती स्वीकारून त्यातून पुढे काय छान करता येईल हा विचार करणं इथे आपल्याच फायद्याचं आहे. बरोबर ना? या परिस्थितीमध्ये खरं तर दडलेल्या आहेत संधी. आपल्याला अजून उत्तम विद्यार्थी आणि अजून उत्तम माणूस बनवण्याच्या. याच संधींना आपल्याला या नाण्याच्या खेळातून शोधायचं आहे.

कोणत्या प्रकारच्या आहेत या संधी?

पहिली गोष्ट तर आपण या सुटीत नवीन काहीतरी शिकू शकतो. आठवा पाहू तुम्हाला कधी काही शिकावंसं वाटलं होतं का? पेंटिंग, कॅलिग्राफी किंवा एखादा स्वयंपाकातला पदार्थ वगैरे करायला? एखादी नवी भाषा किंवा बागकाम? कॉंम्प्युटरमधलं कोणतं सॉफ्टवेअर वापरणं, ई-मेल करणं वगैरे.. कोणतीही गोष्ट शिकणं हे आपल्या मेंदूला मस्त चालना देतं. त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये पेशींचे नवे जाळे तयार होते. आपला मेंदू अजून सक्षम होतो. घरच्या मोठय़ा माणसांना विचारा की तुम्हाला शिकायची इच्छा असलेली गोष्ट कुठून शिकता येईल? अगदीच कोणी नसेल शिकवू शकत, तर तुमचे आई-बाबा तुम्हाला इंटरनेटवर पाहूनसुद्धा शिकवू शकतील. आजी-आजोबांनाही विचारा की त्यांच्याकडे कोणती गोष्ट आहे तुम्हाला शिकवण्यासारखी? मला आठवतं, माझ्या लहानपणी एका उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या आजीनं मला सुई-दोऱ्याने हातावरच बाहुलीला कपडे शिवायला शिकवलं होतं. मी त्या सुट्टीत अगदी फ्रॉकपासून साडी आणि घागऱ्यापर्यंत किमान डझनभर तरी नवे कपडे शिवले माझ्या बाहुलीला.

अशा खेळाबरोबरच आपल्या अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला सुधारणा करायची एक मस्त संधी आहे ही. कायम लागणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ, गणितातील पाढे, विज्ञानातील काही संकल्पना, व्याख्या, भाषांमधलं व्याकरण आणि सगळीकडे प्रभावित करायला उपयुक्त असं हस्ताक्षर व शुद्धलेखन सुधारणं अशा अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत. स्मरणशक्ती वाढवण्याचे खेळ खेळा. कोडी सोडवा. यांसारख्या गोष्टी इंटरनेटवर सहज उपलब्ध असतात. पूरक वाचन हाही त्यातलाच एक भाग. शाळेच्या अभ्यासामुळे बाकी फार काही वाचायला वेळच मिळत नाही, ही आपली नेहमीची तक्रार. पण आता वेळच वेळ आहे की आपल्याकडे. आपल्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध करणारा वाचन हा एक हमखास मार्ग म्हणावा लागेल. ‘वाचाल तर वाचाल’ असं म्हणतातच, नाही का?

खरं तर या सुट्टीचं एक मस्त वेळापत्रकच तुम्ही तयार करू शकता. आपण आत्ता गप्पांमध्ये ज्या गोष्टींची चर्चा करतो आहे, तुम्हाला यातून सुचतील अशा सगळ्या गोष्टी, घरातली मंडळी किंवा मित्रमैत्रिणींच्या कल्पना असं सगळं काही तुम्ही या सुट्टीत अनुभवू शकता.

अजून एक सुवर्णसंधी म्हणजे मोठेपणीची एक तयारी करण्याची संधी तुमच्याकडे आहे या सुट्टीत. ती तयारी म्हणजे स्वावलंबनाची. आजकाल शिक्षण आणि नोकरीसाठी दुसऱ्या परक्या शहरांमध्ये किंवा अनेकदा परदेशामध्येसुद्धा जावं लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. तेव्हा एकटं राहून स्वत:च आपली सगळी कामं करणं, अगदी स्वयंपाकापासून ते भांडी-कपडे स्वच्छ करण्यापर्यंत, ही आता काळाची गरज आहे. मुलगा असो वा मुलगी, सर्वानाच ही घरातली कामं करता येणं ही आपल्या सर्वाचीच गरज आहे. यातली काही कामं शिकून घेता येतात का पाहा. कामवाली मावशीसुद्धा सुट्टीवर असल्याने आईलाही तेवढीच मदत होईल आणि तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकाल. घरातल्या एका कामाची जबाबदारीच घेऊन टाका. केर काढणे, भांडी घासणे किंवा विसळून देणे, कपडे वाळत टाकणे, स्वयंपाकातला कोशिंबिरीसारखा एखादा छोटा प्रकार शिकणे, यातलं काहीतरी करून पाहा. आईला विचारा. बघा आई खूश होते की नाही!

घरकामांसोबतच या सुट्टीत अजून एक मेंदूला चालना देणारी गोष्ट तुम्ही करू शकता. ती म्हणजे, तुमची सर्जनशीलता वाढवणे. अर्थात क्रिएटिव्हिटी वाढवणे. काहीतरी नवं तयार करा. चित्रकला, नृत्य, कार्यानुभव (क्राफ्ट) तर आहेच. पण यापलीकडेसुद्धा जाता येतंय का पाहा. एखादी नाटय़छटा बसवा, त्याचा व्हिडीओ करा. गाणी गा. घरच्या घरी गाणी, संगीत किंवा नृत्याचा कार्यक्रम करा. टाकाऊमधून टिकाऊ वस्तूसुद्धा तुम्ही बनवू शकता. जुन्या वर्तमानपत्रांतून तुम्हाला आवडतील त्या चित्रांची, लेखांची, गोष्टींची कात्रणं काढा. या सुट्टीची एक वहीच खरं तर तुम्ही बनवू शकता. त्यात तुमची चित्रं, तुम्ही केलेल्या गमतीजमती, नवीन शिकलेल्या गोष्टी, कात्रणं हे सगळं चिकटवा, तुमचे अनुभव लिहा आणि ही वही मस्त सजवा. तुमच्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा ही कल्पना सांगा आणि सुट्टीनंतर भेटल्यावर एकमेकांना या वह्य दाखवा. त्या बघायला किती मज्जा येईल, हो ना? आपण खेळलेला नाण्याच्या छापाचा खेळ, तुमची लॉकडाऊनची वही, यांचे फोटो किंवा अजून काही कल्पना माझ्यासोबतसुद्धा नक्की शेअर करा. मी वाट पाहतेय.