14 November 2018

News Flash

व्हेरिएबलची व्याप्ती

सदराच्या सुरुवातीला आपण व्हेरिएबलचा (variable) वापर करायला शिकलो.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सदराच्या सुरुवातीला आपण व्हेरिएबलचा (variable) वापर करायला शिकलो. व्हेरिएबल डिक्लरेशन (declaration), व्हेरिएबलमध्ये किंमत साठवणे व ती वापरणे हे तीन टप्पे आपण बघितले. याखेरीज व्हेरिएबलच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. ती म्हणजे, व्हेरिएबलची व्याप्ती (स्कोप/ scope).

मुख्य प्रोग्रामला (program) जेव्हा आपण छोटय़ा छोटय़ा फंक्शन्स (functions) मध्ये विभागतो, तेव्हा आपल्याला व्हेरिएबलची व्याप्ती लक्षात घ्यावी लागते. आपल्या मागच्या भागातल्या उदाहरणापुरतं सांगायचं झालं तर, असं सांगता येईल की मुख्य प्रोग्राममध्ये डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आपण फंक्शनमध्ये आपण वापरू शकतो, पण फंक्शनमध्ये डिक्लेअर केलेलं व्हेरिएबल आपण मुख्य प्रोग्राममध्ये वापरू शकत नाही. ‘r’ व ‘a’ ही व्हेरिएबल्स ‘AreaOfCircle’ या फंक्शनमध्ये डिक्लेअर केली असल्याने, ती व्हेरिएबल्स आपल्याला मुख्य प्रोग्राममध्ये वापरता येणार नाहीत.

याखेरीज वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस (programming languages) व्हेरिएबलची व्याप्ती दर्शविण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. व्हेरिएबल डिक्लेअर करताना, डाटा टाइपच्या (data type) बरोबरीने, व्हेरिएबलचा स्कोप (scope) दर्शविला जातो. यासाठी प्रायव्हेट (private) अथवा पब्लिक (public) असे की-वर्डस (keywords) वापरतात. प्रायव्हेट व्हेरिएबल प्रोग्रामच्या ज्या भागात डिक्लेअर केलं जातं, त्याच भागात वापरता येतं.

याउलट पब्लिक व्हेरिएबल कोणत्याही भागात डिक्लेअर केलेलं असलं तरी, इतर सर्व भागांतूनही वापरता येतं.

आता तुम्ही म्हणाल, कोणतं व्हेरिएबल कोणत्या भागात डिक्लेअर केलंय, नि ते कोणत्या भागात वापरता येईल किंवा कोणत्या भागात वापरता येणार नाही, हे लक्षात ठेवण्यापेक्षा सगळीच व्हेरिएबल्स पब्लिक व्हेरिएबल्स म्हणून डिक्लेअर केली की काम सोप्पं होईल. कोणतंही व्हेरिएबल हवं तेव्हा कोणत्याही भागात वापरा. असं जरी आत्ता तुम्हाला वाटलं, तरी मोठ्ठे प्रोग्राम लिहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की जी व्हेरिएबल्स जिथे जेव्हा हवी आहेत तिथे तेवढय़ापुरती वापरायची असतात. त्याने आपला प्रोग्राम खूप सुटसुटीत होतो, नि त्यात अनवधानाने राहून गेलेली चूक (bug/बग) शोधणे सोप्पे जाते.

अपर्णा मोडक

sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)

First Published on December 17, 2017 1:04 am

Web Title: declaration of variables