18 January 2019

News Flash

जलपरीच्या राज्यात : बहुभुजाधारी तारामासा

बहुतेकांना पाच अवयव असले तरी काही प्रजातीच्या तारामाशांना तब्बल ५० अवयव देखील असतात.

पाण्याचा जोरदार प्रवाह तयार करून हे तारामासे एकीकडून दुसरीकडे प्रवास करतात.

माझ्या बालवाचक दोस्तांनो, या जलपरीच्या राज्यात देवमासा मासा नाहीच मुळी हे वाचलेलं आठवतं का? आज आपण नावात मासा असूनही मासा नसणाऱ्या तारामाशाविषयी वाचणार आहोत. मासा म्हणत असलो तरी तारामासा मासा खचितच नाही.

तारामासा अर्चिन्स आणि समुद्री काकडय़ाचा चुलत नातेवाईक म्हणता येईल; तो इकायनोडर्म या गटामध्ये मोडतात. तारामाशाला पाहिलंत की लगेचच लक्षात येईल की यांचं शरीर हे वर्तुळाकृती, केंद्रीयमितीमध्ये असतं, माशांचं शरीर आपल्यासारखं डाव्या-उजव्या बाजूस समान असतं. वर्तुळाकृती, केंद्रीमितीमध्ये असणाऱ्या तारामाशांच्या अवयवांची रचना एखाद्या चाकासारखी, मध्यबिंदूपासून बाहेर विस्तारणारी असते. बहुतेकांना पाच अवयव असले तरी काही प्रजातीच्या तारामाशांना तब्बल ५० अवयव देखील असतात. केंद्रभागी मुख अर्थात तोंड असतं.

अक्षरश: शेकडय़ाने असलेले यांचे पाय दोन ते चार ओळींमध्ये असतात. प्रत्येक पाय एखाद्या पारदर्शक आणि पोकळ चिमुकल्या नळीसारखा असतो, ज्याला खाली चूषक असतात. पाण्याच्या सहाय्याने पोकळी तयार करून तारामासे समुद्रतळाला चिकटून राहतात. स्नायूंच्या मदतीने या पायांमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह तयार करून हे तारामासे एकीकडून दुसरीकडे प्रवास करतात.

कवचधारी प्राणी, कोळंबी वगैरे, हे त्यांचं आवडतं खाद्य असलं तरी प्रसंगी जवळून पोहणाऱ्या माशांवरही तारामासे ताव मारतात. एकदा का भक्ष्याला आपल्या अवयवांनी धरलं की हे तारामासे मुखावाटे आपलं पोटच बाहेर काढून भक्ष्याच्या शरीरात घालतात. तिथे ते पोटातील पाचकरस रिकामे करतात, ज्यामुळे काही वेळाने भक्ष्याच्या स्नायूंचं पचन व्हायला सुरुवात होते. मग तारामासे आपलं पोट पुन्हा आत ओढून घेतात आणि भक्ष्यावर निवांतपणे ताव मारतात. गंमत म्हणजे, तुटलेल्या अवयवांच्या जागी तारामासे पुन्हा नव्याने नवे अवयव वाढवू शकतात, सहाजिकच एखादा अवयव तुटलाच तर त्या जागी काही दिवसांनी तस्साच नवा अवयव येतो.

ऋषिकेश चव्हाण

शब्दांकन : श्रीपाद

rushikesh@wctindia.org

First Published on November 19, 2017 2:29 am

Web Title: facts information about starfish