‘‘अरे बापरे! काय म्हणायचं तुमच्या या खेळाला? केवढा पसारा केलाय घरभर. थोडय़ा वेळाने आपल्याकडे पाहुणे येणारेत जेवायला. त्या तयारीसाठी ऑफिसमधून लवकर आले तर तुम्ही इथे केव्हढी कामं वाढवून ठेवलीत माझी? चला चला.. आता पटापट ही खेळणी उचलून घर आवरायला घ्या पाहू.. आणि आधी त्या टी.व्ही.चा आवाज कमी करा पाहू. डोकं भणाणून जातं अगदी.’’ ऑफिसातून आलेल्या आईचा रूद्रावतार पाहून जय आणि मल्हार दोघंही चपापले. खरं तर दोघंही तिच्याकडे आल्या आल्या चमचमीत खाण्याची मागणी करणार होते. पण तिचा मूड पाहून दोघांनी मुकाटय़ाने पसारा आवरायला सुरुवात केली.

‘‘शी.. आपल्या आया किती छोटय़ाशा गोष्टीवरून आपल्यावर चिडतात नाही, नाहीतर या टी.व्ही.वरच्या जाहिरातीतल्या आया बघ.’’ टी.व्ही.कडे बोट करत मल्हारने जयची साक्ष काढली.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

‘‘खरंय रे, बघ ना त्यातली मुलं बूट पॉलीश करताना कपडे खराब करतात. कधी डाग चांगले म्हणत चक्क चिखलात उडय़ा मारतात. काय वाट्टेल ते करतात. पण त्यांची आई काय करते?’’- जय.

‘‘अरे, त्या ओरडत तर नाहीतच उलट हसत हसत मुलांना जवळ घेऊन त्यांचे लाड करतात आणि आपल्याकडे?  जरा काही सांडासांड झाली तर केव्हढं मोठ्ठं लेक्चर ऐकावं लागतं.’’- इति मल्हार.

‘‘फक्त खेळ आणि कपडेच नाही हं.. खाण्याचेसुद्धा कित्ती लाड करतात बघ ना त्या.. मुलं मागतील तेव्हा आणि मागतील ते काहीही मॅगी.. चॉकलेटस्.. कोिल्ड्रक्स. हसत हसत देतात. मुख्य म्हणजे कुठल्याही अटी न घालता.’’ जयची पुस्ती.

‘‘काही नाही रे.. मावशी आणि माझी आई दोघी ना आजकाल जाम चिडचिडय़ा झाल्यात. मला कधी कधी काय वाटतं सांगू? या दोघींनी एकदा जाहिरातीतल्या आया कशा वागतात ते बघितलं पाहिजे. आपल्या आयांनी यांची कॉपी केली तर कित्ती धम्माल येईल ना?’’.. जयच्या कल्पनेवर मल्हार टाळी देत असतानाच जयची आई ट्रेमधून दुधाचे मग्ज आणि खाणे घेऊन तिथे आली. इतका वेळ तिने आतून दोघांचं बोलणं ऐकलं होतं. तरीही काही न भासवता  ‘‘शाब्बास, आता ही मासिके आणि कुशन्स वगैरे उचलून ठेवा हं..’’ म्हणत ती शांतपणे कॉफी पिऊ  लागली. टीव्हीवर एक जाहिरात सुरू होती. त्यात एका मोठय़ा बंगल्यासमोरच्या बागेत खेळणाऱ्या मुलांना त्यांची आई हसत हसत पाणीपुरी खायला बोलावीत होती. जयची नजर टी.व्ही.वरून समोरच्या बिस्कीट आणि कुरमुऱ्याच्या चिवडय़ाकडे गेली. पण त्याने तोंड वाकडं केलं. ते पाहून ‘‘थोडय़ा वेळाने जेवणाचा मस्त मेनू आहे. तोपर्यंत याच्यावरच भागवा हं,’’ म्हणत आई आत गेली. त्यानंतरही बराच वेळ तिच्या कानावर पडणारी जाहिरातीतल्या आईची आणि तिची तुलना ऐकून तिला एक आयडिया सुचली.

दोन दिवसांनी आईने बाजारातून आणलेले सामान डायनिंग टेबलवर ठेवलं आणि दोघांना हाक मारली. ‘‘बच्चे लोक, मोकळे असलात तर मला हे सामान भरायला मदत करणार का थोडी?’’

ऑफिसातल्या पूजेहून आलेल्या आईकडे पाहून जयने विचारलं, ‘‘आई, तुला साडी नाही बदलायची? की नंतर कुठे बाहेर जायचंय?’’

‘‘नाही रे राजा, आता कुठे नाही जायचंय मला, पण आता घरातसुद्धा टी.व्ही.तल्या बायकांसारख्या छान छान साडय़ा आणि सूटस् वापरायचं ठरवलंय मी.’’ पिशवीतून तिने एक औषधाची बाटली काढून जयच्या हाती देत म्हटलं, ‘‘आजपासून रोज सकाळ- संध्याकाळ १-१ चमचा हे नियमित घ्यायचं हं. आता १५ दिवसांनी तुझी गणिताची परीक्षा आहे ना! याच्या जाहिरातीतली आई आपल्या मुलाला नेहमी हेच देते म्हणून तो मुलगा बघ कायम पहिला नंबर मिळवतो. म्हणूनच म्हटलं की तुलाही दिलं तर तुझाही नंबर पहिला येईल. घेशील ना.’’

‘‘मल्हार, हे तुझ्यासाठी.’’ म्हणत मल्हारला एक डबा दिला.

‘‘मावशी..हे ..मला कशाला?’’ डबा निरखत मल्हारने विचारलं.

‘‘अरे, पुढच्या महिन्यात तुमच्याकडे सायकलिंगची स्पर्धा आहे ना.. म्हणून तर आणलंय. याच्या जाहिरातीत नाही का दाखवत तो मुलगा रोज दोन चमचे पावडर दुधात घालून पितो आणि स्पर्धा जिंकतो की नाही?’’ तिने हसत हसत विचारलं. दोघंही एकमेकांकडे पाहात असताना तिने पिशवीतून क्रीमची बाटली काढून म्हटलं, ‘‘आणि हे मला.’’

‘‘तुला कशाला?’’..जय पुरता गोंधळला.

‘‘अरे आपल्याकडे तू, बाबा, हा मल्हार, माझी ताई सगळे गोरे आहात. मलाही तुमच्यासारखे गोरंपान व्हायचंय. याच्या जाहिरातीत ती बाई आठ दिवस हे क्रीम लावते आणि मस्त गोरीपान दिसायला लागते ना, म्हणून मीपण हे ट्राय करणार.’’

‘‘मग काय, करायची ना आजपासून

सुरु वात! जयला आता गणितात १०० मार्क्‍स मिळालेच पाहिजेत. आणि मल्हार सायकलिंगमध्ये चॅम्पिअन व्हायलाच हवा आणि मीपण आता त्या जाहिरातीतल्या आयांसारखी गोरीपान दिसणार.’’ हसू दाबत आई म्हणाली.

‘‘हॅट आई, तुला माहितेय- मला मॅथ्स बिलकूल आवडत नाही. त्यामुळे अशी कितीपण औषधं घेतली तरी  मी स्कॉलर वगैरे अजिबात होणार नाहीये. तू एवढे विकत आणलेस म्हणून मी बाटली संपवीन, पण १०० मार्क मिळतील याची मी गॅरंटी देणार नाही हं आधीच सांगतोय.’’ जयचा चिडका सूर.

‘‘आणि मावशी तुला माहितेय ना.. मी सायकल शिकताना दोन-तीन वेळा धडपडलोय.. एकदा मोठी खोक पण पडलीय, ही बघ.. आता कुठे जरा जरा मला बॅलन्सिंग जमायला लागलंय. कदाचित स्पध्रेमध्ये मी भाग घेईन, पण अशी पावडर घेऊन डायरेक्ट चॅम्पिअन व्हायची गॅरंटी नाही देणार हं. मी पण आधीच सांगतोय.’’ मल्हारने आपली बाजू मांडली.

‘‘अरे, पण मी हे काही माझ्या मनानं नाही आणलं.. तुम्ही टी.व्ही.वरच्या या जाहिराती बघता ना? त्या पाहूनच आणलंय.’’- आई.

‘‘हॅट मावशी, ते सगळं  खरं नसतं काही. अशी रोज ही पावडर घातलेलं दूध पिऊन कुणी चॅम्पिअन होतं का? अगं, बऱ्याचदा ते जाहिरातवाले आपल्याला उल्लू बनवत असतात.’’ मल्हारने माहिती पुरवली.

‘‘हो गं आई, अशी औषधं घेऊन स्कॉलर होता आलं असतं तर वर्गात सगळ्यांनाच ए ग्रेड मिळाली नसती का?.. जाहिरातवाले ना आपला माल खपवायला सगळं वाढवून सांगतात आणि त्यातलं बरंचसं खोटंही असतं. थोडं चिटिंग करतात असं आमच्या टीचरनी एकदा सांगितलं होतं.’’- जय.

‘‘अय्या. म्हणजे त्या छान छान जाहिराती फसव्या असतात? आणि ती बक्षीस मिळवणारी मुलं?.. त्यांच्या त्या छान छान दिसणाऱ्या.. मुलांचे सारखे सारखे लाड करणाऱ्या.. त्या आया चक्क खोटय़ा आहेत की काय? मला तर हे आजच कळतंय. अरे.. तुम्हाला त्या जाहिराती आणि त्यातल्या आया आवडतात ना, म्हणून तर मी त्यांची कॉपी करायचं ठरवलं. तुम्हाला अशा पावडरी.. औषधं दिली तर तुम्हीही पहिले याल, बक्षीस मिळवाल. मग मी आणि माझी ताई तुमचे सारखे सारखे लाड करू.असं काय काय ठरवलं होतं मी मनाशी. पण आता तुम्ही म्हणताय ते सगळं खरं नसतं. मग.. आता रे काय करायचं?’’ आईला हसू आवरत नव्हतं.

मगापासून आई नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी वागतेय आणि बोलतेय हे दोघांनाही जाणवलं होतं, पण तिच्या हसण्याने दोघांनाही परवाच्या त्यांच्या बोलण्याची लिंक लागली. तेव्हा जयने हळूच तिला मिठी मारत म्हटलं, ‘‘आई, तू ना आहेस तशीच मला खूप आवडतेस. त्या क्रीमबिमची काही गरज नाहीये. पण खरंच सांग- या जाहिरातीबद्दल तुला खरंच काही माहीत नव्हतं.. की.. मुद्दाम आम्हाला..’’

‘‘जाऊ द्या रे.. तुम्हाला आपसूक कळलंय ना, मग खूप झालं.. चला आता खरंच कामाला लागू या.’’ दोघांना जवळ घेत आई म्हणाली.

alaknanda263@yahoo.com