02 March 2021

News Flash

अतुल्य भारत!

प्रजासत्ताकदिनाचे कार्यक्रम ही आमच्या शाळेसाठी एक पर्वणीच! सारं गाव आमच्या शाळेच्या मदानात लोटतं ते कार्यक्रम पाहण्यासाठी. कार्यक्रमाची तयारी करणं आणि ती करवून घेणं हे आम्हा

| January 26, 2014 01:05 am

प्रजासत्ताकदिनाचे कार्यक्रम ही आमच्या शाळेसाठी एक पर्वणीच! सारं गाव आमच्या शाळेच्या मदानात लोटतं ते कार्यक्रम पाहण्यासाठी. कार्यक्रमाची तयारी करणं आणि ती करवून घेणं हे आम्हा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खूपच आनंदाचं, उत्साहाचं असतं. वर्षभर सारी शाळा या दिवसाची वाट पाहात असते. आजही पी. टी.च्या सरांच्या एका शिट्टीसरशी सारी शाळा काही मिनिटांत ग्राउंडवर हजर झाली. बघता बघता शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आपल्या भारतभूचा नकाशा तयार केलासुद्धा!
खरंच देश, देश म्हणजे काय असतं, तर देश म्हणजे असतो तो देशाचा नागरिक. हा नागरिकच देशाची खरी ओळख करून देत असतो. आत्ता आम्ही छोटे छोटे नागरिक मिळून हेच तर दाखवत आहोत. अगदी अभिमानाने दाखवून देत आहोत. बघा, आम्ही म्हणजेच देश आहोत, या जाणिवेनंच माझं मन भरून येतंय तोच मानेमॅडमनी त्यांच्या गोड स्वरात आळवणी सुरू केली-
जनांचा प्रवाहो इथे चाललेला सदा संस्कृतीच्या मुळापासुनी
पिढय़ा नांदती भोवती बांधवांच्या अम्ही भिन्न ना त्यांचियापासुनि
तयांच्या कळा जाणवाव्या अम्हांला तयांच्या सुखाचिच लागो स्पृहा
नमस्कार देवा तुला आमुचा हा करी आमुची मातृभूमी महा
प्राचीन परंपरा असलेल्या या माझ्या खंडप्राय देशात आमच्या मनात सदैव ज्योत जागी आहे, की आम्ही सारे बांधव आहोत. म्हणूनच धर्म, भाषा, प्रांत यांना विसरून कुठेही संकट आलं की आम्ही लगेचच धावत जातो. आमच्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, असं फक्त रोज प्रतिज्ञेपुरतं न म्हणता वेगवेगळ्या धर्माचे सण, उत्सव आणि संस्कार यांची देवाणघेवाण खूप मोठय़ा प्रमाणात करण्याची उर्मी तर आमचीच आहे. हे सारं असं आहे, कारण आम्ही एका सार्वभौम, समाजवादी, लोकशाही गणराज्याचे नागरिक आहोत. आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शपथ घेतली आहे. हे सारं आठवत होतं. दुसरीकडे मानेमॅडमचे पुढचे स्वर मनात खोल खोल शिरत होते.
हिचे रूप चतन्यशाली दिसावे
जगाला कळावी हिची थोरवी
स्मरूनी हिच्या त्या कथा अन् व्यथाही
हिला न्यायचे रे पुन्हा वैभवी
अशा सर्व स्वप्नांस सामथ्र्य द्यावे
म्हणूनीच देवा नमस्कार हा
करी आमुची मातृभूमी महा
‘‘देवा, खरंच मान्य, एकदम मान्य. ही मातृभूमी महान करण्याचं काम फक्त नि फक्त माझंच आहे. माझी मायभू ही निसर्गसंपदेचा अद्भुत साठा आहे. ती संपदा जतन करणे, वाढवणे हे सगळं माझंच तर कर्तव्य आहे. या मातेकडून मी जर का हक्काने माझ्या गरजा पूर्ण करून घेत असेन, तर तिचं संरक्षण, संवर्धन आणि जतनासाठी प्रयत्न करणं हे माझं कर्तव्यच आहे’’.. मला मनीमानसी उमगलं.
‘‘छे, मला कसलं जमतंय. मी तर एक साधा विद्यार्थी. माझ्या हाती ना सत्ता ना संपत्ती.’’ दुसरं मन कुरकुरलं. माझ्याच मनांचं द्वंद्व सुरू झालं.
‘‘पण यासाठी सत्ता-संपत्तीची खरंच गरज आहे? पहिल्या मनानं प्रतिप्रश्न केला, ‘‘तू तुझ्यापुरतं योग्य वागून हे करू शकतोस. म्हणजे पाहा हं. तू शाळेत प्रदूषणाबाबत कायमच शिकतोस. तुझ्या पातळीवर या प्रदूषणाला रोखण्यासाठी मदत करणं हीसुद्धा मातृभूमीची सेवा करण्याचा एक मार्ग आहे.
‘‘मी काय करणारेय प्रदूषण रोखण्यासाठी?’’ दुसऱ्या मनाचा प्रश्न.
त्यावर पहिलं मन लगेच उत्तरलं,‘‘अरे, खूप छोटय़ा-छोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टी करू शकतोस. म्हणजे बघ, तू फक्त एका झाडाचे संवर्धन तर करू शकतोस. कारण प्रत्येकाच्या एकेका झाडाची मिळूनच वनराई होत असते. आणखी एक, जगात आपल्या भारतभूची म्हणजेच पर्यायाने आपली प्रतिमा उजळ राहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता राखणे म्हणजेच- उघडय़ावर कचरा न टाकणं, रस्त्यात न थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने वागणं, स्त्री-पुरुष सर्वाचा आदर करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं हे तूच करू शकतोस. कारण, या सर्वाचं पालन केलं तर नियमबाह्य वर्तनामुळे अडचणीत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’
‘‘काही अडचणीत वगरे यायला होत नाही हं, थोडीशी चिरीमिरी दिली की भागतं, सोड.’’ दुसऱ्या मनाचा सल्ला, ‘‘गडय़ा, लायसन्स मिळण्याआधी गाडी चालवणं, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणं, रहदारीचे साधे साधे नियम मोडणं हे तूच करतोस. यासाठी पकडला गेलास की चिरीमिरी देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न तूच करतोस आणि वर माझा देश भ्रष्टाचारी बनला आहे असा ओरडाही तूच करतोस. खरं सांगू, या भ्रष्टाचारातून बाजूला होण्यात तुझा फक्त एकवेळचा खारीचा वाटा नको, तर सदैव खारीची वृत्ती हवीय आणि ही वृत्तीच आपला देश महासत्ता करू शकेल.
लगेच दुसरं मन कुरबुरलं ‘‘पण मला मोठेपणी इथं कुठं राहायचंय? मी तर तेव्हा परदेशी जाणार.’’ ते झटकून देत पहिलं मन म्हणालं, ‘‘हेच, विकसित देशांना भुलून त्यांच्या दिशेने धावण्यापेक्षा आपला शाश्वत विकास कसा होईल याचा तू विचार केलास तर फार बरं होईल . कारण हा शाश्वत विकास म्हणजे असा विकास, ज्याने विद्यमान पिढीच्या गरजा पूर्ण होतात आणि त्यासाठी पुढील पिढय़ांच्या कौशल्याशी तडजोड न करता त्यांच्याही गरजा पूर्ण करता येतील.’’
‘‘मला नाही हं जमणार हा शाश्वत विकास वगरे’’.. कुरकुरणारं मन.
‘‘अरे, ते काही फारसं मोठ्ठं नाही. खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून तो करता येईल. म्हणजे बघ ऊर्जेचं व पाण्याचं जतन व संवर्धन कर, प्रमाणापेक्षा जास्त चनीच्या वस्तूंची खरेदी टाळ, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य वस्तू वापर. शाळेतील विज्ञान मंडळ, निसर्ग मंडळ वगरेमध्ये सक्रिय सहभाग घे. यातल्या अनेक गोष्टी तू स्वत: करू शकतोस, अगदी कुण्णाकुण्णाची मदत न घेता करू शकतोस की नाही!’’
‘‘हो, तसं करू शकतो.’’.. कुरकुरणाऱ्याा मनाला मान्य करावंच लागलं. ‘‘करू शकतोस ना, मग.. आता मागे कशाला हटायचं?’’.. पुढेच जात राहायचं.. आशावादी मनाचा सल्ला त्यावेळीच समूहगानाचे जोशपूर्ण स्वरांनी लक्ष वेधून घेत होते-
पाउल आता पुढेच टाकू
भारतभूची कीर्ती राखू
हरित क्रांतीचा, विज्ञानाचा
मंत्र संजीवन गाऊ या
चला, चला रे आज तिरंगा
या खांद्यावर मिरवू या…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:05 am

Web Title: incredible india
टॅग : Kids,Kids Story
Next Stories
1 माहितीजाल : झेरॉक्सचे तंत्र
2 डोकॅलिटी
3 आर्ट कॉर्नर : अबलक खबलक घोडोबा
Just Now!
X