हर्ष, सिनिअर, के. जी. दुपारी एक वाजता स्कूल बस मधून उतरला ममा बिल्डिंगखालीच उभी होती. तिला बघूनच ओरडला. ‘ममा, आज जेवायला काय केलयस?’ ‘मुगाची उसळ, कोशिंबीर..’ ममा बोलत होती ते पूर्णपणे ऐकून न घेताच. हर्ष ओरडला, ‘ममा, मला हे नको, मला मॅगीच हवं.’ हळुहळु ‘मला मॅगीच’ हा हट्ट आरडाओरडा ते भोकाडापर्यंत पोहोचला. ममाने खूप समजावून पाहिलं. पपानेही फोनवरून समजूत काढली. पण छे.. हर्ष कुणाचं काही ऐकून घेतच नव्हता. त्याचं एकच म्हणणं.’ मला दुसरं काही नको. खाईन तर मॅगीच. ‘शेवटी हे म्हणणं मला तुम्ही जे हवं ते खाऊ देत नाही पर्यंत पोहोचलं.
* * *
दुसरीतली रिया सुट्टीचे चार दिवस आजी-आजोबांकडे गेली. सुट्टी म्हणून ती सतत टीव्ही अगर कम्प्युटरमध्ये डोळे खुपसून बसणार. मध्येच ओरडणार, ‘आजी, भूक?’ आजीने लाडू दिला तर तो अर्धवट खाणार नि म्हणणार ‘पुरे मला दुसरं काही दे, तिखट’ तिखट म्हणून दिलेली शेवही अर्धीमुर्धीच खाणार अशा अनेक अर्थवट उरलेल्या वाटय़ा बाऊल्स संपवण्याचं आजी – आजोबांच वय नाही. त्यातून रियानं चिवडून टाकलेलं जेवणही वाया जातं. ते पाहून त्यांना वाईट वाटतं. म्हणूनते काही सांगायला गेले की रिया चिडचिड करणार नि म्हणणार, ‘सुट्टी आहे ना, मग काय झालं मी जरा मला हव तस वागले तर.’ दिवसभर काटरुन पाहूनही तिचं ‘एवढंच पाहते की बस्स’ हे संपतच नाही आणि कुणी काही सांगायला गेलं की म्हणायचं. ‘शी बाबा, तुम्ही मला हवं तसं करूच देत नाही.’
* * *
सध्या सातवीत शिकणारा वरद. त्याला स्टेशनरीचा मुबलक वापर करायची आवड. सतत वह्य़ा, पेन्सिली, वेगवेगळे खोडरबर, पट्टय़ा वगैरे खरेदी करत राहायचं. जपून ठेवायचं किंवा वापरायचं नावच नाही. पुन्हा लागलं की पुन्हा खरेदी करायची. त्यावरून आई-बाबा ओरडले की त्यांच्यावरच उलटं कवादायचं.’ काय झालं एवढीशी खरेदी केली तर’ कधी आई-बाबां, आजी आजोबा यांनी छोटय़ाशा जरी खरेदीला विरोध केला की त्यांच्याशी हुज्जत घालायची. ‘त्यात काय मी एवढीशीच वस्तू मागतोय ना आणि शाळेच्या अभ्यासाचीच तर आहे.’ वडिलधाऱ्यांनी म्हटलं की ‘अरे, यातही उगाचच वायफळ खर्च होतो. जर त्यावर सुर लावायचा,’ एवढय़ाशा पैशांसाठी तुम्ही मला नाहीच म्हणणार. माझ्यापेक्षा तुम्हाला पैसाच महत्त्वाचा. तुम्ही मला हवी ती खरेदी नाहीच ना करू देत.’
* * *
मनू, इयत्ता नववी, आजी-आजोबा, काका-मामा, मावशी-आत्या या सर्वाची खूपच लाडकी. त्यामुळे सारेजण मनू मागेल ते तिला घेऊन देतात. त्यात मनूला वेगवेगळे ड्रेसेस वापरायची प्रचंड आवड. त्यामुळे कोणाला कोणाबरोबर जाऊन वेगवेगळ्या फॅशनचे कपडे खरेदी करणं हे ठरलेलंच. पण ते घरी घेऊन आलं की तिला त्यात खूपच त्रुटी दिसतात. एखादा ड्रेस रंगच चांगला नाही म्हणून बाजूला पडतो तर एखाद्याची फॅशन किंवा कॉम्बिनेशन योग्य वाटत नाही. काही काही ड्रेसेसच फिटींग चांगलं नसतं. तर काहीकाही तिला ओल्ड फॅशन वाटतात. यामुळे मनूचं कपाट दीड-दोन हजारात किंमत असणाऱ्या पण एकदाही न वापरलेल्या अनेक ड्रेसेसनी भरतं. त्यावर कधी मम्मी म्हणाली की ‘घेताना का ग विचार करत नाहीस’ तर त्यावर मनूचं भाष्य असतंच. ‘हे काय ग मम्मी, मला हवे तसे ड्रेसेस का म्हणून घेऊ देत
नाहीस तू.’
* * *
या वर्षी अकरावीत गेलेल्या मधुरा किंवा आदिचंच उदाहरण घ्यायचं तर कॉलेजचा वाढता अभ्यास आणि वेळ यांची सांगड घालण्यासाठी घरातल्यांनी बाईक घेऊन दिलेली आहे. ती वाट्टेल तशी वापरण, ट्रिप्सी फिरणं, रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहणं. वाट्टेल तेव्हा चावी घेऊन न सांगता सवरता बाहेर राहणं यात होणारी वाढ आई-बाबांच्या सहज लक्षात आल्यावर त्यांनी अनेकदा समजूत काढली, गरजेनुसार कानउघाडणी केली. शेवटी असह्य़ झालं तेव्हा गाडीची चावी जप्त करण्याचीही कारवाई करून पाहिली. पण यावर प्रत्येकवेळी त्यांचा थयथयाट आणि वर म्हणणं,’ माझी गाडी आहे ना मग मी का नाही मला हवी तशी वापरायची, तुम्ही का मला बंधन घालता?’
या आणि यासारख्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत पहायला मिळतात. आपल्या अनेक मित्रमंडळींची तक्रार असते की मला हवं तसं करता येत नाही, वागता येत नाही. खाता येत नाही, राहता येत नाही म्हणजे काय, तर मला स्वातंत्र्य नाही. कारण त्यांच्यामते स्वातंत्र्य म्हणजे स्वत:ला हवं ते स्वत:ला हवं तेव्हा करणे आणि ते तसं करता आल नाही की सुरू होते ती धुसफूस, रागराग, चिडचिड, दुरुत्तर, भांडण. आणि त्यातून कुटुंबाचं स्वास्थ्य बिघडण हा शेवट.
पण, स्वत:ला हवं तसं वागणं हा स्वैराचार असतो आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नसून, जबाबदारी हा असतो. त्यामुळे वर आपण पाहिलेल्या घटनांमधील बेजबाबदारपणा हा स्वातंत्र्याचा भागच नाही. कारण या बेजबाबदार पणातून स्वहित, समाजहित आणि देशहिताला बाधा पोहोचते. त्यातून होणारे नुकसान भरून निघत नाही.
त्यामुळेच स्वातंत्र्य जबाबदारीने वापरलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या म्हणण्यानुसार ‘जे जे उत्तम, उदात्त उन्नत महन्मधुर ते, ते, स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते.’ तेव्हा मित्रांनो असं उत्तम, उदात्त, उन्नत सहकाऱ्यांनी झळाळणार स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बेपर्वाई टाळा आणि जबाबदारीला कवटाळा. चला तर, या स्वातंत्र्यदिनाला स्वत:पासून स्वातंत्र्याचा आनंद लुटायला शिका.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!!