‘‘आजी, अगं हा केवढा धूर! समोरची सोसायटी दिसतच नाहीये.’’ एरवी सूर्यवंशी असणारी रती आज आजीच्या एका हाकेत उठून तिला शोधत गॅलरीत आली होती. आजीने उद्या लवकर उठलीस तर तुला गंमत दाखवणार आहे, असं कबूल केलं होतं ना!  वातावरणातील गारव्यामुळे आजीच्या पदरात हातांची जुडी लपवत मिचमिच्या डोळ्यांनी ती आजूबाजूचं सगळं दिसत कसं नाही, या विचारानं आश्चर्यचकित झाली होती.

‘‘धूर नाही काही तो वेडाबाई, धुकं पडलंय आज. तुझ्या मैत्रिणीचं घरही धुक्यात लपून बसलंय. हीच गंमत दाखवायची होती तुला. आता सूर्य वर येईल आणि त्याच्या कोवळय़ा सोनेरी किरणांनी धुकं विरून जाईल आणि सगळं दिसायला लागेल. थंडी पडणार आता, बरं का! ती येते, काही दिवस राहते आणि जाते,’’ असं म्हणत आजीने लवकर उठल्याबद्दल रतीला शाबासकी दिली.

‘‘म्हणजे संपला एकदाचा पावसाळा. मला जराही आवडत नाही तो. सगळीकडे ओलं ओलं असतं. नवीन कपडेही घालता येत नाहीत.’’ – इति रती.

‘‘आजी, रती खोटं बोलतेय. पावसाळय़ात खूप भिजायला मिळतं, शाळेला बुट्टी मिळते म्हणून तिला पाऊस खूप आवडतो, असं ती म्हणाली होती.’’ शेजारच्या गॅलरीतून नेहाने चुगली केली.

‘‘एऽऽऽ’’ रती कुरकुरली.

‘‘अगं पोरींनो, रतीलाच काय, तुम्हा-आम्हा सर्वानाच तोच तोचपणाचा कंटाळा येतो. म्हणूनच हे ऋ तुचक्र फिरत असतं. आंबा खायला मिळणार म्हणून तोंडाला पाणी सुटतं, पण हाशहुश घामाच्या चिकचिकाटाने आपण उन्हाळय़ाला कंटाळतो आणि केव्हा एकदा पाऊस पडेल याची वाट बघत असतो. पावसाळा आपल्याला पाणी- म्हणजे जीवन देतो. हिरवं हिरवंगार नेत्रसुख देतो, परंतु अति परिचयात अवज्ञा होते आणि आपल्याला थंडीचे वेध लागतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं ऋ तुचक्र फिरत असतं. आणि आता ते हिवाळय़ापर्यंत येऊन पोहोचलं आहे. निसर्गानेच अशी योजना केली आहे. वर्षांचे ३६५ दिवस आपल्याला या ना त्या कारणाने हवेहवेसे वाटत राहिले पाहिजेत.’’

‘‘मला थंडी खूप म्हणजे खूपच आवडते.’’ नेहाने आजीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘का आवडते सांग बघू.’’  आजीने तिला शब्दात पकडले.

‘‘आमच्या शाळेची सहल असते थंडी पडली की. तेव्हा बसमध्ये बैठे खेळ- अंताक्षरी, ‘दमशेर आहे’ असे खूप खेळ आम्ही खेळतो. मस्त मज्जा येते.’’ सहलीच्या आठवणीने नेहाचे डोळे लकाकले.

अभ्यास करत बसलेल्या अथर्वला बोलल्याशिवाय राहवले नाही. ‘‘ए, कुठे पडली तुझी थंडी? खूप लागलं का? तेल आणून देऊ का लावायला?’’

‘‘आजी, हा बघ नं कसा करतोय! काहीतरी बोलतो.’’ नेहाला उत्तर न सुचल्यामुळे ती वैतागली.

‘‘आमचे शालेय आणि आंतरशालेय सामनेसुद्धा असतात या दिवसांत आजी. संध्याकाळी शाळा सुटल्यावर आम्ही शाळेच्या मैदानात बास्केटबॉलचा सराव करणार आहोत. मला उशिरा न्यायला यायला सांग आईला.’’ खेळकर रतीने चार-दोन उडय़ा मारत आपला हात कुठपर्यंत पोहोचतोय याचा अंदाज घेतला.

‘‘शिवाय आपलं स्नेहसंमेलन विसरलात की काय दोघी जणी?’’ अथर्वची नाटकातील प्रमुख भूमिकेसाठी निवड झाल्यामुळे स्वारी खुशीत होती.

‘‘आम्ही बऱ्या विसरू. ‘उंच माझा झोका’च्या संपूर्ण गाण्यावर आम्ही दोघी नाच करणार आहोत. शिवाय आमचं हस्तलिखितपण आहे. त्यात ‘दिवाळीची सुट्टी कशी घालवली’ हा लेख मी लिहिणार आहे. आजी, तू वाचून बघशील ना ग?’’ रतीची गाडी खुशीत पुढे चालली.

‘‘आणि मी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेचा अनुभव लिहिणार आहे. हस्तलिखिताची सजावटही आम्ही करणार आहोत.’’ नेहाने बातमी दिली.

‘‘शाळेतल्या संमेलनाबरोबरच नाटय़ संमेलन, साहित्य संमेलन, ज्ञातींची संमेलनं यासाठी हिवाळाच अनुकूल असतो. भटकंती, गिर्यारोहण यासाठी थंडीच बरी वाटते. लग्न समारंभासाठीसुद्धा याच दिवसातला मुहूर्त निवडण्यात येतो. नटूनथटून समारंभ कसे उत्साहात पार पाडले जातात. घामाचा चिकचिकाट नाही आणि भिजण्याची भीती नाही, खरं ना!’’

‘‘आजी, आता वातानुकूलित हॉलचा पर्याय उपलब्ध आहे बरं का!’’ रतीने हळूच आजीला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. हसून त्याची नोंद घेत आजीचं भाषण चालूच राहिलं. ‘‘थंडी आली की खास लोकरीचा स्वेटर, मफलर, कानटोपी, लांब हाताचे कपडे, जॅकेट, काळाप्रमाणे आधुनिक पेहराव यांच्या खरेदीचा फंडा असतोच. आपण अंगावर जास्त कपडे चढवून थंडीपासून स्वत:चं रक्षण करतो. याउलट, हिरवी सृष्टी काय करते पाहताय ना! पानगळीची सुरुवात होते. पानांचे ‘कुरकुरे’ खाली येऊन जमिनीला झाकून टाकतात. नव्हे, थंडीमुळे भेगा पडण्यापासून तिला वाचवतात. किती विरोधाभास आहे हा.’’ कुरकुऱ्यांच्या आठवणीने सगळेच कुरकुरत राहिले.

‘‘आजी, तू डिंकाचे आणि अळिवाचे लाडूसुद्धा करतेस ना थंडीत. केव्हा एकदा खाईन असं झालंय. पण मेथीचे करणार नाहीस ना? नको ना करू.’’ रतीने लाडीगोडी लावली.

‘‘करणार तर! मेथीच्या पेढय़ाएवढय़ा लाडवावर डिंक लाडू फ्री देईन, चालेल?’’

‘हो’ म्हणत सगळय़ांनी संकट पुढे ढकललं.

‘‘आजी, सध्या अगदी गुलाबी थंडी आहे; पण कधी तिचं रूप पालटेल सांगता येत नाही. झोंबणाऱ्या वाऱ्यांनी ती बोचरी होईल. काही ठिकाणी तर तापमान कमी कमी होत बर्फवृष्टीसुद्धा होईल.’’ रतीनं खऱ्या अर्थाने थंडीचं चित्र रंगवलं.

‘‘मला जरा जरा थंडी वाजतेय आता आणि अंगावर काटासुद्धा आलाय.’’ रतीच्या मनात थंडीने जागा पटकावली.

‘‘हो, कुठे वाजतेय? मला आवाज येत नाहीये आणि काटा आलाय? थांब मी काढून टाकतो.’’ अथर्वला दोघींना चिडवायला निमित्त मिळालं. युद्धच व्हायचं; पण आजीच्या मध्यस्थीमुळे एकेका धपाटय़ावरच ते थंड  झालं.

सुचित्रा साठे lokrang@expressindia.com