News Flash

मोठय़ांसाठीची छोटय़ांची गोष्ट

आईच्या मोबाइलची रिंग वाजली आणि नेहमीप्रमाणेच अर्णव फोन घेण्यासाठी धावत गेला.

|| मेघना जोशी

आईच्या मोबाइलची रिंग वाजली आणि नेहमीप्रमाणेच अर्णव फोन घेण्यासाठी धावत गेला. स्क्रीनवर अमृताताईचं नाव पाहताच फोन घेत ‘‘हॅलो, ताई कधी येणारेस? खूप आठवण येतेय मला तुझी,’’ असं अमृताला बोलायची उसंतही न देता विचारत सुटला.

‘‘हो, हो, येणारेय ना लवकरच, याच आठवडय़ात.’’ ती म्हणाली.

तसं आईला हाका मारत अर्णव म्हणाला, ‘‘आई, अमृताताईचा फोन आहे, येणारेय आता ती मला भेटायला.’’ अमृताचं नाव ऐकताच आईसुद्धा कणकेचे हात घेऊन तशीच बाहेर आली आणि अर्णवला फोन स्पीकरवर टाकायला सांगितला. कारणही तसंच होतं. दहावीनंतर आत्ताच ती थोडय़ा मोठ्ठय़ा शहरात शिक्षणासाठी गेली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच घरी येणार होती. फोनवर तिचं हे बोलणं ऐकून साहजिकच आईही आनंदित आणि उत्साहित झाली.

‘‘राहणार आहेस ना चार दिवस?’’ आईच्या या प्रश्नावर अमृता म्हणाली, ‘‘अगं, पंधरा ऑगस्टनंतरच येणारेय परत इकडे. आणि पंधरा ऑगस्टला मी आपल्या शाळेत येणारे बरं का अर्णव ध्वजवंदनासाठी.’’ हे ऐकल्यावर फक्त अर्णवचाच नाही तर आईचाही आ वासला होता. पंधरा ऑगस्टला शाळेत जाणारेय म्हणत्येय ही पोरगी. राष्ट्रीय सणाचा आणि सुट्टीचा हा दिवस शाळेत काय जायचं त्या दिवशी ध्वजवंदनाला. त्यापेक्षा एखादी छोटीशी पिकनिक काढता येईल ना. पण हे विचार मनातच ठेवत आईने फोन आटोपता घेतला नि अर्णवही ‘नंतर पाहू’ म्हणत गप्प बसला.

शनिवारी अमृता आली आणि जवळजवळ चार महिन्यांनी घरात परत चिवचिवाट सुरू झाला. पहिल्यांदा इथल्या गप्पा तिला सांगणं, तिच्या शहरातल्या घटना विचारणं, मग अर्णव आणि अमृता यांच्या स्पेशल गप्पा आणि जोरजोरात हसणं वगरे वगरे चालू होतं. त्यातच रात्री जेवताना सारे एकत्र जमले तेव्हा आईने विषय काढला.

‘‘अर्णव, पंधरा ऑगस्टच्या सुट्टीची नोटीस आली का रे शाळेत? आपण सगळे त्या दिवशी एखादी पिकनिक काढू या का जवळच्या धबधब्यावर?’’ अमृता आणि बाबांच्या यावरच्या मतांचा अंदाज घेत होती ती हळूच. अर्णव जोरात ‘धबधबा, ए..’ असं ओरडला. बाबांनीही घास घेता घेता होकारार्थी मान हलवली. अमृताने मात्र एकदम कडाडून विरोध केला. ‘‘आनंद कसला झालाय तुला अर्णव? आणि ओरडतोस काय असा जोरजोरात. कधी गेला नाहीस का याआधी धबधब्यावर.’’ आई, बाबा दोघेही तिच्याकडे पाहू लागले. हातातला घास हातातच राहिला त्यांचा. हिला काय झालं चिडायला आत्ता.’’

तेवढय़ात तिनेच पुढे सुरू केलं. ‘‘अर्णव, मी तुला परवाच सांगितलं ना फोनवर की मी शाळेत येणारेय ध्वजवंदनाला. मला शाळेत यायचंय, कारण मी एक नवीन गोष्ट शिकलेय. नाहीतर मला एक साक्षात्कार झालाय म्हण ना! काय झालं अर्णव, परवा आमच्या कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमावेळी एक गंमतच झाली. खरं तर, तो टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणून जाहीर केला नव्हताच, तर तो जाहीर केला होता व्यक्तिमत्व विकासाचा कार्यक्रम म्हणून. त्यामुळे कार्यक्रमाला भरपूर गर्दी जमली होती. तिथे गेल्यावर सादरकर्त्यांनी चक्क रहडळ अठअछरकर ची माहिती दिली. त्यात बलस्थाने, दुर्बलता, संधी आणि धोके यावर लोकमान्य टिळकांच्या उदाहरणातून सुंदर विवेचन केलं. भाषा, गणित, वक्तृत्व ही आपली बलस्थाने त्यांनी कशी उत्तम रीतीने वापरली आणि महाविद्यालयीन आयुष्यात आपले दुर्बल शरीरही आपली दुर्बलता आहे हे ओळखत त्यावर मात करण्यासाठी एक वर्ष वेळ काढला. सामाजिक जीवनात त्यांनी उत्सवप्रिय भारतीयांच्या गणेशोत्सव आणि शिवजयंती या सणांना सामुदायिक रूप देत, समाजजागृतीची संधी हेरली आणि बरोबरच निरक्षरता आणि भारतीयांनी गमावलेला स्वाभिमान हे धोके आहेत हे जाणत या सगळ्यांचा अचूक समन्वय साधत लोकमान्य टिळकांनी आपल्या साध्याच्या दिशेने वाटचाल चालू ठेवली.

याला पूरक म्हणून अनेक देशसेवकांची आणि देशभक्तांची उदाहरणं दिली गेली बरं तिथे. आणि त्यांनी आपल्या राष्ट्रीय सण साजरे करण्यामागचा हेतूही स्पष्ट केला. अनेकदा अनेकजण त्याकडे फक्त सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणूनच पाहतात. पण आपल्या देशाचा अशा प्रकारे विचार करण्यासाठी, त्यावर प्रत्येक नागरिकाने आपापल्या पद्धतीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे योग्य उपाययोजना आखून अमलात आणण्यासाठी हे दिवस असतात, मनमौजीपणा करण्यासाठी नाहीत. आणि या सगळ्याची सुरुवात आपण प्रत्येकाने त्या दिवशी झेंडावंदन करण्यापासून करायची असते. म्हणून आपण सगळे जाणार आहोत झेंडावंदनाला शाळेत, प्रगतीसाठीचं हे रहडळ अठअछरकर करण्यासाठी.’’ आई-बाबांनी भारावून जात होकारार्थी मान हलवली आणि अर्णव म्हणाला, ‘‘मला सगळंच काही समजलं नाही, पण समजावून घेईन मी तुझ्याकडून. पण शाळेत ध्वजवंदनाला जाणार हे मात्र नक्की!’’

joshimeghana.23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 3:13 am

Web Title: moral stories for kids mpg 94 4
Next Stories
1 वेड घेऊन पेडगावास जाणे
2 टोपीवाला तात्या
3 चिरपा
Just Now!
X