मागच्या लेखात आपण पावसाळ्यातील सुरुवातीच्या काळात येणाऱ्या वनस्पतींची माहिती घेतली होती. त्या लेखामध्ये आपण श्रावण महिन्यातील निसर्गनिरीक्षणांबाबतही विचार केला होता. अर्थात, सध्या श्रावण महिना सुरू आहे. निसर्गातील अनेक नवनवीन गोष्टी आपली वाट पाहत आहेत. नुकतीच नागपंचमी साजरी झाली. परंतु आपण नागपंचमीचे महत्त्व कधी ओळखले आहे का? निसर्गात घडणाऱ्या विविध बदलांमध्ये या नागपंचमीचे महत्त्व फारच आहे. पावसाळ्यातील श्रावण महिना म्हणजे धो-धो पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होऊन तो रिप-रिप पडायला लागतो. सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. याच सुमारास शेतांमधील पेरणीचे कामही पूर्ण होऊन पिकांच्या वाढीस सुरुवात झालेली असते. यामुळेच शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात उंदीर, घुशी, बेडूक, छोटे-मोठे कीटक यांचा वावर वाढलेला असतो. याचे कारण असेही असते की, या दिवसांत बहुतेक बिळांमध्ये पाणी भरलेले असते व अनेक छोटय़ा छोटय़ा पाणथळ जागांमध्ये विविध छोटे जीव, बेडूक, मासे हे आपली अंडी घालतात. अर्थात, कोणत्याही एका प्राण्याची किंवा प्रजातीची पदास ही त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रजातींसाठी नेहमीच उपकारक असते. म्हणूनच या काळात शेतातील या जीवांवर अवलंबून असलेल्या सापांचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आढळून येते. साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत, एवढीच माहिती आपल्याला असते; परंतु या संदर्भात आपण प्रत्यक्ष कधी निरीक्षणे करण्याचा प्रयत्न केला आहे का? याचा अर्थ असा नव्हे, की प्रत्यक्ष आपण नसíगक क्षेत्रात जाऊन साप किंवा नाग पाहिले पाहिजेत. पण शेतांमधील किंवा त्याच्या जवळपास असणाऱ्या परिसंस्थेमध्ये असे कोणकोणते जीव एकत्र येतात, की जे एकमेकांवर अवलंबून आहेत, याचे मात्र आपण निश्चितपणे निरीक्षण करू शकतो. अगदी सहजपणे तुम्ही या दिवसांत वारुळाचे निरीक्षण केले आहे का? या वारुळातही काही बदल अगदी जाणवण्याइतके होत असतात. यातील काही भागांमध्ये पांढऱ्यास्वच्छ मशरूम किंवा अळंबीची वाढ मोठय़ा प्रमाणात झालेली दिसते. सर्वसाधारणपणे अशा वारुळांवर येणारी अळंबी काही लोक खाण्याकरिता वापरतात. रानावनात अशा कोठेही येणाऱ्या वारुळांचे परिसंस्थेमधील महत्त्व काय असेल, याची आपण माहिती घेण्याचा जरूर प्रयत्न करावा. खरं तर श्रावण महिन्यात नागपंचमीसारखे इतर अनेक पारंपरिक सण साजरे होत असतात व या प्रसंगी अनेकविध वनस्पतींचा वापर केला जातो. या सर्वाचे शास्त्रीय महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्याकडील सागरी भागांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळापासून ते रक्षाबंधनाच्या सणापर्यंत स्थानिक मच्छीमार  मासेमारी करीत नाहीत. याची कारणे  समजून घेतली तर आपणास निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यास सोपे होईल. आपल्याला उपकारक असणाऱ्या भोवतालच्या जीवसृष्टीला आपण सांभाळले पाहिजे, हाच संदेश या सणांच्या निमित्ताने आपणास मिळतो.

एकंदरीतच श्रावण महिना या अशा निरीक्षणांकरिता महत्त्वाचा ठरतो. याच दिवसांत अनेक प्रकारच्या झाडांना फुले यावयास सुरुवात होते. तुम्ही कास पठाराचे नाव ऐकले असेल. हे पठार केवळ अशा अत्यंत मोहक व प्रदेशनिष्ठ वनस्पतींसाठी जगप्रसिद्ध आहे. यातील काही वनस्पती तर केवळ याच पठारावर सापडतात. परंतु कास हे केवळ एकच असे पठार आहे असे नव्हे, तर महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये डोंगरांवरील अशी पठारे आपणास पाहावयास मिळतात. या पठारांवर गवतांमध्ये विखुरलेल्या अनेक वनस्पती क्रमाक्रमाने फुलत जातात व शेवटी थोडय़ा मोठय़ा वनस्पतींना फुले येतात. या क्रमाक्रमाने बदलत जाणाऱ्या वनस्पतींनुसार त्यांच्या आजूबाजूच्या किंवा त्यावर अवलंबून असणाऱ्या कीटक, फुलपाखरे, त्यावर येणारे पक्षी इत्यादी बाबतीतही बदल होत असतात. सुरुवातीच्या काळात या झाडाझुडपांनी व्याप्त केलेल्या पठारांवर नंतर गवतांच्या विविध प्रजातींचे विस्तारीकरण होते व काही भागांमध्ये ही गवताळ राने त्याची तोड होत नाही तोपर्यंत तशीच राहून वाळून जातात. या ठिकाणी आपण जरा या बदलत्या ऋतूप्रमाणे आपल्या परिसरातील होणाऱ्या जीवसृष्टीचा बदल लक्षात ठेवण्याकरिता या अशा निसर्गदत्त बाबींचे सतत निरीक्षण करीत राहिले पाहिजे. यातील कित्येक कीटकांचे वैशिष्टय़ हे ते ज्या झाडांवर अवलंबून असतात किंवा त्यांचे भक्ष्य ज्याप्रमाणे आढळते त्या प्रकारे असल्याचे दिसून येते. आपण या श्रावणातील काही बदलांचे तसेच आपल्या भागातील पठारी प्रदेशांचे, त्यावरील रानफुले, गवत या एकंदरीत परिसंस्थेवर अवलंबून असणाऱ्या जैवविविधतेचे निरीक्षण नोंदवून ठेवा व शक्य असल्यास जरूर कळवा.

rahumungi@gmail.com