श्रीपाद

माझ्या बालबल्लव आणि छोटय़ा सुगरणींनो,  मी तुम्हाला म्हणाल तर अस्सल पारंपरिक आणि तरी थेट परदेशातून आणलेली पाककृती सांगणार आहे. ही पाककृती मी सांगायची ठरवलीय त्याला खास कारण आहे. आपले पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ न सांगता मुलांना परदेशी, आरोग्याला घातक पदार्थ तुम्ही सांगता अशी काही पत्रं मला मिळाली. काही वाचकांनी तर माझा पिच्छाच पुरवला. शिवाय माझ्या एका चिमुकल्या मित्राला मी दिवाळीत भेटलो आणि आजचा लेख लिहायचं पक्कंच केलं. या चिमुकल्याला पिझ्झा प्रचंड आवडतो. पास्त्यावर तो ताव मारतो. मात्र ते कसे असतात असं विचारलं की तो ‘वाईट्ट’ असं सांगतो. मला प्रश्न पडला की, आपलं-परकं आपण अन्नाबाबतीतही करायला लागलो तर हा आपपरभाव अन्नापर्यंत आपल्या अगदी आतपर्यंत पोहोचेल की! आधी झटपट आजचा पदार्थ करायला घेऊ, मग त्याची छान गोष्ट सांगतो.

साहित्य : प्रत्येकी वाटी घट्ट दही, दहा-बारा छान पिकलेली अंजीर, दोन-चार पिकलेली केळी, तुम्हाला आवडेल तो सुका मेवा, जसं- बेदाणे, बदामाचे काप, लाल भोपळ्याच्या वाळवून सोललेल्या बिया. चवीनुसार दोन-चार चमचे मध. एक-दोन चिमूट मीठ.

उपकरणं : दही गाळण्याकरता बारीक गाळणं आणि त्यातलं पाणी साठवण्याकरता योग्य आकाराचं भांडं. खाण्याकरता आणि पदार्थ वाढण्याकरता वाटी-चमचा, सुकामेवा आणि फळं चिरण्याकरता विळी किंवा सुरी-पाट. तुम्हाला थोडी अधिक लज्जत वाढवायची तर आचेकरता गॅस किंवा इंडक्शन शेगडी आणि जाड बुडाचा किंवा बिडाचा तवा आणि लांब उलथणं. फळं काढून ठेवण्याकरता ताट. थोडं लोणी.

हा पदार्थ अगदी सोप्पा, झटपट होणारा आणि तरी खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे. तो दिसायलाही खूप आकर्षक आहे. खरं म्हणजे, या पदार्थाला तशी पाककृती काही नाहीच मुळी. आहे की नाही गंमत?

सगळ्यात आधी घरातलं घट्टसर, गोडूस दही घ्या; दही फार आंबट असता नये. मग दही एका बारीक जाळीच्या गाळण्यामध्ये घालून एका पातेल्यावर किंवा भांडय़ावर ठेवा. त्यातून जास्तीचं पाणी निघून गेलं पाहिजे. दही चक्क्याला ठेवतात तसं रात्रभर ठेवायची गरज नाही, ते पिळायचीही गरज नाही. वेळ असेल तर दही फडक्यात गुंडाळून तास-दोन तास ठेवायलाही हरकत नाही.

आता हे दही पदार्थ वाढायच्या वाटय़ांमध्ये मोठा डाव भरून घाला. त्यावर किंचित मीठ पेरा. फार नाही, अगदी चतकोर चिमूट बरं का! मग त्यावर अंजिराचे आणि केळ्याचे काप टाका, त्यावर सुक्या मेव्याचे काप किंवा अख्खा सुकामेवा घाला. त्यावर मध घाला आणि थंड खा. अगदी कुणालाही करता येण्याजोगी, फार कष्ट नसलेली ही पाककृती आहे.

या पाककृतीची लज्जत आणखी वाढवायची असेल तर गंमत सांगतो. आधी देखरेखीकरता घरातल्या वयस्कर माणसाला सोबत घ्या. कारण विस्तवाशी काम करायचं आहे. तयारी म्हणून अंजीर दोन भागात, देठ ते बूड असं कापा. केळ्याचे लांबीप्रमाणे दोन किंवा तीन तुकडे करून ते उभे कापा. ही कापाकापी होईतो मध्यम आचेवर जाड बुडाचा तवा तापवून घ्या. त्यावर लोणी घाला. आता अंजिराचा आतला भाग आणि केळ्याचा बियांकडचा कापलेला सपाट भाग तव्यावर ठेवून अंजिरं साधारण मऊसर होईतोवर आणि केळ्यावर छान लाली येईतोवर भाजा. साधारण दोन-तीन मिनिटं लागतील. आता ही भाजलेली फळं बाजूला एका ताटामध्ये काढून ठेवा. पदार्थ खायला घेण्यावेळी वाटीमध्ये घट्ट, थंड दही खाली घाला. त्यावर मीठ पेरा. त्यावर फळांचे भाजलेले काप आणि सुकामेवा घाला. भाजल्यामुळे फळांची गोडी वाढते, तेव्हा मध न घालताही हा पदार्थ छान लागेल. पण गोड कुणाला आवडत नाही, तेव्हा यावरही मध घालून ही दह्य़ाची वाटी फस्त करा.

निरनिराळ्या ऋतूंमध्ये मिळणाऱ्या विविध फळांचा असा स्वाद तुम्हाला घेता येईल. हिवाळ्यामध्ये बेरीज् मिळतील त्यांचा वापर करू शकाल- स्ट्रॉबेरी, चेरी, बोरं. त्यासोबतच चिकूचे जाडसर काप आणि स्ट्रॉबेरीची जोडी छान जमते. भाजलेल्या फणस गरे-केळ्यांची किंवा चिकू-केळ्याची जुगलबंदी देखील छान लागते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या निरनिराळ्या प्रकारांना एकत्र करून हा पदार्थ छान लागतो. पिकल्या हापूसच्या गोड फोडी आणि तोतापुरीच्या आंबट-गोड फोडी छान लागतात. यामध्ये कुरकुरीतपणाकरता आपल्याकडच्या साळीच्या लाह्य, कुरमुऱ्याच्या लाडूचे तुकडे किंवा बाजारातून मिळणारे कॉर्नफ्लेक्सदेखील घालता येतील.

आता या पदार्थाची गंमत सांगतो. योगर्ट बॉऊल हा मूळचा ग्रीक गोडाचा पदार्थ. घट्ट दही, त्यामध्ये किंचितसं मीठ आणि मध असा हा साधासुधा आटोपशीर पदार्थ. आपल्याकडे महाभारतातही भीम बल्लवाचार्याचं सोंग घेऊन अज्ञातवासात असताना त्याने केलेल्या शिरीखंडाचा उल्लेख आहे. दह्यमध्ये फळांचे तुकडे घालून केलेला हा पदार्थ. त्या काळी साखर नव्हतीच, तेव्हा त्यावेळी हे शिरीखंड मधापासूनच गोडवा मिळवत असे. जगभर मिळणारे योगर्ट बॉऊल्स आता नानाविध प्रकारांमध्ये मिळतात- त्यामध्ये फळांपासून, सुक्या मेव्यापासून पार कुरमुरे, कॉर्नफ्लेक्स, फ्लॅटन्ड ओट्सपर्यंत वैविध्य आढळतं. आपल्याला आवडेल तो प्रयोग करून पाहता येतो.

ग्रीक योगर्ट बॉऊलचं असं हे आपल्या पार पुरातन शिरीखंडाशी असं सख्खं नातं आहे. आजच्या काळात मिळणारे, खासकरून आरोग्यदायी खाण्याकडे विशेष लक्ष देणाऱ्यांच्यात योगर्ट बॉऊल एक सकाळच्या नाश्त्याकरता प्रसिद्ध झालेला पदार्थ आहे. झटपट होणारा, चविष्ट, सर्वगुणसंपन्न असा हा पदार्थ म्हटला तर कॉण्टिनेण्टल-मेडिटेरेनिअन, अर्थात परदेशी आणि म्हटला तर खास आपला आहे. पण माझं म्हणणं, या आपपरभावामध्ये न शिरता आपल्याला सहज उपलब्ध जिनसांमधून करता येईल. जिभेला रुचेल, पोटाला पचेल आणि आपल्याला पोषक असा कोणताही पदार्थ करायला, चाखायला आणि खाऊ घालायला काय हरकत असावी बच्चे हो?   (समाप्त)

contact@ascharya.co.in