News Flash

सियोना आणि मेणबत्त्या

आजीबाई गेल्यावर सियोना व तिची आई नाताळ कसा साजरा करायचा ह्याचे बेत करत झोपी गेल्या.

मेणबत्तीच्या उजेडात सियोनाला नाताळच्या जेवणासाठी सजवलेलं टेबल दिसलं.

द रवर्षी सियोनाची आई नाताळसाठी रंगीबेरंगी मेणबत्त्या बनवायची. कृत्रिम फुलापानांनी नटवलेल्या त्या सुंदर सुंदर मेणबत्त्या सियोना विकायला घेऊन जायची. त्यातून मिळालेल्या पैशांतून दोघी जणी नाताळ साजरा करत. यंदा आईनं या पैशांतून सियोनासाठी लाल स्वेटर, टोपी आणि स्वत:साठी बूट व हातामोजे घ्यायचं ठरवलं होतं; पण त्यासाठी सगळ्या मेणबत्त्या विकल्या जाणं जरूरीचं होतं.
एक दिवस सियोना आईनं तयार केलेल्या मेणबत्त्या विकायला निघाली. बाहेर कडाक्याची थंडी आणि बोचरं गार वारं सुटलं होतं. थोडय़ा मेणबत्त्या विकून झाल्या आणि अचानक बर्फ पडू लागला. सियोनाच्या अंगात अगदी पातळ स्वेटर होता. डोक्यावरची टोपी फाटली होती. तिला थंडीनं चांगलीच हुडहुडी भरली. ती एका घराच्या आडोशाला जाऊन बसली. अंगातली थंडी कमी होईना. शेवटी सियोनानं एक मेणबत्तीचं पाकीट उघडलं आणि त्यातली एक मेणबत्ती कढून ती पेटवली. त्याच्यामुळे थोडीशी ऊब मिळाली आणि दमलेली सियोना गाढ झोपून गेली.
मेणबत्तीच्या उजेडात सियोनाला नाताळच्या जेवणासाठी सजवलेलं टेबल दिसलं. टेबलावर तिच्या आईनं बनवलेल्या लालचुटुक पॉन्सेटियाच्या पानातल्या दोन मोठय़ा मेणबत्त्या पेटवून ठेवल्या होत्या. भाजलेली टर्की आणि बटाटे, ख्रिसमस पुडिंग आणि असेच छान छान पदार्थ टेबलावर ठेवले होते. सियोनाला भाजलेल्या टर्कीचा खमंग वास आला; तेवढय़ात मेणबत्ती विझली व तिनं बघितलेलं टेबल दिसेनासं झालं.
सियोना हात-पाय दुमडून तशीच बसून राहिली. तिनं परत एक मेणबत्ती पेटवली. थोडीशी ऊब मिळाल्यावर तिनं आपले डोळे मिटून घेतले. मेणबत्तीच्या उजेडात तिला तिच्या आईनं तयार केलेल्या रंगीत मेणबत्त्यांच्या प्रकाशानं उजळून गेलेली त्यांच्या घरातली खोली दिसली. तिथे रंगीबेरंगी दिवे लावलेले ख्रिस्मस ट्री व त्याच्याजवळ ठेवलेल्या खूप भेटवस्तू होत्या. त्यात लाल स्वेटर व टोपी असेल असं समजून सियोना ते घेण्यास उठली, तेवढय़ात मेणबत्ती विझली आणि तिनं बघितलेल्या भेटवस्तू आणि ख्रिस्मस ट्री दिसेनासे झाले.
सियोना खूप खट्ट झाली. मेणबत्त्या विकल्या गेल्या नाहीत तर नाताळ नाही आणि भेटवस्तूपण नाहीत, ह्या विचारानं तिच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. ती हुंदके देऊन रडायला लागली. इतक्यात तिला समोर मेणबत्तीचा उजेड दिसला आणि त्या उजेडात एक आजीबाई तिच्याजवळ येताना दिसल्या. त्यांनी सियोनाच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि तिला विचारलं, ‘‘बाळा तू का रडते आहेस?’’
सियोना आजीबाईंना म्हणाली, ‘‘मी आईनं तयार केलेल्या मेणबत्त्या विकायला गेले होते, पण अजून खूप मेणबत्त्या शिल्लक आहेत. त्या विकल्या गेल्या नाहीत तर आम्ही नाताळ साजरा करू शकणार नाही. त्या पैशांतून आईसाठी बूट आणि हातमोजे घ्यायचे आहेत. माझ्यासाठी लाल रंगाचा स्वेटर आणि टोपी घ्यायची आहे.’’
त्या बाई म्हणाल्या, ‘‘एवढेच ना. मला नाताळसाठी मेणबत्त्या घ्यायच्या आहेत. त्या मी तुझ्याकडून विकत घेते.’’ सियोना ते ऐकून खूश झाली. तिने आजीबाईंना आपल्या जवळच्या मेणबत्त्या दाखवल्या व म्हणाली, ‘‘आईने बनवलेल्या आणखी मेणबत्त्या घरी आहेत.’’
त्यावर आजीबाई म्हणाल्या, ‘‘मला माझ्या घरासाठी आणि नाताळची भेट म्हणून देण्यासाठी खूप मेणबत्त्या हव्या आहेत. त्या घेण्यासाठी आपण तुझ्या घरी जाऊ.’’
सियोना आजीबाईंबरोबर घरी जाण्यासाठी उठली तेवढय़ात मेणबत्ती विझली. सियोनाला वाटलं, आता आधी दोन वेळा झालं तसंच होणार व आपल्याला आजीबाई दिसणार नाहीत. ती जोरात ओरडून म्हणाली, ‘‘आजीबाई, मेणबत्ती विझली, पण कृपा करून तुम्ही जाऊ नका!’’
आजीबाईंनी सियोनाला प्रेमानं जवळ घेतलं. आपल्या अंगावरची शाल तिच्या अंगाभोवती गुंडाळली. सियोनाचा क्षणभर विश्वासच बसला नाही. आजीबाई तिचा हात धरून म्हणाल्या, ‘‘अगं, मी कुठेही जात नाहीए. आपण दोघी मिळून तुझ्या घरी जाणार आहोत.’’
घरी जाताना तिनं आजीबाईंशी खूप गप्पा मारल्या. आजीबाईंना मेणबत्तीच्या उजेडात बघितलेला ख्रिस्मस ट्री आणि टेबलाबद्दलही सांगितलं.
घरी पोचल्यावर सियोनाने आईला आजीबाईंबद्दल सांगितलं. थंडी आणि बर्फातून सियोनाला घरी घेऊन आल्याबद्दल सियोनाच्या आईने आजीबाईंचे आभार मानले. त्या दोघींसाठी गरमागरम कॉफी बनवली. कॉफी प्यायल्यावर आजीबाईंनी त्यांच्याकडच्या सगळ्या मेणबत्त्या विकत घेतल्या. पैसे देताना त्या म्हणाल्या, ‘‘मी तुम्हा दोघींवर खूप खूश आहे. मला तुम्हाला नाताळसाठी छानशी भेटवस्तू द्यायची आहे.’’
त्यावर सियोनाची आई आजीबाईंचे आभार मानून म्हणाली, ‘‘आज आमच्या सगळ्या मेणबत्त्या विकल्या गेल्या आहेत. ह्या पैशांतून आता आम्ही नाताळ साजरा करू व थंडीसाठी कपडेही विकत घेऊ शकू.’’
आजीबाई गेल्यावर सियोना व तिची आई नाताळ कसा साजरा करायचा ह्याचे बेत करत झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर बघतात तर त्यांचं घर छान सजवलेलं दिसलं. त्यांच्या घरात छान छान खाण्याच्या पदार्थानी भरलेलं टेबल व रंगीबेरंगी दिवे लावलेले ख्रिस्मस ट्री होते. एक देवदूत खूप साऱ्या भेटवस्तू ठेवत होता. सजवलेलं घर व देवदूताला बघून सियोना व तिची आई आश्चर्यचकित झाल्या.
देवदूत दोघींना नाताळच्या शुभेच्छा देत म्हणाला, ‘‘मी सगळीकडे नाताळची तयारी कशी काय चालली आहे हे बघण्यासाठी रस्त्यावरून फिरत होतो तेव्हा मला सियोनाच्या रडण्याचा आवाज आला. तिला मदत करण्यासाठी मी आजीबईंचं रूप घेतलं. सियोनानं मला तिची कहाणी सांगितली. मेणबत्तीच्या उजेडात बघितलेल्या गोष्टी सांगितल्या व घरी येताना माझ्याशी खूप गप्पा मारल्या. ते सगळं ऐकल्यावर मी तुम्हा दोघींच्या सच्चेपणावर व कष्ट करण्याच्या वृत्तीवर खूश झालो आणि तुमच्यासाठी हे सगळं करायचं ठरवलं.’’
‘‘तुम्ही माझ्याकडे काही मागितलं नाहीत, पण ही माझी तुमच्यासाठी नाताळची भेट समजा.’’ असं म्हणून देवदूत क्षणार्धात दिसेनासा झाला.
मृणाल तुळपुळे – mrunal mrinaltul@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:40 am

Web Title: siona and candles
टॅग : Kids Story
Next Stories
1 आर्ट कॉर्नर : नाताळचे शुभेच्छाझाड
2 डोकॅलिटी :
3 देवाचा शिक्का
Just Now!
X