पियू आईबरोबर केतकी मावशीच्या लग्नाला गेली. तिने अगदी जवळून लग्नसोहळा पाहिला. तिला इतकी गंमत वाटली की घरी आल्यावर बाबांपाशी तिचा एकच धोशा- ‘आपल्याकडेपण असं लग्न करायचं.’
आपल्याकडे ताई, दादा कुठेयत? कोणाचं लग्न करायचं? बाबांनी विचारलं. त्यावर आईने एक आयडिया काढली.
‘पियू, तुझ्या चिंटी बाहुलीचं लग्न करू या. आम्ही लहानपणी बाहुला-बाहुलीची लग्नं लावायचो. इतकी मज्जा यायची!’
‘खऱ्या लग्नासारखं लग्न करायचात तुम्ही?’
‘हो! अगदी खऽर्रऽ लग्न! तुझी चिंटी बाहुली छान आहे की नाही? लाल ओठ, गोबरे गाल, काळेभोर मोठे डोळे, कुरळे केस.. नाक नकटं आहे, पण तिला ते छानच दिसतं.’
‘तिला नवरा मात्र छान शोधायला हवा बरं का पियू!’
‘तुझ्याकडे एक फॉरिन रिटर्न बाहुला आहे ना? अमेरिकेच्या मामाने आणलेला?’ बाबांनी आठवण करून दिली.
‘पण तो माझ्या चिंटीचा दादा आहे ना!’ पियू म्हणाली.
‘तू असं करतेस का राणी? तुझ्या मैत्रिणींकडचे बाहुले बघून ये, तुझ्या चिंटीला शोभणारा बाहुला हवा.’ आईने आणखी एक आयडिया सांगितली.
अपार्टमेंटमध्येच पियूच्या चार मैत्रिणी होत्या. चिंटीला कडेवर घेऊनच पियू स्वराकडे गेली.
‘आपण खेळायचं?’ स्वराने विचारलं.
‘अं हं! पण स्वरा, तुझा बाहुला कुठेय गं?’ पियू म्हणाली.
‘आता तो जुना झालाय ना म्हणून आईने पिशवीत ठेवलाय,’ स्वराने सांगितलं.
‘पण मला तो बघायचाय्.’
स्वराने पिशवीतला बाहुला काढला- तो पियूने पाहिला. तो खूपच मळला होता. त्याची पँट फाटली होती. केस निघाल्यामुळे तो आजोबांसारखा टकलू झाला होता. ‘आपल्या चिंटीला असला नवरा नको गं बाई’ असं मनात म्हणून, ‘नंतर येते गं!’ असं स्वराला सांगून पियू चार नंबरच्या शिल्पाकडे आली. तिचा बाहुला शोकेसमध्येच उभा होता. त्याचं धोतर-सदरा, पगडी, पायातले जोडे बघून पियू शिल्पाला म्हणाली, ‘ए, हा तुझ्या आजीचा बाहुला आहे का गं!’ शिल्पा अश्शी रागावली! ‘आजीचा नाही, माझाच आहे हा बाहुला. आम्ही त्याला बाजीराव पेशव्यांचा ड्रेस मुद्दामच शिवलाय- पुण्याचा आहे ना तो! चिंटीला नवरा शोधतेयस का?’
‘तुला कसं कळलं?’
‘तुझ्या आईचा फोन आला होता माझ्या आईला, पण तुझी ही नकटी चिंटी मला मुळीच आवडत नाही बरं का! तुम्ही माझ्या बाहुल्याला पसंत केलात तरी आम्हाला काही चिंटी पसंत नाही!’ शिल्पाचा तोरा बघून पियू उठलीच. चिंटीचा पापा घेऊन रागानेच ती सात नंबरच्या निधीकडे आली. निधीचा बाहुला खेळण्यांच्या टबमध्येच होता. तिने त्याला पियूच्या समोर उभा केला. काय रुबाबदार होता तो! त्याचा हिरवा मिलिटरी पोशाख नि काळे चकचकीत बूट होते. त्याच्या हातात बंदूक होती. कॅपमधून कुरळे केस दिसत होते.
‘वा! निधी, तुझा हा शूर बाहुला माझ्या चिंटीला छान शोभतोय बरं का! आपण या दोघांचं लग्न करू या.’ पियू म्हणाली.
‘जरा ठेंगणी आहे गं तुझी चिंटी. माझा हा वीरेन किती उंच आहे, पण चालेल. तिला हाय हिलच्या चपला घाल तू! करू या आपण लग्न!’
दोन्हीकडची पसंती झाली नि दोन्ही घरी लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. निधीच्या आईने चिंटीसाठी पिवळी टिकल्यांची साडी, ब्लाऊज नि मण्यांचे दागिने तयार केले. पियूच्या आईने वीरेनसाठी फेटा, शेरवानी, मखमली जोडे शिवून त्यांच्याकडे पाठवले. कॉलनीतल्या सर्वच मुलांना पियू नि निधीने फोनवरून आमंत्रण दिले. पियूच्या हॉलपुढच्या टेरेसची सजावट सोना, निमिष आणि यशने केली. पताका, माळा, लायटिंग केलं नि गालिचा घातला. सर्व मुले नवे कपडे घालून लग्नाला आले. टिनू, मनू, शलाकाने निधीच्या वीरेनला सजवून हॉलमध्ये आणले. जिंक्या तोंडानेच सनई वाजवत होता. िबटय़ाने मामा होऊन पिवळी साडी नेसलेल्या चिंटीला हॉलमध्ये आणले नि निधीच्या बाहुल्यापुढे उभे केले. कुम्या नि रितेश भटजी झाले होते. त्यांनी नवरा-नवरीमध्ये छोटासा अंतरपाट धरला नि मोठय़ांनी मंगलाष्टकं म्हटली. पियू नि निधी आपापल्या बाहुल्यांना धरून उभ्या राहिल्या. अक्षता म्हणून शमाने झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या वाटल्या. ‘शुभमंगल सावधान’ झालं नि सर्वानी टाळ्या वाजवल्या. चिरागने दिवाळीतले उरलेले फटाके धडाडदिशी वाजवले. पियू नि निधीने बाहुला-बाहुलीचे हात वर करून दोघांना माळा घातल्या. टेबलवर खोक्यांचा सोफा ठेवला होता. नवरा-नवरीला त्यावर बसवलं- त्यांच्याकडे बघताना सर्वच मुलांना खूप आनंद वाटत होता.
पियूच्या आईने सगळ्याच मुलांना लाडू-चकलीची डिश दिली. निधीच्या आईने आईस्क्रीमचे कप दिले. सगळी मुलं खात, हसत, नाचत, गात धमाल करीत होती. पियूच्या चिंटीचं लग्न झोकात झालं होतं.