|| नंदन सचिन कार्ले

यावर्षी आम्ही भावंडं नागझिराला (जंगल सफारी) गेलो होतो. फरक फक्त एवढाच की यावेळी मी आईबाबांबरोबर न जाता आम्ही भावंडंच गेलो होतो. त्यामुळे थोडी जास्त मज्जा आली.

नागझिरा गोंदिया भागात आहे. आम्ही चाळीस एक जण विदर्भ एक्स्प्रेसने १४-१५ तासांचा प्रवास करून तिथे पोहोचलो. यावेळी आमची राहण्याची सोय core zone (म्हणजे जंगलातला अगदी आतला भाग) मध्ये होती. त्यामुळे गेल्या गेल्या आम्हाला लंगूरचे दर्शन घडले.

पहिली सफारी त्याच दिवशी दुपारी साडेतीन-चारला होती. मागच्या वेळचा अनुभव असल्याने (ताडोबाला प्रचंड ऊन होतं) मी भरपूर ज्युस, ओआरएसएल असं काय काय आणलं होतं. इतकंच नव्हे तर टोपी, स्कार्फच्या जोडीला तोंडावर पाण्याचा स्प्रे मारण्यासाठी बाटलीही (झाडांवर पाणी मारण्यासाठी असते तशी) नेली होती.

नागझिऱ्याचे वैशिष्टय़ं म्हणजे, तिथे बिबटे भरपूर (४०-५०) आणि वाघ खूपच कमी (७-८) आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे आम्हाला पहिल्याच सफारीत वाघ दिसला. बराच वेळ आम्हाला त्याने दर्शन दिले. (बहुतेक T 8 असं नाव होतं त्याचं. पूर्वी इथल्या वाघांना कोणतीही नावं द्यायचे. जय-विरू नाव असलेले वाघ होते इथे. पण आता नंबर देतात वाघांना, असं आम्हाला गाईडने सांगितलं.)

अशा आम्ही एकूण सहा सफारी केल्या. त्यात कधी आम्हाला बिबटय़ा दिसला तर कधी नीलगाय दिसली. तर कधी मातकट रंगांची घोरपड दिसली. आमचे गाईड आम्हाला खूप छान माहिती देत होते. त्यामुळेच आम्ही वाघ, बिबटय़ा, लंगूर, अस्वल आणि मोराच्या पायाचे ठसे बघू शकलो. विशेष म्हणजे अस्वलाला मुंग्यांच्या वारुळात तोंड घालून मुंग्या खाताना बघितलं. दोन सांबरांची झुंजही बघितली. खूप मज्जा आली हे बघायला. त्याचप्रमाणे विविध पक्षीही बघितले. रुफस ट्री पाय, इंडियन रोलर, hawk eagle, serpent eagle, भारद्वाज, Indian Pradise flycatcher, Indian Pitta, दयाळ इत्यादी.

आम्हाला गाईडने सांगितलं की, माकड व सांबर हे मित्र असतात. माकड झाडावरून खाली फळं टाकतो म्हणे सांबरांसाठी. आणि वाघ आला की माकड त्यांना सावध करतं. सांबराबद्दल अजून माहिती कळली ती अशी की, त्याच्या शिंगांना खाज येते व त्यामुळे ते झाडाच्या खोडाला शिंगं घासतात. त्यांच्या शिंगांवर रक्तवाहिन्यांचं जाळं असतं- जे आपल्याला दिसत नाही. शिंगं झाडाला घासल्यामुळे रक्त येतं. काही दिवसांनी ही शिंगं झडतात आणि नंतर त्यांना नवीन शिंगं येतात.

सफारीबरोबरच सरांनी घेतलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीजने खूप मज्जा आली. अनेक खेळ खेळताना धम्माल आली.  तर मित्रांनो, तुम्हीही या गोष्टी अनुभवायला नक्की नागझिऱ्याला जा.

 ८ वी, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व.)