खूप वर्षांपूर्वी चंपावती नावाच्या नगरीमध्ये तुकाशेठ नावाचा एक व्यापारी राहायचा. सुंदर हवेली, भरपूर नोकरचाकर अन् टॉकटॉक करीत दुडदुडणारी घोडागाडी असं सारं ऐश्वर्य तुकाशेठपाशी होतं. त्याला रूपाली व गंधाली नावाच्या दोन मुली होत्या. थोरली रूपाली नावाप्रमाणे अत्यंत रूपवान होती. गोरापान रंग, टपोरे डोळे, डाळिंबासारखे ओठ अन् काळेभोर रेशमी केस! अहाहा! रूपाली म्हणजे दुसरी परीच! धाकटी गंधाली मात्र नेमकी तिच्याविरुद्ध म्हणजे दिसायला अगदीच सुमार व काळीबेंद्री. देखण्या रूपालीपुढे ती फारच सामान्य वाटायची.
तुकाशेठचे सारे नातलग व शेजारी येता-जाता सतत रूपालीची तारीफ करायचे. ‘‘रूपाली आमची छानछान, परीसारखी गोरीपान!’’ सतत चालणाऱ्या स्तुतीमुळे रूपाली शेफारली, गर्विष्ठ बनली. सारा दिवस नट्टापट्टा करण्यात वेळ घालवू लागली. शाळेचा कंटाळा अन् परीक्षेत भोपळा, अशा तिच्या वागण्याने तुकाशेठ नाराज झाला, पण तो चिडला की त्याची बायको रूपालीची बाजू घ्यायची. ‘‘हवी कशाला ती शाळा अन् अभ्यास? कटकट नुसती. माझी रूपाली लाखात देखणी, ती होणार राजाची राणी’’ बायको असं म्हणाली की बिचारा तुकाशेठ गुपचूप बाहेर निघून जायचा. धाकटी गंधाली मात्र हुशार होती. शाळा, अभ्यास अन् वाचन हेच तिचं जग होतं.
एक दिवस काय झालं की तुकाशेठच्या दुकानाला अचानक आग लागली. ‘‘आग लागली, आग लागली धावा, धावा.’’ असं म्हणत सारे धावले, पाणी ओतू लागले, पण रात्रीची वेळ अन् त्यात वाऱ्याचा जोर त्यामुळे आग काही विझेना. पाहता पाहता सारं दुकान जळून खाक झालं. त्या संकटाने तुकाशेठ हादरला, पार खचून गेला. दुकान गेलं, पैका गेला अन् हवेलीत राहणारा तुका चक्क रस्त्यावर आला. झोपडी बांधून राहू लागला. श्रीमंती जाताच माणसं बदलली. आतापर्यंत रूपालीभोवती मांजरासारखी घोटाळणारी माणसं तिला गोरी-गोमटी अन् कपाळकरंटी, असं म्हणत हिणवू लागली.
एक दिवस तुका आपल्याच विचारात बसला असताना गंधाली त्याच्याजवळ येऊन बसली अन् म्हणाली- ‘‘बाबा, चिंता करू नका. लवकरच आपले दिवस बदलतील. आपल्या राज्यकन्येच्या प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्याला एक लक्ष सुवर्णमुद्रांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. चला, उद्याच आपण राजधानीला जाऊ.’’ तुक्याचा गंधालीवर पूर्ण विश्वास होता. दुसऱ्याच दिवशी दोघे राजधानीच्या दिशेने निघाले व ठेवणीतले कपडे घालून दरबारात हजर झाले. तुक्याने हात जोडून राजाला आपल्या मुलीची इच्छा सांगितली. राजाने त्याची विनंती लगेच मान्य केली, पण गंधालीचं रूप बघून राजकन्या मात्र नाराज झाली. तोंड वेडंवाकडं करीतच तिने गंधालीला आपले प्रश्न विचारले. ‘‘गंधाली, दे उत्तर पटापट. वाऱ्या-वादळात न विझणारा दिवा कोणता? आणि आकाशीचा चंद्र धरतीवर आणता येईल का? झट्दिशी उत्तर दे नाहीतर पट्दिशी शिक्षेला तयार हो.’’ राजकुमारी आढय़तेने म्हणाली. तिचे जगावेगळे प्रश्न व अहंकार बघून सारा दरबार चिडीचूप झाला. गंधाली मात्र शांत होती. आत्मविश्वासाने पुढे होऊन तिने राजा व राजकन्येला अभिवादन केलं व ती म्हणाली- ‘‘राजकुमारी, वारा-वादळातही न विझणारा व अखंड तेवत राहणारा दिवा म्हणजे ज्ञान! ज्ञान व बुद्धीचा दिवा कधीही विझत नाही. संकटाच्या वेळीसुद्धा ज्ञान तुम्हाला साथ देतं, पैलतीरी घेऊन जातं. राजकुमारी, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तो आरसाच तुम्हाला देईल. तुमच्या रूपाने आकाशीचा चंद्रच खाली उतरला आहे असं वाटतं. तुम्ही साक्षात चंद्रमा आहात, सुंदर व रूपवान!’’ गंधालीने उत्तर दिलं अन् राजकन्या खुदकन् हसली.
‘‘वाहवा, वाहवा! अप्रतिम!’’ सारा दरबार व स्वत: राजा गंधालीच्या चातुर्यावर खूश झाला. प्रसन्न होऊन राजाने गंधालीला एकाऐवजी दोन लक्ष सुवर्णमुद्रांचं बक्षीस दिलं. गंधालीच्या बुद्धिमत्तेचा उदोउदो झाला आणि त्या आनंदाने तुकाशेठ भरून पावला. राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रांच्या साहाय्याने त्याने पुन्हा दुकान थाटलं आणि दोन्ही मुलींची थाटामाटात लग्नं करून तो सुखा-समाधानाने राहू लागला.
मुलांनो, शारीरिक सौंदर्य व श्रीमंतीपेक्षा बुद्धिचातुर्य व ज्ञानाचं महत्त्व फार मोठं आहे, हे सांगताना समर्थ रामदास दासबोधात लिहितात-
।। शरीर सुंदर सतेज, वस्त्रेभूषणे केले सज्ज
अंतरी नसता चातुर्यबीज, कदापि न शोभे।।