30 March 2020

News Flash

गजाली विज्ञानाच्या : विनाश काले, विपरीत बुद्धी

आपण उच्छ्वासात सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू झाडं प्रकाश संश्लेषणात वापरतात आणि ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपण श्वसनासाठी वापरतो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. नंदा हरम

आई : प्राची, तुम्हाला आरे कॉलनी आवडली होती ना! खूप मज्जा केली होतीत ना तुम्ही त्या ट्रिपला.

प्राची : हो. खूप धम्माल केली होती आम्ही! पण..

आई : काय झालं असं उदास व्हायला?

प्राची : अगं आई, काल टीव्हीवर ती तोडलेली झाडं पाहिली आणि कसंसंच झालं! एवढे मोठ्ठे वृक्ष निपचित पडलेत ग जमिनीवर.. आज विज्ञानाच्या तासाला वर्गात हाच विषय सुरू होता.

आई : खरं आहे तुझं म्हणणं! ती बातमी वाचून माझाही जीव हळहळला. तुमच्या विज्ञानाच्या मॅडम काय म्हणाल्या?

प्राची : त्यांनाही खूप वाईट वाटलं. त्या म्हणाल्या, ‘विनाश काले, विपरीत बुद्धी..’ शोधा त्याचा अर्थ. उद्या त्या विचारणार आहेत वर्गात.

आई : तुला कळतं का काही त्यातलं? सांग बरं मला.

प्राची : सांगू.. जेव्हा विनाश काळ येतो, तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते किंवा नष्ट होते.

आई : अगं.. अशी हजारो झाडांची कत्तल करणं, हा निव्वळ मूर्खपणा नाही का?

आई : (न कळल्याचं सोंग करत) : त्यात मूर्खपणा कसला?

प्राची :  आपण उच्छ्वासात सोडलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू झाडं प्रकाश संश्लेषणात वापरतात आणि ते ऑक्सिजन बाहेर टाकतात, जो आपण श्वसनासाठी वापरतो.

आई : प्राचू, हल्ली एका अभ्यासात अनेक करोडो टन हरित गृहाचा कार्बन डाय ऑक्साईड दरवर्षी जंगलं म्हणजे झाडं शोषून घेतात.

प्राची : बाप रे!

आई : पुढे ऐक, जर हा वायू शोषला गेला नाही तर पृथ्वीचं तापमान वाढेल.

प्राची : आई.. जिथं जंगलं जास्त असतात तिथे पाऊसही चांगला पडतो ना?

आई : निश्चितच! झाडांमुळे जमिनीची धूप थांबते.

प्राची : म्हणजे नेमकं काय?

आई : जमिनीची झीज होत नाही. मोठ्ठय़ा वृक्षांची मुळं जमिनीत खूप खोलवर गेलेली असतात. ती मुळं माती चांगली घट्ट धरून ठेवतात. माती पाणी धरून ठेवते. त्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होते.

प्राची : आणि आई.. या झाडांवर पक्षी, प्राणी कित्ती अवलंबून असतात.

आई : पक्षी आपली घरटी झाडावर किंवा झाडाच्या ढोलीत बांधतात. वेगवेगळ्या झाडांची फळं म्हणजे पक्ष्यांचा आवडता खाऊ असतो.

प्राची : फुलांमधील मधुरसावर कित्येक कीटक, पक्षी आपली गुजराण करतात.

आई : उन्हाळ्याच्या दिवसात मोठय़ा वृक्षांच्या सावलीत विसावण्याचं सुख वेगळंच, नाही?

प्राची : माझ्या लक्षात येतंय आता.. वृक्षतोड केल्याने आपण पर्यावरणात ढवळाढवळ करतो. निसर्गातील चक्रं मोडून पडतात. वातावरणाचा समतोल राखायचं काम ही झाडं करत असतात.

आई : प्राचू, कळलं ना तुला झाडांचं महत्त्व?

प्राची : अगदी शंभर टक्के, आई! मॅडम म्हणाल्या ते अगदी योग्य आहे. वृक्षतोड करणं म्हणजे आपण आपल्या पायावर धोंडा ओढवून घेण्यासारखं आहे.

आई : उद्या मॅडमना सांगशील ना सारं? चल, आवर आता, जेवायला बसू.

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:51 am

Web Title: tree cutting balmaifal article abn 97
Next Stories
1 सज्जनपणाचे मोल
2 कार्टूनगाथा : स्कु बी डू कुठेस्तू?
3 अमीगोची ‘स्पेस’
Just Now!
X