News Flash

विल्यम कमक्वाम्बा

विल्यम कमक्वाम्बा तेव्हा फक्त चौदा वर्षांचा होता.

विल्यम कमक्वाम्बा तेव्हा फक्त चौदा वर्षांचा होता. दक्षिण-पूर्व आफ्रिकेतल्या मलावी या छोटय़ाशा देशातला गरीब शेतकरी कुटुंबातला मुलगा. त्याने कधीही संगणक वापरला नव्हता. इंटरनेट काय असतं, हे त्याला माहीत नव्हतं. २००१ मध्ये मलावीमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. पाच महिन्यांत आजूबाजूला भूकबळी जायला लागले. विल्यम आणि त्याच्या मोठय़ा कुटुंबाला फक्त एक वेळचं जेवण मिळायचं- रात्रीचं. न्सिमा म्हणजे मक्याच्या पिठाच्या पदार्थाचे फक्त तीन घास प्रत्येकाला मिळायचे, इतका अन्नतुटवडा होता. शाळेची फी भरायला त्याच्या बाबांकडे पैसे नव्हते. दुसरीकडे उपासमारी. इच्छा नसतानाही विल्यमची शाळा सुटली. पण त्याला शाळेत जायला आवडायचं. नव्या गोष्टी शिकायला आवडायचं. पुन्हा शाळेत जाता यावं हा एकच ध्यास त्याच्या मनाने घेतला होता. त्याला त्याची परिस्थिती बदलायची होती. परत शाळा सुरू होईतो तो एका ग्रंथालयामध्ये जायला लागला. तिथे भौतिकशास्त्र विषयावरची पुस्तकं वाचण्याचा त्यानं धडाकाच लावला. त्याला इंग्लिश तितकंसं यायचं नाही, पण तो आकृत्या आणि चित्रांवरून विषय समजून घ्यायचा. एकदा एक पुस्तक वाचत असताना पवनचक्कीविषयी त्याला समजलं. पवनचक्की पाणी खेचू शकते आणि त्यातून विद्युतनिर्मिती होते, हेही त्याला समजलं. हा उपासमारीपासून वाचण्याचा मार्ग असू शकेल असं त्याला वाटलं. त्यानं स्वत:साठी एक पवनचक्की बांधायचं ठरवलं. गावात, घरात सगळ्यांनी त्याला वेडय़ात काढलं. असं कधी कुणाला जमलंय का, म्हणत नावं ठेवली. पण या चौदा वर्षांच्या मुलाने हट्ट सोडला नाही. भंगारातून वस्तू गोळा केल्या. मेहनत घेतली. पुस्तकांचा आधार घेतला आणि पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली.

एका गरीब देशातल्या साध्या घरातला हा मुलगा. पण त्याच्या हट्टामुळे त्यानं त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बदलली. जगभर तुमच्यासारखीच अनेक मुलं आहेत- जी स्वप्न बघतात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून प्रयोग करून बघतात. धाडस दाखवतात. त्यांची सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणून प्रयत्न करतात. कधी कधी तर आम्हा मोठय़ांना जगण्याचं शहाणपणही शिकवून जातात. तुम्हाला विल्यमला आणि त्याच्यासारख्या जगावेगळं काम करून बघणाऱ्या मुलांना भेटायला आवडेल ना? मग गुगलवर ‘टेड टॉक किड्स’ असं सर्च करा. टेड टॉक या जगप्रसिद्ध व्यासपीठावर स्वत:च्या अनुभवांचं, प्रयोगांचं शेअरिंग करायला आलेल्या कितीतरी मुलांचे व्हिडीओज् तुम्हाला बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या व्हिडीओज्ना मराठी सबटायटल्ससुद्धा असतात. सुरुवात विल्यमच्या व्हिडीओपासून करा. ‘हाऊ  आय हार्नेस्ड द विंड’ हा त्याचा व्हिडीयो या लिंकवर तुम्ही बघू शकता. https://www.ted.com/talks/william_kamkwamba_how_i_harnessed_the_wind?referrer=playlist-ted_under_20#t-6449 या लिंकवर तुम्ही विल्यमने स्वत: सांगितलेली त्याची गोष्ट त्याच्याच तोंडून ऐकू शकता. शिवाय आज रविवार आहे, मस्त आरामात संगणकासमोर बसा आणि जगभरातल्या मुलांशी व्हा कनेक्ट!

रेड अलर्ट

इंटरनेटवर सर्फिग करताना, ऑनलाइन एखादा गेम खेळताना कुठेही स्वत:ची माहिती देऊ  नका. कुणी असं काही विचारलं तर आधी आई-बाबांना सांगा. यूटय़ूबवर व्हिडीओ सर्च करताना अनेकदा हाँटेड हाऊस, विअर्ड थिंग्स असल्या शीर्षकाचे व्हिडीओज् असतात. त्यातले बहुतेक व्हिडीओज् फेक म्हणजे खोटे असतात. त्यामुळे असले व्हिडीओज् बघण्यात अजिबात वेळ घालवू नका. आणि त्यावर विश्वास तर मुळीच ठेवू नका.

मुक्ता चैतन्य

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:17 am

Web Title: william kamkwamba malawian innovator
Next Stories
1 डोकॅलिटी
2 शी बाबा कंटाळा!
3 बाराशे दिवस!
Just Now!
X