मेघना जोशी
कंपासपेटी आज खूप खूश होती. तिला छान नटवलं होतं ना मुग्धाने. महत्त्वाचं म्हणजे तिनं तिच्यातला सगळा निरुपयोगी कागदांचा पसारा काढून टाकला होता. नवीन पेनं, नुकतंच टोक काढलेली पेन्सिल, वेष्टनात लपेटलेला नवा खोडरबर, नवा कोरा धारदार शार्पनर अशा सगळय़ा नवनव्या वस्तूंनी सजलेली कंपासपेटी आपणच परतपरत आपलं रुपडं निरखत होती. ‘मुग्धा काय नि कित्ती वस्तूंची अडगळ करते नेहमी माझ्यामध्ये’ असं तिला सारखं वाटत होतं. काय काय भरून ठेवते ती ‘कसले कसले स्टिकर्स’ पेन्सिलचा कचरा, कागदाचे तुकडे आणि बरंच काही, पण उद्या मुग्धाची दहावीची परीक्षा सुरू होतेय त्यामुळे परीक्षेच्या आधी तिनं कंपासपेटीचं रूपच पालटून टाकलं होतं. आज तिला स्वच्छ नीटनेटकी केली होती.
ती स्वत:चं रूप निरखत असतानाच मुग्धानं तिला सॅकमध्ये ठेवलं. सॅकमध्ये गेल्यावर तिला एकदम प्रशस्त बंगल्यामध्येच गेल्यासारखं वाटलं. नेहमी पुस्तकं, वह्य, रंगपेटी, पट्टी, कागदाच्या गुंडाळय़ा यांच्या बरोबर राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमटून जात होता अगदी. पण आज तिला एकदम मोकळं वाटत होतं. तिनं सॅकमध्ये बसल्यावर जोरात उसासा सोडला. गेल्या आठ दिवसांत सगळी नुसती धावपळ चालली होती. त्यात तिची कित्ती वेळा उघडझाप झाली होती सांगताही आलं नसतं. अगदी पाठ दुखायला लागली होती तिची. पण कंपासपेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची. दहावीची परीक्षा मुग्धाची आणि तिच्यापेक्षा काळजी आईला. जणूकाही आईचीच परीक्षा होती. आई तर सतत अस्वस्थ होती. माझ्या मनूला परीक्षा द्यायला जमेल ना! दहावीची परीक्षा कठीण तर असणार नाही.. असे एक ना अनेक प्रश्न आईच्या मनात येत होते आणि आईला त्यामुळे खूप ताण आला होता. आईला ताण आला तसा तो मुग्धालाही आला होता. अगदी आईच्या थोडासा आधीच तो तिला आला. तिनं तसं आपली मैत्रीण राहीला बोलूनही दाखवलं. त्यावर राहीनं तिला एक सुंदर गोष्ट सांगितली. ती म्हणाली, ‘‘आपण मागे सहलीला गेलो तेव्हा एका गावात बसमधून उतरलो, आठवतंय ना तुला?’’
‘‘हो तर आठवतं ना.’’ मुग्धा म्हणाली.
‘‘मग आपण चालतचालत एका टेकडीच्या दिशेने गेलो. टेकडी चढताना जरा अवघड गेलं, पण टेकडीवर पोहोचल्यावर पुन्हा एक सुंदर रस्ता दिसू लागला आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला.
‘‘हो..’’ राही पुढे म्हणाली, ‘‘मला तरी दहावीची परीक्षा तशीच वाटते. खरं तर ती इतर परीक्षांसारखीच असते. पण थोडीशी वेगळी. म्हणजे ती पूर्ण वर्षांच्या अभ्यासक्रमावर असते. ती दुसऱ्या शाळेत जाऊन द्यावी लागते. परीक्षक वेगळे असतात, पण ती चांगल्या प्रकारे दिली, व्यवस्थित उत्तीर्ण झालो तर त्या टेकडीवरून जसा आपल्याला सुंदर रस्ता दिसला तसा दिसू शकतो.’’ कंपासपेटी जरी सहलीला गेली नव्हती तरी राही जे सांगत होती ते चित्र तिच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभं राहिलं.
कंपासपेटी त्यावर विचार करत असतानाच मुग्धा म्हणाली, ‘‘हो गं, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अजून एक सुचतंय मला सांगू का?’’ राहीनं होकार दिल्यावर मुग्धा म्हणाली, ‘‘आपल्या वर्गातले काहीजण त्या टेकडीवर स्वत:हून थांबले, ते पुढे आलेच नाहीत. त्यांनी तिथे साफसफाईकेली, झाडं लावली. झाडावर चढायला शिकले. काही थोडावेळसाठी थांबले तर काहींनी पुढे जाताना मार्ग बदलले. तसंच असतं ना दहावीच्या परीक्षेचं.’’ यावर टाळी देत दोघीही हसल्या होत्या आणि तेव्हापासून मुग्धाच्या मनावरचा दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला. ताण निघून गेला, पण तिला त्या टेकडीवरून जसा सुंदर रस्ता दिसला तसा आयुष्याचा सुंदर रस्ता दहावीनंतर पाहायचा होता. त्यामुळे तिनं अभ्यासही उत्तम प्रकारे केला. तो करतानाच तिने हज्जारदा तरी कंपासपेटी उघडली होती. आज सगळी तयारी करून ती उद्या प्रसन्न चित्तानं परीक्षेला जाणार होती.
कंपासपेटीला हे सगळं आठवलं, तिनं मनोमन मुग्धाला ‘बेस्ट ऑफ एफर्टस्’ म्हटलं आणि गुण्या, पट्टी, कोनमापक यांना कुशीत घेऊन शांतपणे पहुडली.
joshimeghana.23@gmail.com