मेघश्री दळवी

पुढचं ऑलिम्पिक आहे टोकियोमध्ये. २०२० साली. दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशांमध्ये होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धासाठी जगभरात भरपूर उत्साह असतो. खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्येही, पण टोकियो ऑलिम्पिक लक्ष वेधून घेतं आहे ते आणखी एका कारणाने- रोबॉट्स!

गेल्या काही महिन्यांमध्ये रोबोटिक्समधलं संशोधन इतक्या वेगाने होत आहे, की दर दिवशी नवनव्या बातम्या येत असतात. कधी कोलांटी मारणारा रोबॉट, तर कधी बास्केटबॉल खेळणारा. कुठे ते बर्गर्स बनवतायत, तर कुठे अगदी माणसासारखा दरवाजा उघडतायत. हे सगळं पाहिलं की टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोबॉट्स दिसण्यात नवल ते काय?

पण ते तिकडे नक्की काय करणार आहेत? पाहुण्यांचं विमानतळावर आगमन झालं की त्यांचं स्वागत हे रोबॉट्स करतील. शिवाय खेळाडूंना साहाय्य, सामानाची ने-आण करण्यात हातभार, भाषांतर करण्यात मदत, पर्यटकांना मार्गदर्शन, अशी कामं ते अगदी सहज पार पाडतील. सध्या टोकियो विमानतळावर त्यांची चाचणी सुरू आहे.

प्रत्यक्ष ऑलिंपिक खेळांमध्ये मात्र रोबॉट्सना आणखी बढती मिळणार आहे. त्यांना चक्क परीक्षकांचं काम देण्यात येणार आहे.

ऑलिम्पिक स्पर्धामध्ये देशोदेशींचे उत्तमोत्तम खेळाडू जीव ओतून भाग घेतात. गुणांसाठी कमालीची लढत देतात. जिम्नॅस्टिक्स किंवा शंभर मीटरची शर्यत याच्यात तर विजेता कोण हे ठरताना एक शतांश सेकंदानेही खूप मोठा फरक पडतो. अशा वेळी परीक्षक म्हणून रोबॉट कसं काम करेल याविषयी सगळ्यांनाच कुतूहल वाटत आहे. आयोजकांच्या मते, रोबॉट्स न थकता, न चुकता काम करू शकतात. त्यामुळे मानवी परीक्षकांना त्यांची पुष्कळ मदत होईल. वेगवेगळे सेन्सर्सनी नोंदी घेऊन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हे रोबॉट्स स्पर्धकांना गुण देणार आहेत.

हे आहेत आजचे बेत. उद्या त्यात अजून भर पडेल, कारण येत्या दोन वर्षांमध्ये रोबॉट्स आणखी काय काय करू शकतील याची आज साधी कल्पनासुद्धा नाही यायची!

meghashri@gmail.com