|| श्रीनिवास बाळकृष्णन

मोगलीचा खास मित्र बगिरा मुलांमध्ये फेमस असल्याने एका प्राणिसंग्रहालयात (९) काळ्या वाघाला पाहायला जामच गर्दी होत असे. एके दिवशी तो काळा वाघ म्हातारा होऊन वारला, तशी प्राणिसंग्रहालयात येणारी गर्दी कमी कमी होऊ लागली. ‘झू’चा मालक टेंशनमध्येच आला. त्याला एक युक्ती सुचली! त्याने मेलेल्या काळ्या वाघाचं कातडं काढून त्याच्याकडच्या नोकराला घातलं व त्याला काळा वाघ म्हणून पिंजऱ्यात अभिनय करायला सांगितला.

झालं. काळ्या वाघाला पाहायला ‘झू’मध्ये गर्दी वाढली. या कातडे घातलेल्या वाघाच्या बाजूलाच- चिटकून असा डेंजर सिंहाचा पिंजरा होता. दोघांत एक कॉमन दरवाजाही होता आणि एकदा तो दरवाजा राहिला उघडा!

आता नोकराला वाघ असल्याने उभं राहून दरवाजा लावता येईना. नाही तर लोकांना त्याचा खोटेपणा कळेल; पण नोकराला मात्र आतून जाम घाम फुटला. सिंह वासाने आपल्याला ओळखणार आणि मारून टाकणार म्हणून तो थरथरू लागला. मध्येच उभा राहू लागला. परत चार पायांवर बसू लागला.  त्याची अशी विचित्र हालचाल पाहून सिंह काळ्या वाघाच्या पिंजऱ्यात घुसला. आता मोठा राडा होणार या आनंदात सर्व लोक या पिंजऱ्याभोवती जमले. आनंदात चित्कारू लागले. त्यामुळे सिंहपण चेकाळला. कातडं घातलेला नोकर मात्र आतून थंड पडला. आता त्याच्यापुढे उभं राहून पळून जाण्याशिवाय काही मार्गच नव्हता. तो तसं करणार तितक्यात सिंहाने त्याच्या दिशेने झेप घेतली आणि एक पाय त्याच्या छाताडावर ठेवून त्याला खाली पाडला आणि डोकं कानाजवळ नेऊन म्हणाला, ‘जास्त आरडाओरडा केलास  तर लोकांसमोर आपली पोलखोल होईल आणि मालक आपल्या दोघांना कामावरून काढून टाकतील रे!’

असं कातडं घालून माणसांना वाघ किंवा सिंह बनता येईल का? शाळेच्या नाटकात आपण सिंह, अस्वल, वाघ, माकड बनतो तेव्हा कितीही चांगला गेटअप केला तरी खोटेच वाटतो ना! पण आज आपण एका भलत्याच रंगाच्या कातडीच्या वाघाची ओळख करून घेणार आहोत. तुम्ही बिबळा पाहिलाय का? हो तोच, जो माणसांवर हल्ला करण्याच्या बातमीत येतो. ठिपकेवाला.. चित्ता नव्हे, बिबळा. महाहुशार प्राणी. पट्टेरी वाघात जसे पिवळे व सफेद असे दोन प्रकार असतात तसेच बिबळ्यांत पिवळा व काळा असे दोनच प्रकार आहेत. काळ्या बिबळ्याला ‘पँथर’ असे म्हणतात. आपल्या कार्टूनच्या जगात हाच गुलाबी रंगाचा- ‘पिंक पँथर’ आहे. वास्तविक सिनेमात ‘पिंक डायमंड’ एक काल्पनिक व सर्वात महागडा हिरा होता. त्याभोवती ही कथा. म्हणून तो हिरा ‘पिंक पँथर’ याच टोपणनावाने ओळखला गेला. असो.

या बिबटय़ाने कार्टूनविश्वात दोन पायांवर उडी घेतली ते १९६३ साली. कुठल्याही प्राण्याला- किडय़ाला कार्टूनविश्वात प्रसिद्ध व्हायचे तर दोन पायांवर चालायला शिकावं लागतं. त्यामुळे इथं हा कधीच खऱ्या बिबळ्यासारखा चार पायांवर चालला नाही.

बिबळ्याला तुम्ही पाहिलं असेलच! (त्यासाठी गूगल करण्याची गरज नाही. रस्त्यावर लावलेल्या राजकीय फ्लेक्सवर कुठला तरी ‘माणणीय, आदरनीय’ रानटी बिबळ्याचा लुक देत असतोच.) त्यात किती रागीट आणि भयंकर दिसतो. तसा प्रत्यक्षातही असतो; पण आपला पिंक पँथर लय मवाळ हो. एकदम मध्यमवर्गीय शहरी मराठी माणसासारखा! पण पिंक पँथर कधीच कपडे घालत नाही. कधी तरी ओव्हरकोट, हॅट, हेल्मेट, गॉगल घातले तर घातले, नाही तर असाच! याकडे पँथरची ना शक्ती का युक्ती ना भेदक नजर. पिंक पँथरच्या कार्टून मालिका या बऱ्याचशा टॉम अँड जेरी, रोड रनर, ट्विटीची आठवण करून देतात. गोष्ट तशीच; फक्त मुख्य कायमस्वरूपी शत्रू असा नाही. कुणाशी सततचं शत्रुत्व नाही. पोटापाण्याला वेगवेगळी कामं करून जगणारा अगदीच सामान्य! हा ज्या शहरात राहतो तिथं याला ‘पँथर’ म्हणून कुत्रंदेखील ओळखत नाही. हो, म्हणजे आपला पिंक पँथर इथं कुत्र्यालाही घाबरतो. त्यामुळे इतर कोणी त्याला घाबरण्याचा प्रश्नच नाही.

तो माणूस असल्यासारखेच त्याच्याशी वागतात. तोही माणसं वापरतात त्या सर्व गोष्टी वापरतो. शहरातला एक अंडय़ासारखा छोटा पांढरा माणूस याला कायम नडतो-नाडतो; पण तेव्हढय़ास तेवढं. हा कुणाशीच काही बोलत नसल्याने आणि त्याच्या शहरातही कुणीच कोणाशी बोलत नसल्याने वाद वाढतच नाहीत. ही मालिका बघताना तुम्हाला फक्त बॅकग्राऊंड म्युझिक (पाश्र्वसंगीत) ऐकू येते. चार्ली चॅप्लिनच्या मालिका बघताना जसं संगीत असतं तसं.

गुलाबी बिबळ्याचा आकारही परिस्थितीनुसार छोटा-मोठा होत जातो. गुरुत्वाकर्षणाचे नियम कधी लागतात, कधी नाही. खऱ्या जंगलात बिबळ्यांनी कसं राहावं, कुठं फिरावं, काय खावं हे जसं माणसांनी आखून दिलं आहे, तसंच या पिंक पँथरच्या शोमध्ये सर्व काही कार्टूनकाराच्या मर्जीवरच आहे. इथेही माणूसच श्रेष्ठ! याची कार्टूनमधली गंमत तुम्ही आजही यूटय़ूबवर पाहू शकता.

यात भाषेचा वापर नसल्याने कोणत्याही वयातली मुलं यातील विनोदाचा आनंद घेऊ शकतात. काही प्रमाणात थोडं बाळबोध विनोदही आहेत. त्यामुळेच काही ठिकाणी खोटा लाफ्टर टाकला असावा. असा खोटा लाफ्टर का टाकतात? गूगलमामाला विचारा!

कार्टूनची स्टाईल थोडी आधुनिक आहे. रोड रनर कार्टूनची आठवणही होईल.

ठिपकेदार बिबळ्याला गुलाबी रंगाचा दाखवणे मोठे धाडसाचे आहे. असे का? कारण आपण मुलांसाठी निळा व मुलींसाठी गुलाबी असा भेद डोक्यात ठेवला आहे ना! म्हणून धाडस वाटते.

१९६३ ला फ्रीझ फीलेंग, ब्लेक एडवर्डस आणि हॉली प्रॅट यांनी (खऱ्या) चित्रपटासाठी पिंक पँथरची निर्मिती केली. १९६४ कार्टून शोमध्ये आला आणि या धाडसाला यशस्वी केलं. पदार्पणातच या शॉर्ट फिल्मला अकादमी अ‍ॅवॉर्ड मिळाला.

हेन्री मँसिनी यांनी पिंक पँथरची विशेष थीम संगीत बनवली, जी खऱ्या सिनेमात व कार्टून शोसाठीही वापरली गेली. पूर्व आणि दक्षिण आशियात ‘पिंक पँथर नाथु अँड पंगू’, जर्मनीत ‘लिटिल पॉल द पँथर’, बल्गेरियात ‘पिंको द पिंक पँथर’ अशा नावाने हे कार्टून प्रसिद्ध होत गेले. याव्यतिरिक्त तो नाईके कॅम्पेन, टॅक्सी कॅब ड्रायव्हरच्या जाहिरातींमध्ये दिसला. ओवेन्स कॉìनग या गुलाबी रंगाच्या बििल्डग इन्स्टॉलेशन कंपनीचा, ‘स्वीट’न् लो’ या कृत्रिम स्वीटनर कंपनीचा मॅस्कॉट (शुभंकर) देखील होता. २०१९ वर्षांतही जपानच्या भारतीय दुकानांत याची छबी असणाऱ्या वस्तू विक्रीस मिळतात. तसेच १९८३ पासून ७ गेम याच्यावर आहेत. इतक्या जुन्या कार्टूनवर प्ले स्टेशन आणि अँड्रॉइड व आयओएसवर गेम असतात, हीच याच्या लोकप्रियतेची पावती. जपानमध्ये याच्या नावे केक, तर युनायटेड किंगडममध्ये वेफर्स विकले जातात.

जाहिराती आणि गेिमग क्षेत्रात जम बसवत असतानाच १९८८ साली ‘हू फ्रेम्ड रॉजर रॅबीट’ या चित्रपटातही तो होता. साधारण १० टीव्ही शो, ४ विशेष शो, १२४ लघु चित्रपट याच्या नावे आहेत. फोटोत दिसत्येय ती चित्राकृती स्पेनमध्ये रस्त्यावर कोरली आहे.

बिबळ्याच्या या गुलाबी रंगामुळेच त्याच्यातील रागीटपणा जाऊन तो प्रेमळ वाटू लागला. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या उत्सवात याला मिरवता आले. याच गुलाबी रंगामुळे आपला बिबळ्या अनेक (स्तनाचा) कर्करोग जागरूकता आणि उपचार संस्थांशी संबंधित आहे. आपला पिंक पँथर न्यूझीलंडचा ‘चाइल्ड कॅन्सर फाऊंडेशन’चा शुभंकर आहे. ‘हूप फाऊंडेशन’, ‘गॅब्रीएल ट्रस्ट’ यांनीही त्याचा वापर केला आहे.

अ‍ॅनिमेशन इतिहासकार जेरी बेक यांनी पिंक पँथरला ‘हॉलीवूडचा शेवटचा महान कार्टून’ म्हटलंय ते उगाच नाही.

chitrapatang@gmail.com