प्रदीप आपटे

अलेक्झांडर कनिंगहॅमने भारताच्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाची गरज लेखी मांडली, तो दस्तावेज महत्त्वाचा आहे. अनेक स्थळांबद्दलची अभ्यास-पूर्व अनुमानेही त्यात मांडलेली आहेत; त्यापैर्की हिंदू स्थळांविषयीची अनुमाने तर विशेषच वाटावीत…

१८५७ चे ब्रिटिशविरोधी लढे आणि जिहाद शमले होते…आणि कंपनी सरकारसुद्धा! कंपनीच्या मार्फत चालणारा सगळाच राजकीय कारभार राणीच्या साम्राज्यात विलीन झाला. रणधुमाळीची दगदग ओसरली पण नव्या धाटणीचे फेरफार धिमेधामे सुरू झाले. १८३४ पासून सलग पंचवीस वर्षे अलेक्झांडर कनिंगहॅम लष्करी अभियंता होता. तो निवृत्ती घेऊन परतणार होता. पण प्राचीन भारतीय इतिहासाची कळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने मनाशी बाळगलेल्या मोठ्या उत्खनन मोहिमेला पुन्हा नव्याने धुमारे आले. त्याने पुनश्च आपल्या प्रस्तावाचे घोडे दामटून बघितले. आणि या वेळेला दान अनुकूल पडले!

पूर्व भारत, मध्य भारत, वायव्य सरहद्दी, काश्मीर, आताचा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, लडाख हे कनिंगहॅमला चांगलेच परिचित होते. त्यातील फार मोठे भाग त्याने या ना त्यानिमित्ताने प्रत्यक्ष तुडविले होते. त्या भ्रमंतीमध्येच त्याने संभाव्य ठिकाणे हेरली होती.

काही ऐतिहासिक घटना भाग्यवान असतात. त्या घटनांचा त्याच काळात लिहिला गेलेला एखादा दस्तऐवज आरशासारखे स्पष्ट चित्र दाखविणारा ठरतो. कनिंगहॅमने गव्हर्नर जनरलला दिलेला प्रस्ताव त्यांपैकी एक आहे. प्रस्तावामागचा त्याचा युक्तिवाद, विचार, अपेक्षा, भावना त्याबद्दलची कळकळ आणि आत्मविश्वास या सगळ्याचे त्यात रेखीव बिंब आहे. शक्यतो त्याच्याच शब्दात तो प्रस्ताव सारांशाने बघू.

‘‘गेली १०० वर्षे भारतात ब्रिटिश अंमल आहे. पण या देशाच्या प्राचीन काळातल्या स्मारक वास्तू आणि वस्तूंचे जतन करण्यासाठी सरकारने काहीच केलेले नाही. फार जुन्या काळासाठी कुठला लिखित असा इतिहास नसतो. अशा काळाकरिता अशी ‘स्मारक रूपे’ हाच त्या देशाबद्दलच्या तत्कालीन माहितीचा एकमेव विश्वसनीय स्राोत असतो. त्यातील काही अशी आहेत की जी फार युगे तगून आहेत आणि आणखी काही युगेही ती राहतील. पण काही अशी आहेत की दिवसामागोमाग कालौघाने ºहास सोसत आहेत. पुरावेत्त्यांनी जर त्यांची बिनचूक हुबेहूब रेखाटने करून जतन केली नाहीत तर ती पार नाहीशी होतील.’’

‘‘या जपणुकीसाठी आजवर जे यत्न झाले आहेत ते काही सरकारी अधिकाऱ्यांनीही व्यक्तिगत उत्साहाने, सरकारच्या साहाय्याशिवाय केले आहेत. अधिकाऱ्याचे तेथील वास्तव्य छोट्या काळापुरते असणे, अशा कामांना द्यावी लागते तेवढी फुरसत नसणे अशा कारणांमुळे साहजिकच ते विस्कळीत, आपसांत परस्परसंबंध नसलेले आणि अपुरे राहिले आहेत.’’

‘‘आजवर आपला अंमल दृढ करण्यामध्येच सरकार मुख्यत: गुंतले होते. पण ज्ञानविज्ञानाच्या बाबतीत ते अगदी पराङ्मुख राहिले असेही नाही. त्रिकोणमिती सर्वेक्षण त्याचे उदाहरण आहे. त्याच अर्थाने, आजवर टिकून असलेल्या सर्व स्मारकांचे व्यवस्थितपणे काळजीपूर्वक जतन करण्याने सरकारच्या गौरवात आणि प्रतिष्ठेत भर पडेल.’’

‘‘भारताच्या प्राचीन काळातील भूगोलाचे वर्णन करताना प्लाईनीने सिकंदराच्या वाटचालीचा धागा पकडून लिहिले. तशाच हेतूने सदर संशोधनामध्ये मी ह्यूएनत्सांगच्या वाटचालीचा पाठपुरावा करू इच्छितो. हा चिनी यात्रेकरू इसवी सन सातव्या शतकात भारतभर फिरला. बुद्ध धर्माची प्रमुख स्थळे आणि परंपरा आत्मसात करण्याच्या हेतूने केलेली ही तीर्थयात्रा होती. परंतु त्याच्या यात्रावर्णनामध्ये बुद्ध धर्मीयांबरोबरीने अनेक ब्राह्मणी (ब्राह्मिनिकल) संतचरित्रे, आख्यायिका, स्थळे, देवळे यांचीही नोंद विपुलपणे केलेली आहे. ग्रीक इतिहासामध्ये पौसानियाच्या यात्रावर्णनाचे जेवढे मोठे मोल आहे तेवढेच भारताच्या इतिहासाबाबत या चिनी यात्रेकरूच्या यात्रावर्णनाचे आहे!!’’

याकरिता वायव्य भारत आणि बिहार भागातली कोणती ठिकाणे आणि परिसर संशोधक नजरेने धुंडाळली आणि हाताळली पाहिजेत याची यादी त्याने दिली आहे. प्रत्येक ठिकाण त्याभोवतीचा परिसर तिथे सद्य:स्थितीत काय उपलब्ध आहे आणि काय मिळू शकेल याचे त्याने संक्षेपाने वर्णन केले आहे. ते सगळे देणे मुश्कील आहे. पण वानगीदाखल काही बघू –

‘‘कलसी : यमुना नदी डोंगरी भाग सोडून येथे उतरते. या ठिकाणी एक भला थोराड पाषाण आहे. त्यावर अशोकाचा खोदीव लेख आहे. त्या लेखात अँटिओकुस, टॉलेमी, अँटिगनस, मगास, अलेक्झांडर यांची नावे आढळतात. असा मजकूर युसुफझाई पठारावरच्या कपूरदिगिरी पाषाणावर आणि कटकजवळच्या धौली पाषाणावर आहे, तो बराचसा विच्छिन्न आणि विकल झाला आहे. सबब या खोदीव लेखांची प्रत करून घेणे आणि त्यांचा भावी विकलांगपणा थोपविणे हा जतनकार्याचा उत्तम मासला ठरेल.’’

‘‘मथुरा : अलीकडेच या प्राचीन नगराच्या बाहेर एका मोठ्या टेकाडाशी मोठ्या मठाचे अवशेष आढळले. त्यात बरेच पुतळे, मूर्ती, कोरीव खांब आणि खोदीव स्तंभ असल्याचे निदर्शनास आले. त्यातल्या काही खोदीव लेखांचा काळ अनिश्चित आहे आणि ते विशेष रस घ्यावा असे आहेत. ते बहुधा ख्रिस्तकाळातील पहिल्या शतकातले असावेत. त्यातल्या एका नोंदीमध्ये महान राजा हुविष्क अशी नोंद आहे. ती बहुधा शक राजा हुष्काची असावी.’’

‘‘देहली (दिल्ली) : येथील हिंदू अवशेष अगदी थोडे राहिले आहेत. अशोकाचा पाषाणस्तंभ, लोहस्तंभ प्रसिद्ध आहेतच. परंतु कुतुबमिनारभोवती अनेक मठांचे अवशेष आहेत त्याला कुणी भेट देत नाही. हे अवशेष बहुधा तूर वंशकालीन आहेत.’’

‘‘बनारस : सारनाथचा भव्य स्तूप सर्वविदित आहे. पण त्याचे साद्यंत वर्णन आणि आसपासच्या भग्न अवशेषांची रीतसर छाननी अद्याप उपलब्ध नाही. बनारसजवळच भितारीमध्ये खोदलेख असलेला स्तंभ आहे त्याची फेरतपासणी करणे अगत्याचे आहे.’’ ‘‘जौनपूर : आताचे उपलब्ध अवशेष बव्हंशी मुसलमानी काळाचे आहेत, पण त्यातील बहुतेक बांधकामे हिंदू देवळे पाडून त्याचेच सामान वापरून बांधली आहेत. त्यातील काही देवळे व मठांचे भग्नावशेष शिल्लक पडून आहेत त्याचे कुणी सचित्र वर्णन किंवा छाननी केलेली नाही. या वर्षाच्या सुरुवातीला मला त्यापैकी एका कमानीवर संस्कृत लिखाण आढळले.’’

‘‘फैजाबाद : अयोध्येतील अवशेषांचे तपशीलवार वर्णन आजही उपलब्ध नाही. तिथे अनेक भग्न मठ आहेत. परिसरात नाणी सापडत आहेत. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान. त्याचप्रमाणे बुद्ध जीवनातील प्रारंभ काळातील घटनांचे स्थळ. यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयांना सारखेच पवित्र असणारे हे स्थळ आहे. या पवित्र स्थळांची, वास्तूंची तपशीलवार नीटनेटकी साद्यंत नोंद झाली पाहिजे. तशी झाली तर अनेक विशेष रुची वाटाव्या अशा गोष्टी हाती येण्याचे मला समाधान वाटेल.’’

याच बरोबरीने राजगृह, गया, कपिलवस्तु, वैशाली, बुद्धाचे निर्वाण स्थळ कुशीनगर अशा कित्येक ठळक स्थानांचे त्याने संशोधन इराद्याने केलेले नेमके वर्णन या प्रस्तावामध्ये आहे.

एवढा धाडसी धिप्पाड प्रकल्प कसा हाताळायचा याचेदेखील संक्षिप्त वर्णन त्यामध्ये आहे. तो सांगतो, ‘‘या प्रत्येक स्थळाचे सामान्य वर्णन, तेथील अवशेषांचे नेमके ठिकाण, रूप, प्रत्येक इमारतीचा पायाभूत आराखडा, त्याची दिशा, मोजमापे, वस्तूंची तपशीलवार रेखाटने आणि वर्णने, मूर्तिशास्त्र, वास्तुशास्त्रदृष्ट्या असणारी वैशिष्ट्ये यांची छायाचित्रे, नाणी आणि त्यांची मजकुरासह रेखाटने तसेच सर्वेक्षणात आढळलेली कानी पडलेली सर्व प्रकारची माहिती या अहवालांमध्ये असेल.’’

पुढील चार वर्षे म्हणजे १८६५ पर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली हे आगळे सर्वेक्षण घडले. प्राचीन भारतीय भूगोल आणि इतिहासाचे जे पहिले पुरातत्त्वी विशालपट उलगडले त्याची नांदी या चार वर्षांत अवतरली.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com