News Flash

नकाशा-कार्याचे मोल..

अर्कोट आणि त्रिचनापल्लीच्या वेढय़ात जोखीमबाज हल्ल्याने लौकिक कमावलेला रॉबर्ट क्लाइव्ह!

(संग्रहित छायाचित्र)

 

प्रदीप आपटे

घबाड मिळाल्याप्रमाणे बंगाल सुभा इंग्रजांना मिळाला आणि शासनकर्ते होण्याचे कामही अंगावर पडले. त्यास कंपनीने दिलेला प्रतिसाद साम्राज्यविस्तारासाठी नमुनेदार ठरणार होता. त्याआधी नकाशे बनविण्याचे काम केले जेम्स रेनेलने..

दख्खन काबीज करण्याच्या महत्त्वाकांक्षेने औरंगजेब दक्षिणेत आला खरा, पण अखेरीस दख्खनच्या धुळीत मिळाला! त्याच्यानंतर मुघल साम्राज्य विस्कटले. मराठेशाही विस्तारून बहरू लागली. जीर्ण मुघल साम्राज्याची छकले सांभाळणारे छोटेमोठे प्रांतीय म्होरके आपआपल्या मुलखाचे धनी बनले. मुघलांप्रमाणेच बाहेरून आलेल्या ‘युरोपीय व्यापारी वखारी’ व्यापारासाठीचे आपले लष्करी बळ अधिक परजू लागल्या. पसरायची जमेल तशी संधी साधायला त्यांनी सुरुवात केली. फ्रेंच आणि इंग्रजांची सत्तापसरण, ईर्षां आणि परस्पर स्पर्धादेखील बळावली.

अर्कोट आणि त्रिचनापल्लीच्या वेढय़ात जोखीमबाज हल्ल्याने लौकिक कमावलेला रॉबर्ट क्लाइव्ह! तो भारतात परतला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘सेंट डेव्हिड वस्ती’चा प्रमुख म्हणून पुन्हा भारतात दाखल झाला होता. १७५७ च्या ‘प्लासी’ ऊर्फ ‘पलासी’च्या (म्हणजे पलाश किंवा मराठी पळस) लढाईत त्यानेच सिराज उद्दौलाचा पाडाव केला. लढाई अशी फार झालीच नव्हती. क्लाइव्हच्या कावेबाज लाचलुचपतीने आणि फोडाफोडीने डाव साधला होता!!

सिराज उद्दौलाच्या जागी क्लाइव्हने मीर कासिमला मुर्शिदाबादच्या ‘गादी’वर बसवले. त्याच्या बदल्यात बंगालातील ‘२५ लाखांचा मुलूख’ : बंगाल- बिहारमधील सोन्याचा मक्ता कंपनीला मिळवून घेतला! २३,४९,००० रु. एवढी रक्कम (जी पूर्वी कंपनी मोजत असे!) कंपनीला मिळेल अशी तजवीज केली! फ्रेंच आणि डचांचा पूर्ण बंदोबस्त केला. पुढे १७५९ साली देहलीच्या बादशहाचा मुलगा शाह आलमने अलाहाबाद आणि अयोध्येच्या सरदारांशी संगनमत केले आणि त्यांनी एकत्र मिळून मीर जाफरवर स्वारी केली. क्लाइव्हने त्याला मीर जाफरकडून नजराणा देवविला आणि ते प्रकरण मिटविले. याकरिता ‘चोवीस परगणा’च्या मालकी हक्काचा ताबा स्वत:ला मिळवला. बंगालभोवतीच्या ओडिशा, बिहार दिशेच्या प्रदेशावर कब्जा करण्याचा सपाटा नंतरही चालूच राहिला.

बंगाल सुभ्यासारख्या एवढय़ा मोठय़ा प्रदेशाच्या ताब्याचे घबाड कंपनीच्या ध्यानीमनी नव्हते. फिलिप मॅसन या लेखकाने तर म्हटले आहे की, एखाद्या शहरातल्या छोटय़ा दुकानदाराने एकाएकी भल्या मोठय़ा मॉलचे मालक व्हावे तसे काहीसे झाले! अमुक रकमेच्या महसुलाचा मुलूख कब्जात येणे वेगळे आणि तो महसूल प्रत्यक्ष गोळा करणे वेगळे! मुलखाचा महसूल गोळा करायचा तर किती तरी अधिक पण प्राथमिक तपशील पाहिजेत.. उदा. तुकडय़ाचा आकार, मालक कोण, कसणारा कोण, पूर्वी किती ‘वसूल’ होता, जमिनीतले पीक, त्याचे उत्पादन आणि बाजारात मिळण्याजोगते उत्पन्न, थकबाकी, माफी, दंड इ. इ.! तोपर्यंत चालत आलेल्या महसुली नोंदी आणि प्रत्यक्ष जमाबंदी करणारे अपरिचित होते. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा याची साशंकता होती. महसुलाची वसुली करण्यासाठीची माहिती आणि वसुली यंत्रणा तर दूरच, कंपनीला या मुलखाचीच पुरेशी माहिती नव्हती!

तोवरचा कंपनी उलाढालीचा अनुभव शाही परवानगीने उभारलेल्या वखारी, त्याभोवतीचा तटबंदीने राखून आणि भेदून घेतलेला परिसर आणि मालवाहतुकीचे वाटाडय़ांनी दाखवून दिलेले रस्ते याभोवतीच फिरत असे. कंपनीसाठी माल गोळा करून आणणाऱ्या अडत्या लोकांना देशाची जरा अधिक माहिती असे. एतद्देशीय व्यापारी, वाहतूकदार आणि भाडोत्री वाटाडे यावर गुजारा होई. या अंगवळणीच्या व्यापारापल्याड जाऊन अवघा मुलूख पदरी आला. त्याबरोबरीने त्याचा मुल्की लष्करी बंदोबस्तपण डोईवर चढला. तोपर्यंत तंटेकज्जे निवारणे, त्यांचा निवाडा, अंमल इत्यादीसाठी आखलेले वखारी वसाहतीपुरते मर्यादित शिरस्ते आणि कायदे अपुरे ठरणार होते.

व्याप भलताच फुगला होता. त्या परिसरातील गावे, त्यांच्या हद्दी,गावांची नावे, गावांचे पाडे वा विखुरलेल्या वस्त्या, तिथली कसणुकीखालची जमीन, पाणी, गावांच्या आतले रस्ते, गावागावांच्या मधले रस्ते.. अशा किती तरी प्राथमिक माहितीचा गंधदेखील नव्हता.

अपरिचित प्रदेशाचा प्राथमिक भूगोल कंपनीच्या अंगी भिनलेला असला पाहिजे याची निकड भासू लागली. त्या ज्ञानाची उणीव नव्याने तळपून खुपू लागली. फक्त बंगाल प्रांतातच हे घडले असे नव्हे. पण बंगालचा अनुभव घेताना कंपनीने दिलेला प्रतिसाद नमुनेदार ठरला.

कोलकाता (फोर्ट विल्यम्स) गव्हर्नरने जेम्स रेनेलची सर्वेक्षणाच्या कामासाठी नेमणूक केली. (६ मे १७६४) त्या नेमणूक पत्रातील मजकूर असा :

‘‘तुमची पहिली नेमणूक गंगेच्या पूर्वागाला जलंगी नदीपर्यंतच्या सर्वेक्षणासाठी केली आहे. त्यामध्ये गंगेपासून रंगफुल खाडीपर्यंत पोहोचणारा सर्वात कमी अंतराचा, पण वाहतुकीसाठी सुरक्षित क्रमणा करायचा मार्ग तो कोणता? हे धुंडाळणे हाच तुमचा मुख्य उद्देश आणि काम असले पाहिजे.. ..यास्तव गंगेच्या दक्षिण किनाऱ्याने जाऊन तेथून उपजणारा आणि दक्षिणेस जाणारा प्रत्येक खाडी वा नाला मार्ग अवलंबावा. असे कुठवर जाता येते ते शोधावे आणि निदान तीनशे मणांपर्यंत ओझे वाहणाऱ्या बोटी हाकारायला हे मार्ग सुलभ आणि सोयीस्कर आहेत का हे पडताळून घ्यावे. त्यासाठी स्थानिक लोकांशी बोलून सदर जलमार्ग वर्षभर उपलब्ध आणि जारी असतो का? की मोसमानुसारी त्यात फरक पडतो? याची विचारपूस करून माहिती घ्यावी आणि चाचपणी करावी. असे करताना इतरांनी जे सांगितले त्यातला तथ्यांश स्व-अनुभवाने प्रत्यक्ष निरीक्षण करून पडताळावा आणि किनाऱ्यांची ठेवण आणि उतार पाहून जोखावा.. ..या देशाटनामध्ये जे जे काही दृष्टीस पडेल त्याची नेटकी नोंद ठेवावी. प्रत्येक गावाचे नाव, पाहिलेल्या वस्तू आणि परिसर दृष्टोत्पत्तीस कसा आढळतो, त्या त्या भागातून कशाची पैदास होते याचे यथार्थ वर्णन नोंदवून ठेवावे. खेरीज जे काही निराळे वा विशेष आढळेल तेही नोंदवावे. आपण तयार केलेल्या नदी व खाडींच्या नकाशासोबतच अशा नोंदवहीची एक स्वतंत्र प्रत माझ्या परिशीलनार्थ तयार करून माझ्या कचेरीस धाडावी..’’

ज्याला हे आज्ञावजा पत्र धाडले तो जेम्स रेनेल कोण होता? डेव्हॉनशायरमधल्या ख्युडलेग गावात जन्मलेला अवघा २४ वर्षांचा तरुण. त्याचे वडील तोफखान्यात कप्तान होते. तो वयाच्या १४ व्या वर्षीच नाविक दलात भरती झाला होता. १६ वर्षांचा असतानाच तो नाविक सर्वेक्षणात काम करीत होता. १७६३ साली तो ईस्ट इंडिया कंपनीत दाखल होऊन फिलिपिन बेटांच्या सर्वेक्षणांत सामील झाला. त्याचा नाविक सर्वेक्षणाचा अनुभव लक्षात घेऊनच त्याची वर्णी या विशेष कामी लागली होती.

पुढे दोन-अडीच वर्षांनी त्याचे कौशल्य, धाडस, ध्यास धरून निगुतीने काम करण्याची वृत्ती बघून त्याला सर्वेक्षण अधिप्रमुख म्हणून नेमण्याची शिफारस क्लाइव्हने केली. त्याने केलेल्या कामाची गुणवत्ता, त्याने सोसलेली झीज, शारीरिक इजा आणि जिवाचे धाडस याबद्दल क्लाइव्हने त्याची प्रशंसा केली होती.

शारीरिक इजा आणि जिवावर बेतण्याचे प्रसंग आणि जोखमा कोणत्या? एक तर सर्वेक्षण जिथे चाले तो भाग हवामानाने गरम आणि दमट. त्यामुळे अतोनात थकवा येई. अस्वच्छ पाणी, मिळेल तसे अन्न यामुळे शारीरिक व्याधी जडत. काही प्रदेश तर इतके खडतर असायचे की तिथे कामाला धाडणे म्हणजे मृत्युदंड समजला जाई! त्यावर कडी म्हणजे सर्वेक्षण करणाऱ्यांना लुटारू लुबाडायचे आणि मारहाण करायचे. खेरीज हिंस्र श्वापदांचे हल्ले होत असत. सहकाऱ्यांवर लुटारूंनी केलेल्या हल्ल्याला तोंड देताना रेनेल जायबंदी झाला होता. खेरीज एका बिबटय़ाने बरोबरच्या पाच जणांना घायाळ केल्यावर आपल्या संगिनीने त्या बिबटय़ाला रेनेलने मारले होते.

त्याच्या नेमणुकीबाबत संचालक मंडळाला लिहिलेल्या पत्रात जे म्हटले आहे त्याचा गोषवारा असा- ‘‘आपल्या अखत्यारीतील मुलूख, तेथील संपत्ती आणि लष्करी कारवाई या दोन्ही दृष्टीने अचूक सर्वेक्षण फार जरुरी असते. यासाठी सगळ्यांनाच सध्या जुंपून सामील केले जाते, पण त्यात सुटेसुटेपणा, विस्कळीतपणा आणि विसंगती राहतात. हे ध्यानात घेऊन सर्वेक्षणाच्या कामात विशेष तरबेज कौशल्य आणि अनुभव असलेल्या तरुण जेम्स रेनेल [सोबतचे चित्र रेनेलचेच] याची सर्वेक्षण सर्वाधिकारी (सव्‍‌र्हेअर जनरल) म्हणून नेमणूक करण्यात यावी. त्याने सर्व माहिती व चित्रणांचा वापर करून एकसंध बृहत् आराखडा तयार करावा. अर्थात हे काम करताना त्यांचे स्वत:चे जारी असलेले सर्वेक्षण चालू ठेवण्यास काहीच प्रत्यवाय नाही. या कामात नुकताच मोठा शारीरिक इजा व नुकसान करणारा बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला. त्यातून ते निभावले आहेत. प्रतिकूल स्थिती, तुटपुंजी साधने असूनही अन्य युरोपीयांनी अजिबात न धुंडाळलेला मोठा भूभाग ते नेटाने आणि जोमाने पालथा घालीत आहेत. त्यांनी आपल्या आधिपत्याखालील अभियंत्यांना असेच प्रशिक्षण देऊन कार्य सातत्याने राखावे.. जिवावर बेतणारी जोखीम घेत त्यांनी केलेली मोलाची कामगिरी लक्षात घेता त्यांना दरमहा ३०० रु. इतके वेतन देण्याची शिफारस आम्ही करतो.’’

रेनेलची स्वत:ची सर्वेक्षणाची मूळ ‘स्मरण नोंदवही’ छापली गेली आहे. त्याच्या चरित्र-प्रस्तावनेत या ३०० रुपये महिना वेतनाबद्दल केलेली तळटीप सांगते की, नियामक मंडळाचा सदस्य असताना वॉरन हेस्टिंगला मिळणाऱ्या रकमेइतके हे वेतन आहे! एरवी कवडीचुंबक असणाऱ्या कंपनीच्या लेखी असणारे हे ‘नकाशा-कर्त्यां’चे वेतनमानच खरे तर नकाशांचे मोल सांगते!

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:03 am

Web Title: article on value of map work abn 97
Just Now!
X