निवृत्ती म्हणजे Retirement. पण मी त्यात थोडीशी दुरुस्ती करतो ती अशी- Re-tire. आपल्या आयुष्याच्या गाडीची चाके बदलणे किंवा सेकंड इनिंग असेही म्हणतात. निवृत्तीनंतर वेळच वेळ मिळतो. काही दिवस आराम करायला मजा वाटते. पण नंतर या वेळेचं नीट नियोजन केले नाही तर मात्र तोच वेळ खायला उठतो. म्हणून स्वत:ला कशात तरी गुंतवून घेणे आवश्यक ठरतं. नित्य नव्या छोटय़ा छोटय़ा निर्मितीचा ध्यास जोपासला तर मन आनंदी राहून इतरांना पण आपण हवेहवेसे वाटतो. मन शांत व आनंदी ठेवणे, आयुष्य मनसोक्त जगणे हेच आता ध्येय बनते. सेवानिवृत्ती जरी मिळाली तरी आयुष्यातील प्रश्न कधीच संपत नाहीत. आजारपण हा सगळ्यात मोठा अडसर ठरतो. वेळच्या वेळी तब्येतीची तपासणी करून नियमित न विसरता औषधं घेणे, निरोगी राहण्यासाठी नियमित झेपेल तेवढा व्यायाम करणे, संतुलित आहार ठेवणे. यामुळे आजारपण दूर पळते. रोज उगवणाऱ्या नव्या दिवसाचे सकारात्मकरीत्या स्वागत करायला शिकायची तयारी करावी. यासाठी सतत काही तरी नवं शिकायची तयारी ठेवली तर ते सोपे जाते.

आमच्या कंपनीत निवृत्त होण्यापूर्वी, एक खास कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत ‘निवृत्तीनंतर आपलं आयुष्य कसे व्यतीत करावे’ यावर तज्ज्ञांनी खूप छान मार्गदर्शन केले होते, त्याचा मला नंतर खूप उपयोग झाला. माझं वय आता ७८ वर्षे आहे. १९९९ मध्ये एका नामांकित कंपनीतून सेवानिवृत्त झालो. मी भविष्याची तरतूद सुरू करायची म्हणून महाराष्ट्र तंत्र शिक्षणाचा ‘औद्योगिक सुरक्षा’ या विषयावरील डिप्लोमा व इतर जोड कोर्स केले. हा कोर्स केल्यामुळे मी आजतागायत कामात व्यग्र राहू शकलो. हे कामच मला निवृत्तीनंतर रिकामपणामुळे येणाऱ्या मानसिक वेदनांवरचे औषध ठरले. तारापूर येथील महत्त्वाच्या अशा अणुवीज प्रकल्पात रिअ‍ॅक्टरमध्ये मला काम करता आले, जिथे आता प्रवेश निषिद्ध आहे. सुरक्षा ऑडिटच्या व प्रशिक्षण कामामुळे मला सर्व आखाती देशांचा प्रवास करता आला. सर्व भारत देश बघायला मिळाला. आजूबाजूच्या  समस्यांचा साक्षीदार होता आले, जे एरवी शक्य झाले असते का अशी शंका येते. या अनुभवामुळे माझं आयुष्य समृद्ध व परिपक्व झाले. अनुभवी ज्येष्ठत्व आल्यामुळे माझे सर्वत्र आदरपूर्वक स्वागत होते, हीच मी माझी कमाई समजतो. माझ्या अनुभवाच्या आधारे औद्योगिक क्षेत्रात, अपघात प्रतिबंधक उपाययोजना सुचवल्यामुळे, अपघातांचे प्रमाण कमी होण्यात थोडीफार मदत झाल्याचे जेव्हा आवर्जून मला फोन येतात तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्याने समाधान वाटते. मानधनाची फारशी अपेक्षा न ठेवता मी औद्योगिक कामगारांचे सुरक्षा प्रशिक्षण करायला सुरुवात केली आहे. औद्योगिक कामगारांचा सुरक्षेकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक करणे हे मोठे आव्हान असते. त्यासाठी मला खूप वाचन करावे लागते. औद्योगिक-मनोवैज्ञानिक ज्ञान संपादावे लागले. यामुळे माझा वेळ खूप मजेत जातो. याच जोडीला फावल्या वेळेत मी माझे वाचन चालू ठेवले आहे. अवघड इंग्रजी शब्द व परिच्छेद मी वहीत नोंदत गेलो. मला भावलेल्या इंग्रजी लेखांचे व पुस्तकांतील काही भागांचे मराठीत अनुवाद करतो. अशा रीतीने मी माझे आयुष्य भरभरून जगत आहे.

– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

 

विद्यार्थ्यांच्या जगतातील ताजेपणा

३० सप्टेंबर २००७, माझ्या सेवानिवृत्तीचा दिवस. परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये ३० वर्षांच्या दीर्घ अध्यापन सेवेबद्दल माझा हृद्य निरोपसमारंभ पार पडला अन् जड अंत:करणाने सर्वाचा निरोप घेऊन मी घरी परतले. शाळेची वास्तू, सहकारी शिक्षक, कर्मचारी व लाडके विद्यार्थी यांच्या विरहाने मन व्याकूळ झाले होते. ‘निवृत्तीनंतर पुढे काय?’ हा एकच प्रश्न मनाला सतावत होता. आपले पुढील आयुष्य रटाळ, निरस नाही ना होणार? अशी भीती मनात घर करून बसली होती.

दोन दिवस असे अस्वस्थतेत गेल्यावर मी मनाची मरगळ टाकून नव्या वाटा, नव्या दिशा शोधण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत प्रपंच-नोकरी, मुलांचे संगोपन यात गुंतलेल्या माझ्या मनाने वयाच्या ६० व्या वर्षी का होईना, या चाकोरीतून थोडे बाहेर डोकावून मोकळा श्वास घेण्याचे ठरवले. घरची जबाबदारी सांभाळून वाचन-लेखन, नित्यनेमाने फिरणे, महिला मंडळामध्ये मन गुंतवले. वर्षांतून एक-दोन वेळा दूरचा प्रवास करायला सुरुवात केली. मनाला बरेचसे हलके वाटले. स्वच्छंदी फुलपाखरू झाल्यासारखे वाटले. नव्या मत्रिणी भेटल्या, जुन्याही मत्रिणी मधून-मधून भेटत राहिल्या. एकंदर नव्या वळणाला छान सुरुवात झाली.

आयुष्य भरभरून जगताना स्वत:पुरते न पाहता समाजासाठी काही तरी करावे असे सतत मनाला वाटू लागले. सुदैवाने कल्पना विहार महिला मंडळाच्या शिक्षण समितीमध्ये उशिरा का होईना सहभागी होण्याची मला संधी मिळाली. २००९ मध्ये मी या समितीची सभासद झाले. समाजसेविका प्रभाताई देशमुख यांच्या कल्पनेतून १४ वर्षांपूर्वी या शिक्षण समितीचा जन्म झाला.

आजतागायत त्या मंडळाच्या व शिक्षण समितीच्या सक्रिय मार्गदर्शक आहेत. वय वर्षे ८५ पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवील असा आहे. शिक्षण समितीत आम्ही १८ सभासद भगिनी कार्यरत असून आम्ही सर्व जणी प्रभाताईंच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने समितीचे काम करतो. मुलुंडमधील सात मराठी माध्यमाच्या शाळांमधील गरीब होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनींना जुलमध्ये संगणक फी, शैक्षणिक साहित्याकरिता आम्ही आर्थिक मदत देतो. त्याचबरोबर प्रत्येक शाळेतून ४ दत्तक विद्यार्थ्यांना आíथक साहाय्य करतो.

दरम्यान समितीतर्फे ‘वयात येताना’ हा लैंगिक शिक्षणाचा उपक्रम ७ वी, ८ वीच्या मुला-मुलींसाठी सर्व शाळांमधून सुरू करण्याचे ठरले व आतापर्यंत हा विषय शाळांमध्ये फारसा शिकविला जात नसे. आम्हाला सातही शाळांमधून हा उपक्रम घेण्यासाठी शाळांची परवानगी मिळाली.

तिथे मी मुलींशी संवाद साधू लागले. वयात येणाऱ्या या उमलणाऱ्या कळ्या नराधमांकडून कुस्करल्या जाऊ नयेत या इच्छेने दरवर्षी हा उपक्रम समितीतर्फे आम्ही घेतो. दहावीच्या मुलांना प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञाचे मार्गदर्शनपर व्याख्यान, समितीतील अनुभवी शिक्षकांचे विषयानुरूप व्याख्यान इत्यादीमुळे विद्यार्थ्यांना भेटण्याचा आम्हाला वारंवार योग येतो.

या समितीत ८ वर्षे कार्यरत असल्याने मुलुंडमधील शाळांमधील शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी सतत संपर्क येत असल्याने उतारवयातही काम करताना उत्साह वाटतो. आता आयुष्याच्या उतारावर शेवटच्या श्वासापर्यंत अवतीभवतीच्या निराधार मुलांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी काही तरी करावे, गरजू वृद्धांसाठी हात पुढे करावा एवढीच इच्छा.

विभा भोसले, मुलुंड

 

नवनिर्मितीचा आनंद

माझ्या मते ‘भरभरून जगताना’ या विषयावर लिहिण्यासाठी वयाची जी अट (६० वर्षे पूर्ण) आहे तीच मुळी योग्य नाही. कारण आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे, शिक्षणामुळे आणि वाढलेल्या आयुर्मानामुळे ७०-७५ पर्यंत माणसं कार्यक्षम असलेली दिसून येतात. निव्वळ नोकरीतील निवृत्तीचे वय ५८-६० असल्याने, नोकरी संपली की वृद्धत्व सुरू, नि म्हणून ज्येष्ठ नागरिकत्वाचा शिक्का बसणे सर्वथा अयोग्य वाटते.

व्यवसाय करणारे किती तरी जण ७०-७५ पर्यंत सर्व कारभार सांभाळताना दिसतात. शिवाय जो माणूस आधीचे जीवन भरभरून जगायला शिकलेला असतो तो साठीनंतरही तसेच जगू शकतो. अर्थात एक खरे की, साठीनंतर जबाबदाऱ्या आणि धावपळ कमी झाल्याने जरा निवांतपणा मिळू शकतो आणि आपल्याला हवे तसे जगता येते ही भावना त्यांना सुखावून टाकू शकते. आता तसे जगण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. पण तरीही आधीपासूनच एखादा छंद, आवड वा विशिष्ट काम करण्यातून आनंद मिळत असेल तर साठीनंतर ते चालू ठेवून अधिक आनंद उपभोगता येतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटते.

मला वाटते की, जे काम, छंद, आवडीनिवडी मी आधीपासून करीत होते, तेच पण थोडय़ा वेगळ्या स्वरूपात उत्तर-आयुष्यातही करते आहे. भूगोल विषयाची प्राध्यापिका म्हणून ३५ वर्षे कार्यरत राहिल्याने वाचन-लिखाण यांची आवड तर आहेच. शिवाय निसर्ग आणि भवताल हाच अभ्यास आणि शिकविण्याचा विषय असल्याने वैशिष्टय़पूर्ण ठिकाणे पाहायला जाणे हे माझ्या सत्तरीपर्यंत तरी चालू आहे. निवृत्त झाल्यानंतरच्या १० वर्षांत पदव्युत्तर पातळीवरील दोन पाठय़पुस्तकांचे लिखाण, माझ्या विषयाशी निगडित एन.बी.टी.च्या तीन पुस्तकांचे मराठी अनुवाद आणि एका जगप्रसिद्ध लेखकाच्या कादंबरीचा अनुवाद प्रसिद्ध केल्याने खूप आनंद व समाधान मिळाले आहे. तसेच काही प्रासंगिक लेख आणि इंग्रजी कथांचे मराठी अनुवादही दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय थोडीफार भटकंती आणि विणकाम चालू असतेच. हे सारे करताना मी इतकी मग्न होऊन जाते की, मनातील ताण-तणाव तर दूर होतातच शिवाय नवनिर्मितीचा आनंदही मिळतो.

अनेकांना असे वाटते की, साठीनंतर काय करायचे हा प्रश्न प्रामुख्याने पुरुषांना भेडसावत असतो. कारण स्त्रिया दररोज करावा लागणारा स्वयंपाक, घरकाम अशी ‘इन्व्हिझिबल’ कामे करून स्वत:ला गुंतवून ठेवू शकतात. परंतु माझ्यासारखी निवृत्त प्राध्यापिका अशा कामांना किमान वेळ देऊन स्वत:चे वाचन, लिखाण चालू ठेवून पर्यटनालाही जाऊन येऊ शकते. इच्छा नसली तरी स्त्रीने स्वत:ला किचनमध्येच अडकविले पाहिजे, ही धारणा चुकीची आहे असे मला वाटते.

या सगळ्यात जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरते. आम्ही दोघेही वेगळ्या विषयांचे असलो तरी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि त्यामुळे दोघांच्याही विषयांची चर्चा, वाचन, विचारांची देवाण-घेवाण सतत चालू असे. निवृत्तीनंतर त्याचे स्वरूप जरी थोडेसे बदललेले असले तरी विषयातील बारकावे आजही घरात चर्चिले जातातच. दोघातील संवाद त्यामुळे अविरत चालू असतो. जरी आम्ही स्वतंत्रपणे काम करीत असलो, तरी कामासंदर्भात आस्था असल्यामुळे मदत व ऊहापोह चालूच असतो. निवृत्तीनंतर भरभरून जगण्यासाठी विवाहोत्तर सहजीवनाची पार्श्वभूमी हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.

परंतु याच्याच पुढचा विचारही मनात आल्याखेरीज राहत नाही. तो म्हणजे, दोघांपैकी जो एक जण मागे राहील त्याने भरभरून कसे जगायचे? स्वत:ची काळजी घेत, शक्यतो परावलंबित्व येऊ न देता स्वतंत्रपणे एकटे राहण्यासाठी मानसिक तयारी करणे जरुरीचे आहे. माझा स्वभाव मुळातच ‘महिला मंडळा’त रमणारा नाही; देव-धर्म, पूजा-अर्चा, समारंभ-मजा आदीत मला रस वाटत नाही. हे बदलणे तर शक्य नाही, म्हणून काळजीही वाटते. मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावली आहेत आणि निदान आज तरी आम्ही मनासारखे जगतो आहोत. नाही तरी पुढचे कुणाला ठाऊक असते?

विजया साळुंके, पुणे