सध्या चाळीस ते पन्नास टक्के संसार लग्नानंतर काही वर्षांतच तुटत आहेत. हे असं का होतं आहे, याचा अभ्यास केला जातो आहे, अत्यंत अनोख्या अशा भावनांच्या प्रयोगशाळेत..

विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे मनोमीलन ..दोन कुटुंबे आणि त्यामधील सर्वाच्या भावनांना एकत्र आणणारं माध्यम..प्रेम, जिव्हाळा, आदर, सन्मान, आपुलकी तसेच राग, भीती, घृणा, असूया आणि निराशा या व अशा असंख्य भावनांचं एक अनोखं दालन. खरं तर ‘विवाह’ ही माणसं जोडणारी, सहसंवेदना जपणारी आणि जाणिवा जागृत करणारी आश्वासक संस्था. पण या विवाहसंस्थेबद्दल, तिच्या मूलभूत कार्यकारणाविषयी शंका निर्माण होईल, अशी धक्कादायक परिस्थिती सध्या सर्व जगभर दिसत आहे. चाळीस ते पन्नास टक्के संसार लग्नानंतर काही वर्षांतच भंग पावत आहेत आणि आता तर लग्न ते घटस्फोट हा कालही कमी होत चालला आहे. विवाहसंबंधांतील आणि त्या नात्यामधील एकसंधपणा हा ‘भावनिक सुसंवादावर’ अवलंबून असतो. नातं हे फुलण्याच्या ऐवजी तुटत कसं जातं, विवाह मोडण्याच्या पाऊलखुणा निर्माण कशा होतात, हे आता अनोख्या भावनांच्या प्रयोगशाळांमध्ये निर्वविाद सिद्ध होत आहे. अशा अद्भुत विवाह ‘प्रयोगशाळेविषयी’..

श्री : माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का?

सौ : (उपरोधिक आवाजात).. माझे कपडे धोब्याकडे टाकलेस का? तुला नाही टाकता येत? मी काय तुझी दासी आहे, सारखं तुझ्या मागे मागे नोकरासारखं फिरायला?

श्री : (दबक्या आवाजात). दासीच बरी तुझ्यापेक्षा, ही कामे तिला वेळेवर नीट जमली तरी असती..

हा संवाद एखाद्या टीव्ही सीरियलमधील असता तर एक वेळ ठीक होत, पण एखाद्या घरात जर हे आणि असे तिखट उपरोधिक बोलणे नित्यनेमाने होत असेल तर.

हा खराखुरा प्रसंग आहे जॉन गॉटमन यांच्या ‘विवाह प्रयोगशाळा’मधला. या प्रयोगशाळेमध्ये गेली तीस वर्षे हा मानसशास्त्रज्ञ विवाहबंधनामधील भावनिक संवादावर संशोधन करीत आहे. घरामध्ये श्री व सौ यांच्यात होणारे संवाद व्हिडीओ टेप करून या प्रयोगशाळेमध्ये बघितले जातात. मग सर्व वैज्ञानिक तासन्तास बसून सूक्ष्म निरीक्षणातून त्या संवादातील भावनिक अभिव्यक्तीचे परीक्षण (microanalysis) करतात. शेकडो जोडप्यांमधील अशा संवाद निरीक्षणामधून मग संवादातील चुकांचा (fault lines) चा अभ्यास केला जातो. एखादे जोडपे पुढे जाऊन तीन वर्षांत घटस्फोटापर्यंत जाईल का, याचे अनुमान या परीक्षणातून काढले जाते. अशा अद्भुत प्रयोगशाळेतील निष्कर्ष हे जवळजवळ ९५ टक्के खरे होतात, असे निष्पन्न झाले आहे. इथे कुठेही ढोबळ भविष्यवाणी नसते किंवा ज्योतिषशास्त्र वापरले जात नाही पण इथे संवादातील भावनिक अंतरंगांचा सूक्ष्म अभ्यास करून अचूक अंदाज बांधले जातात. ते सुद्धा तंतोतंत खरे.

काही नवविवाहित तर काही जुनी जोडपी इथे परीक्षणासाठी असतात. जोडप्यांमधील व्यक्तींचं सेन्सर्सच्या माध्यमातून सूक्ष्म निरीक्षण केलं जातं. त्यांच्या देहबोलीचा, चेहऱ्यावरील एक्स्प्रेशनचा, हृदयाची गती आणि शरीरात निर्माण होणाऱ्या संप्रेरकांचा अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला जातो. त्यातूनच मग अचूक अनुमान केले जाते. त्यानंतर मग जोडप्यामधील व्यक्तीला प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळं बोलावलं जातं आणि तीच व्हिडीओ टेप परत दाखविली जातं. अशा प्रसंगात तो वादळी संवाद चालू असताना मनामध्ये कुठले विचार होते, नेमकं मनामध्ये काय चालल होतं यासंबंधी त्यांना बोलतं केलं जातं. मनाच्या स्क्रीनवरील भावनांच्या नाजूक ठश्यांचे निरीक्षण केलं जातं. जसं काही या विवाह प्रयोगशाळेत त्यांची भावनिक क्ष-किरण तपासणीच होत असते!!

संवादातील धोक्याच्या घंटा कुठल्या? जोडप्यामध्ये वाद होत असताना मतं मांडली कशी जातात? दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतलं जातं अथवा नाही? मतभिन्नता कशी व्यक्त केली जाते? बोचरी टीका केली जाते का दुसऱ्याच्या भावना स्वीकारल्या जातात? विवाहबंधनामध्ये तडे जायला कशी सुरुवात होते? या व अशा असंख्य निरीक्षणातून विवाह संबंधातील व ऋणानुबंधातील भावनिक दुव्यांचा खोलवर जाऊन अभ्यास केला जातो. नातेसंबंधांवर भावनांचा किती प्रभाव आहे हे यामधून अधोरेखित होतं.

या विवाह प्रयोगशाळेतील परीक्षण केलेला असाच एक खराखुरा प्रसंग.

प्रिया, तिची मुलगी साना आणि नवरा नील मॉलमध्ये शॉिपगसाठी जातात. प्रिया आणि मुलगी कपडय़ांच्या दुकानात जातात तर नील इलेक्ट्रॉनिक डिजिटल शॉपमध्ये खरेदी करावयास जातो. शॉिपग झाल्यानंतर एका तासात मॉलच्या दाराशी जमायचं ठरतं. त्यानंतर लगेचच बाजूच्या थिएटरमध्ये आयत्या वेळेला तिकीट काढून दुपारचा सिनेमा पाहायचं ठरतं. प्रिया नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचते पण नीलला उशीर होतो. ‘‘कुठे गेलाय हा ? सिनेमा सुरू व्हायला फक्त दहा मिनिटं उरली आहेत. मोबाइलही उचलत नाहीय. आयत्या वेळेस नेमकं उशीर करून पूर्ण आनंदावर विरजण टाकायची सवयच आहे तुझ्या बाबांची.’’ प्रिया मुलीला तक्रारीच्या सुरात सांगत असते. ‘‘तुझ्या बाबांचं नेहमीचंच आहे हे, एक गोष्ट नीट करतील तर शपथ.’’ नील दहा मिनिटांत पोहोचतो.

‘‘जुना मित्र मध्येच भेटल्यामुळे उशीर झाला, सॉरी.’’ असं म्हणून तो सारवासारव करावयास सुरुवात करतो. प्रियाचं उपरोधिक बोलणं काही थांबत नाही. ‘‘हं. आलास.. चांगलं काही ठरवलं की त्याचा विचका कसा करायचा हे तुला कसं अचूक जमतं याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू.’’

सूचना, तक्रार आणि वैयक्तिक टीका यामध्ये फरक असतो. इथे पूर्ण व्यक्तिमत्त्वावर व चारित्र्यावर दोषारोप केले गेले. बेजबाबदार व स्वार्थी अशी लेबलं लावून पूर्ण व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडवले गेले. हे सर्व योग्य शब्दात, परखडपणे पण उपरोधिक न होता सांगता आलं असतं, पण प्रियाला ते जमले नाही. अर्थात भावनांबद्दलच्या काही मूलभूत कौशल्यांचा अभाव याला कारणीभूत होता. हे असं जर वारंवार घडत गेलं तर तर या नात्याचं पुढे काय होईल ते काही वेगळं सांगायला नको. विवाहाची गाडी रुळावरून घसरण्यास अशीच सुरुवात होते.

सखोल प्रयोगातून अशा अनेक संवादातील संभाव्य धोक्याबद्दल मार्मिक विवेचन विवाह प्रयोगशाळेमध्ये करण्यात येतं. संवादामध्ये नेमकं काय व कसं बोलायचं आणि काय टाळायचं हे सुचवण्यात येतं.

जोडप्यांमधील संवादामध्ये टीका, तक्रार अजिबात करायचीच नाही असं नाही. इथे प्रिया आणि नीलमधील संवादाचा रोख व्यक्तिमत्त्वाकडे न जाता व्यक्तीच्या न पटलेल्या कार्यपद्धतीकडे व वर्तनाकडे असावयास हवा होता. काही मूलभूत ‘भावनिक कौशल्य’ असती तर कदाचित संवाद असा झाला असता..

‘‘तू वेळेवर पोहोचला नाहीस की मला अतिशय चीड येते, आधी ठरवूनसुद्धा उशीर झाल्यामुळे आम्हाला ताटकळत बसल्यासारखं वाटलं आणि आता सिनेमाही वेळेवर बघता येणार नाही. कदाचित मित्राला तू घाईत आहेस हे सांगता आलं असतं.’’

इथे स्वत:च्या भावना व्यक्त केल्या जातात. अपेक्षा आणि गरजा सांगितल्या जातात व कुठली कृती आवडली असती हेही अभिव्यक्त केलं जातं पण कुठेही पूर्ण व्यक्तिमत्त्वावर बोचरी टीका न करता आणि त्यात उपरोधिकपणा किंवा तिरस्कार न आणता!! दुसऱ्या व्यक्तीला इथे चुकीच्या कृतीची जाणीव करून दिली जाते पण चूक सुधारण्याची संधीही दिली जाते. मुख्य म्हणजे कुठेही दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करतोय, तुच्छ लेखतोय किंवा सदोष व्यक्तिमत्त्व आहे, असा संदेश दिला जात नाही. नातं जपण्यासाठी आणि अधिक फुलविण्यासाठी हेही नसे थोडके!!

गॉटमन यांच्या विवाह प्रयोगशाळेमध्ये संवादातील उपरोधिकपणा, घृणा व तिरस्कार या भावना तपासल्या जातात. देहबोली व चेहऱ्यावरील स्नायूंचा सूक्ष्म अभ्यास करून शब्दांपलीकडील संवादाविषयी जोडप्यामध्ये भान निर्माण केलं जातं.

या प्रयोगशाळेत एक धक्कादायक पण बोचरं वैज्ञानिक सत्य समोर आलं आहे.

जर जोडप्यामधील संवादामध्ये सौ.च्या चेहऱ्यावर ‘घृणा’ ही भावना पंधरा मिनिटांत चार ते पाचपेक्षा जास्त वेळा व्यक्त झाली तर तो विवाह पुढील चार वर्षांत भंग पावण्याच्या त्या हुकमी पाऊलखुणा समजाव्यात!!

एका घरात मुलांनी उच्छाद मांडलेला असतो. सतत भांडणं चालू असतात. मंदार अतिशय अस्वस्थ होऊन आपल्या पत्नी मीनलला तक्रारीच्या सुरात..

‘‘मीनल, तुला नाही वाटत मुलांनी थोडं शांत व्हावं? (मनातले अतिरेकी विचार – ही मुलांना खूपच मोकळीक देते आणि अवास्तव लाडही करते.)

मंदारचा तिरकस प्रश्न ऐकून मीनल थोडी चिडचिडत..

‘‘मुलं मजा करतायत ना.. आणि झोपतीलच आता थोडय़ा वेळात (मनातील अतिरेकी विचार – झालं याचं सुरू नेहमीचं तक्रार करणं..)

मंदारचा रागाचा पारा वाढत जातो, दात-ओठ खाणं व हात झटकणं चालू होतं.

‘‘आता त्यांना सरळ केलंच पाहिजे. झोपवतोच त्यांना आत्ता..’’ (अतिरेकी विचार – प्रत्येक गोष्टीत मध्ये आडवी येते ही. आता मला सर्व माझ्याच हातात घेतलं पाहिजे)

‘‘नको. जाऊ दे.. मीच त्यांना झोपवते आता.. तुझी सारखी कुरकुर आणि तक्रार ऐकण्यापेक्षा..’’ (बाप रे! हा आता रागाच्या भरात काहीही करेल..)

जोडप्यांमधील संवादात काय बोललं जातं (व्यक्त), त्या वेळी देहबोली कशी असते (अव्यक्त) आणि त्यामागचे मनातील अतिरेकी विचार काय असतात, याबद्दल अनेक विवाह प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करण्यात आले आहेत. दोन व्यक्तींमधील भावनिक सुसंवाद हा बऱ्याच अंशी मनातील अतिरेकी/ विषारी विचारांवर अवलंबून असतो. या अतिरेकी विचारांच्या मागे काही स्वतबद्दलची आणि दुसऱ्याबद्दलची गृहीतकं आणि ऑटोमेटिक थॉट्स असतात असं डॉ. एरोन बेक यांच्या प्रयोगशाळेत सिद्ध झालं आहे. त्याचप्रमाणे डॉ. मार्टनि सेलिग्मन यांच्या प्रयोगशाळेत मूलभूत आशावादी व निराशावादी विचारसरणीवर हे विचार अवलंबून आहेत असं दिसून आलं आहे. वरील संवादामध्ये मीनल निराशावादी विचारसरणीची असल्याने तिच्या मनातील विचार असे होते.

‘‘हा नेहमीच तक्रारी करून मला त्रास देत असतो.’’

मंदारचे मनातील समांतर विचार.. ‘‘ही माझं कधी ऐकतच नाही. स्वतचंच घोडं पुढे दामटते.’’

अशा प्रकारचे विचारच मग दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये तेढ निर्माण करावयास लागतात. हळूहळू छेद निर्माण होऊ लागतात. व्यक्ती दुरावतात, नाती तुटतात आणि या सर्वाचा अर्थातच घरातील मुलांच्या वाढीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

विवाहामध्ये वादळ निर्माण होण्यामागे व विवाहाचा रथ चौफेर उधळण्यामागे ‘चार भावनांच्या घोडेस्वारांचा’ हातभार नेहमीच असतो, असा निष्कर्ष या विवाह प्रयोगशाळेमध्ये काढण्यात आला आहे. त्या आहेत ‘टीका, तिरस्कार, बचावात्मक पवित्रा आणि अलिप्तता!! या घोडेस्वारांना फोर हॉर्समेन फॉर अ‍ॅपोकॅलस्पी (Four horsemen of Apocalapsy) असं म्हणण्यात येतं. खरं तर विवाहाचा रथ जर प्रेम, आदर, विश्वास आणि जिव्हाळा या चार भावनांच्या घोडेस्वारांकडे असेल तर नातं फुलत जातं आणि चिरकाल टिकतंही, पण जर नात्याच्या टप्प्यांमध्ये जर बोचरी वैयक्तिक टीका येऊ लागली तर मात्र विवाहरथ उधळून दिशाहीन प्रवास करू लागतो, ज्याचा अंतिम मार्ग विसंवादाकडे आणि घटस्फोटाकडे जातो. पती-पत्नीमधील विसंवाद हा या चार भावनिक टप्प्यांमधूनच जात असतो.

या विवाह प्रयोगशाळांमध्ये जसं भावनिक विसंवादाचं विवेचन केलं जातं तसंच त्यावरील सुसंवादासाठी उपायही सुचवले जातात.

वर उल्लेख केलेल्या प्रिया आणि मीनलच्या उदाहरणामध्ये विसंवाद बोचऱ्या वैयक्तिक टीकेने झाला आहे. मॉलमध्ये वेळेवर न पोहोचणारा नील आणि मुलांबद्दल तक्रार करणारा मंदार दोघांचंही वर्तन अस्वीकारार्ह होतं. पण संवादामध्ये ‘‘किती बेजबाबदार आणि स्वार्थी आहेस तू आणि ‘‘सारखी कुरकुर आणि तक्रार करण्याची सवयच आहे तुझी’’ अशा वैयक्तिक टीकेमुळे पुढील आणिक भयंकर घोडेस्वार येऊन उभा ठाकला आणि तो म्हणजे ‘तिरस्कार (द्वेष)’.

वैयक्तिक टीका कशी टाळायची हे आपण वर उदाहरणातून बघितलं. आता टीकेकडून प्रवास तिरस्काराकडे जाऊ नये म्हणून काय केलं पाहिजे यावर प्रयोगशाळेमधील उपाय सुचविले आहेत ते म्हणजे, आपण आपल्या भावना आणि मतं दाबून न ठेवता ती योग्य प्रकारे व्यक्त करणं. प्रश्न आणि मतभेद हे त्याच वेळेस लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे. उदा. राग व्यक्त करताना तो दुसऱ्याच्या विशिष्ट कृतीबद्दल असावा, पण पूर्ण व्यक्तिमत्त्व किंवा चारित्र्याबद्दल नसावा. त्यामध्ये आरोप आणि दोष देणे नसावे. दोन पावलं मागे जाणं होऊ शकतं, तसंच तुमचं म्हणणं सांगताना ‘‘तू नेहमीच..’’ ‘‘तू कधीच..’’ किंवा ‘‘तू असंच कर..’’ असे शब्द टाळणं होऊ शकते. अर्थात इथे नील आणि मंदार यांनी आपल्या सहचारिणींचा राग वेळीच ओळखून, तो स्वीकारून त्यासाठी योग्य प्रतिसाद आणि कृती केली असती तर रागाची दिशा टीकेकडे गेली नसती.

विसंवादातील पुढचा घोडेस्वार ‘तिरस्कार’ हा जास्तच तीव्र आणि विघातक असतो. जोडीदाराला जर दुसऱ्याबद्दल तिरस्कार वा विद्वेष असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अपमानित करण्यासाठी आणि मन दुखावण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्न करते. ज्या घरात द्वेष आहे तिथे आपुलकी, जिव्हाळा आणि आदर कसा वसणार? विवाह प्रयोगशाळेमध्ये घरात ‘तिरस्कार’ असण्याच्या काही खुणा सूचित केल्या आहेत त्या म्हणजे अपमानित करणं, अपशब्द वापरणं, कुचेष्टा आणि कुत्सितपणे बोलणं, इत्यादी. प्रयोगशाळेमधील उपायही सुचवण्यात आले आहेत. ते म्हणजे जास्तीत जास्त लवकर तिरस्काराला घरातून हद्दपार करावं. त्यासाठी स्वतची संवादशैली, विचारांची दिशा व देहबोली तपासून ती बदलण्याचा प्रयत्न करावा. जर तिरस्करणीय किंवा अपमानित करणारे विचार मनामध्ये असतील तर ते खोडून हळुवार, आशादायी व सुखावणारे विचार मनामध्ये आणावेत. उदा. जरी मला आता याच्या वागण्याबद्दल अतिशय राग आणि घृणा वाटत असली तरी तो इतर वेळेस व्यवस्थितही वागतो. आधीच्या आयुष्यामधील चांगल्या गोष्टी, सुखावणारे क्षण आणि उत्साहवर्धक प्रसंग आठवून जोडीदाराविषयी तिरस्कार कमी करता येईल. नाही तर पुढचा घोडेस्वार घरामध्ये शिरकाव करतो आणि तो म्हणजे बचावात्मक पवित्रा आणि पळवाट शोधणं. जेव्हा जोडीदाराला आपला वारंवार अपमान झाल्यासारखा किंवा कमी लेखल्यासारखं वाटतं तेव्हा तिचा किंवा त्याचा प्रतिसाद हा दुर्लक्ष किंवा कानाडोळा केल्यासारखा होतो. अशा वेळेस घरात एकमेकांचं ऐकून घेतलं जात नाही, जबाबदारी झिडकारली जाते, काही तरी सबबी सांगितल्या जातात किंवा उलट दुसऱ्यावर टीका केली जाते. विवाह प्रयोगशाळेमध्ये संवादामधील शब्दापलीकडील देहबोलीचं निरीक्षण करण्यात आलं आहे. सतत कुरकुर करणं, हाताची घडी घालून ऐकणं किंवा मानेला सारखा हात लावणं या काही खुणा बचावात्मक पवित्रा दर्शवतात. तो कमी करण्यासाठी उपाय म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या टीकेकडे  ‘तिखट शब्दात सांगितलेली माहिती’ या स्वरूपात बघणं! यामुळे संवादातील तेढ कमी होऊ शकेल, एकमेकांना कान देऊन ऐकणं होईल आणि दुसऱ्याला अपमानित केलं जाणार नाही. हे सर्व सांगणं सोपं, पण करणं कठीण असलं तरी प्रयत्न केल्यास पुढे परिस्थिती विकोपास तरी जाणार नाही. ‘‘माझ्या वागण्याचा तुला इतका त्रास होईल हे कळलं नाही मला. माझं चुकलं असेल. यावर आपण थोडं बोलू या का? अशा शब्दांतून नात्यामध्ये जवळीक, विश्वास आणि हळुवारपणा येऊ शकतो. नाही तर पुढचा घोडेस्वार ‘अलिप्तता’ घरामध्ये येऊन उभा ठाकतो. जेव्हा जोडीदार एकत्र येऊन समन्वय साधू शकत नाहीत, प्रश्नांचं निराकरण करू शकत नाहीत किंवा नात्यामध्ये सतत टीका, तिरस्कार आणि पळवाट शोधण्यावर भर देतात तिथे हा पुढला आणि चौथा घोडेस्वार ‘अलिप्तपणा’ घरात हजर होतो. मनाची कवाडं बंद केली जातात, संवादाला वाव दिला जात नाही आणि नात्यामध्ये िभती उभारल्या जातात.

विवाह प्रयोगशाळेमध्ये अलिप्तता दाखवण्यामध्ये ८५ टक्के पुरुषच असतात असं निष्पन्न झालं आहे. ‘‘न बोललेलं बरं, कारण बोललं तर परत परिस्थिती तणावपूर्ण होईल’’ अशी त्यांची मनोधारणा असते. आपण अलिप्तपणे वागतोय हे ज्यांना कळतंय त्यांच्यासाठी प्रयोगशाळेमध्ये काही उपाय सुचविले जातात. आपल्या जोडीदाराला संवादामध्ये बोलताना जास्त संधी देणं, प्रतिसाद देताना पूर्ण लक्ष व कान देऊन ऐकणं, होकारार्थी मान हलवून किंवा ‘हं..’ असं म्हणून संवादातील सहभाग व रस व्यक्त करणं हे तुम्ही करू शकता.

वादविवादामध्ये तीव्र भावना निर्माण होत असतील वा ताणतणाव निर्माण होत असेल तर अशा वेळेस विवाह प्रयोगशाळेमध्ये जोडप्यांना स्वतचा पल्स रेट  बघण्यास सुचवलं जातं. हृदयाची गती २० अंकांनी वाढली तर तेव्हा संवाद थांबवून थोडा वेळ शांत होऊन अध्र्या तासाच्या आत परत संवाद सुरू करणं उपयुक्त ठरतं असं दिसत. यामुळे नात्याचा रथ अलिप्ततेच्या वाटेवर भरकटत नाही.

विवाह प्रयोगशाळेतील सुचविलेल्या या सर्व क्लृप्त्या, उपाय, कौशल्यं आणि सूचना त्या चार भयंकर अघोरी घोडेस्वारांना नात्यामधून दूर ठेवण्यास आणि विवाहरथ उधळू न देण्यास नक्कीच मदत करतील. अशा प्रकारच्या विवाह प्रयोगशाळा लग्नाअगोदरच उपयोगात आणल्या तर? त्यांविषयी जोडीदारांमध्ये भान निर्माण केलं तर? त्याची पुढचं अघटित टाळायला मदत होईल. विसंवाद टळेल, रेशीमगाठी घट्ट होतील, सुसंवाद निर्माण होईल!

डॉ संदीप केळकर – response.lokprabha@expressindia.com