‘‘राती झोपेत व्हते, अचानक जाग आली. कोनतरी अंगाशी चाळा करत व्हतं. भलताच मानूस.. दिलं ढकलून. त्यो पळाला पन् माझ्या नशिबी जागनं आलं. कधी सरायचं हे लाचार जिणं?’’ फांसेपारधी सुनीता नासीर हुसेन हिची कहाणी..
सकाळचे सहा वाजले. तशी ग्रॅण्ट रोड स्टेशनवर पब्लिकची ये-जा सुरू झाली. झोप येत होती. पन उठावं लागलं. गडीमानसं झोपलेल्या बाईकडं बघत बघत जातात. आम्ही ग्रॅण्ट रोड स्टेशन भाएर १ नंबर प्लॅटफार्मला लागून झोपतो. कालच रेल्वेचा सायेब सांगून गेलाय. उद्या मोठा सायेब येणार हाय. सगळं सामान हटवायचं. आम्ही ऱ्हातो तो एरिआ हाय रेल्वेचा! मी लगालगा उठले. नवऱ्याला उठवलं एक नंबर प्लॅटफार्मावर संडासला गेलो. हीथं संडासला २ रुपये घेतात. आन् आंघोळीला २० रुपये द्यावं लागतात. मंग येक दिवस नवरा आंघुळ करतो. आन येक दिवस मी आंघुळ करती. आज मी आंघुळ क्येली. दूध पित पोर झोपलं व्हतं. त्याला उठवलं. कालची भाजी-भाकरी खाऊन घेतली. पोराला चा पाजली आन पथारी आवराया घेतली.
सामानाजवळ नवऱ्याला बशिवलं. नाय तर हाय त्या सामानाची बी चोरी होतेय. म्हयन्यात असं चार-पाच येळा सामान हटवायला लागतं. म्युनिशिपालटीवाले आले तर कामाचं सामान, भांडीकुंडी सगळं घेऊन जात्यात. कधी अर्ध सामान परत देतात, अर्ध फेकून देतात. माज्याकडं राशनकार्ड, आधारकार्ड, व्होटिंग कार्ड, इस्कूल सर्टिफिकेट सगळं हाय. पन तरीबी वीस वरसं झाली. अजून रस्त्यावर ऱ्हातो आम्ही! त्याचं काय झालं, झोपडपट्टीत आम्ही ऱ्हायचो. तिथं आमच्या जातवाली एक बाई ऱ्हायची. ती ‘पावडर’ विकायची. तिच्यापायी पोलिसांनी सगळ्यांवर संशय घेतला आन् सगळ्यांच्या झोपडय़ा तोडल्या. सगळं सामान तोडूनफोडून टाकलं. काय पन माघारी भेटलं नाय. खूप नुकसान झालं आन् आमची फांसेपारधीची सगळी कुटुंबं रस्त्यावर आली. तवाधरनं हिथं रस्त्यावर ऱ्हातो. फुटपाथवर पथारी टाकून जगतो.
सगळं आवरून निघायला येळ झाला. धावतपळत दादरच्या फुलमार्केटला गेली तवर मोगरा संपून गेला. पिवळा चाफा महागला होता. गुलाब तर घ्यायला कदी परवडत न्हाय. सरुबाईकडं जास्तीची फुलं होती. तिने चढय़ा भावानं मला दिली. घेतली मी. ईलाज न्हवता. गजरे विकेन तवा रातची चूल पेटल. आमची पारध्याची जात धंद्यात लय हुशार! माझे भाईबंध ओबरायच्या कट्टय़ावर फुलं, बलून, मक्याचा धंदा करतात. कोनी चौपाटीवर म्युझिक बॉल इकतात. बाया रेल्वेत टिकल्या, माळा विकतात. मी फुलं, गजरे विकते. दादरला माल घेतला आन् स्टेशनावर गजरे करायला बसले. अर्धी फुलं विणून झाली नाय तोच पोलिसांची धाड आली. मी पाटी घिऊन धावत सुटली तर येका बोजेवालीच्या बोज्याला धडकली. पडली. सगळी फुलं आन् गजरे चिखलात माखले. मला रडू आलं. सकाळ धरनं येवढी मेहनत क्येली. ती सगळी पाण्यांत गेली. आता माल बी मिळणार नाय. सिधा गाडी पकडली आन् ग्रॅण्ट रोडला सामान ठिवलं व्हंतं तिथं आली. तान्हा लेकराला पटकुरावर झोपवून नवरा दारू ढोसायला उलथला व्हता. पोराजवळ बसली आन् रडू आवरना झालं! ही कसली जिंदगानी? कसलं जगनं?
आमच्या जातीचा रिवाज म्हंजी बाया स्वत:बी भीक मागनार आन् पोरांनाबी भीक मागाया पाठवनार. आईनं बी माज्या त्येच केलं. बाप दारू गाळायचा. तो मेला तसं आमाला वाऱ्यावर सोडून आई गेली दुसऱ्यासंगं! बाप मेल्यावर भावाने वस्तीपल्याड ऱ्हाणाऱ्या येका मानसासंग त्याने माजं लगीन जमवलं. तो चाळिशीचा बाप्या. मी सोळा वर्साची! तो पायानं अपंग! भावानं पैसं घेतलं आन् त्याच्यासंगं लगीन जमिवलं. मी न्हाय म्हनलं तर लोखंडी चेन घिऊन मारलं. एका मंदिरात त्यानं माज्या गळ्यात हार टाकला. मला शंभर रुपयाची साडी घेतली. लगीन करून सांजच्याला घरी आले. त्यांनी मटन-भात केला. बाजूच्यांना बोलावलं. त्याच्या घरामागं पटरी होती रेल्वेची! मंग रात झाली तशी हंडे घेऊन पाणी आणायला निघाली. चार खेपा टाकल्या. पाचव्या खेपंला कपडय़ांना थैलीत भरून नळावर ठेवलं आन् त्याच फेरीत नळावरून पळाले ती आत्याकडं आले. आत्या दुसऱ्या दिवशी न्हवऱ्याच्या घरी आली तर ते म्हणायला लागले, आमचा खर्च देऊन टाका लग्नाचा! ती म्हणाली, पोरगी ‘अज्ञान’ हाय. पोलिसात कम्पेलंट करू का? तसं ते घाबरले. पुढं मी आत्याकडं ऱ्हायली. मला भीक मागाया आवडत नव्हतं. मला काम करायचं होतं. मोलमजुरी कराची व्हती. पन पारध्यांना कुणी कामाला ठेवत न्हाय. पारधी म्हंजी चोर! दुसऱ्यांनी चोरी केली तरी पोलीस पारध्यांनाच पकडनार! कोनीबी ईश्वास नाय ठेवत आमच्यावर! मंग आत्या म्हनली, ‘गजरे करून इक. जमल तुला.’ मला गजरा करता नाय यायचा. पन दुसऱ्यांजवळ बसून गजरा करायला शिकले, चार दिवसांत! दादरवरून फुलं, दोरा भेटायचा. तो आणून गजरे करायला लागले. तिथंच स्टेशनवर हा न्हवरा भेटला. त्यो चर्चगेट-विरार गाडीत झाडू मारायचा आन् भीक मागायचा. त्याला म्हनलं, भीक मागणं लय बेकार! आपण काय तरी धंदापाणी करू. मंग तो बँकेच्या एटीयम मशीनवर सिक्युरिटी गार्ड बनला. पगार चांगला मिळतो पण समदा पगार दारू आन् गांजावर उडवतो. पन बाईचं कसं असतंया, एकदा जीव लावला का काय बी दिसत न्हाय. मी त्याच्यावर जीव लावला आन् सासू घाबारली. ती मुसलमान. मी पारधी. ती म्हनायची, ‘पारधी लोक लय डेंजर. खून, मारामारीत कोनाला ऐकत नाय. तुज्या घरवाल्यांनी माज्या मुलाला मारलं तर! ‘मी म्हनलं, ‘तू माझ्यावर सोड!’ आम्ही लगीन केलं. चार पोरं झाली. पारध्यांचं जिणं रस्त्यावर. पारधी पोरान्ला शाळत पाठवत नाय. भीक मागाया पाठवतात. मी बी तेच केलं. भीक मागताना पोलिसांनी माझी तीन थोरली पोरं उचालली. ‘डोंगरी’ला टाकली. मी त्यान्ला सोडवायला गेले तर पोलीस म्हनाया लागले, ‘हा पोरगा तुमचा हाय त्याच पुरुफ आना.’ घरी झालेला पोर. त्याचा जन्मदाखला कुठून आणायचा?
रस्त्याकडला बसून निसता इचार करत व्हते. तेवडय़ात नवरा येताना दिसला. त्याने मजजवळ पुडकं दिलं. त्यात दोन वडापाव व्हते. सगळं सामान गोळा केलं. पयल्या जागी आलो. दोघांनी मिळून वडापाव खाल्ला आन् पायरीवर आंग टाकलं.
आज पोरांची लय सय येतय. ग्रॅण्ट रोडचे आमचे लोक म्हनले, ‘पोरांना पुण्याला भरती कर.’ त्यांना घेऊन काकांच्या (गिरीश प्रभुणे) आश्रमात ठिवलं. काका म्हनले, ‘सुनीता, पारधी लोकांची जिंदगी चोरीमारी मोलमजुरीत जाते. तसं पोरांचं करू नगं. शिकीव त्यांना!’ मला बी पोरांना शिकवायचंय. थोरल्याला पायलट करायचं हाय! पन शिक्शान घेऊन त्याचा उपेग व्हायला हवा. जानुबायच्या सुरेशनं दहावी पास केली. उपेग काय? पारध्याच्या पोराला नोकरी कोण देनार? नोकरीसाठी दोन लाख, तीन लाख मागतात. त्ये आनायचं कुठून? मंग शिक्षण घिऊन फायदा काय? एक झोपडं घ्यायला दोन लाख लागतात. आपलं हातावर पोट. झोपडं पण नाय घेऊ शकत. शेवटाला पारध्याच्या पोरानं मोलमजुरी करायची. आन् रस्त्यावर ऱ्हायचं! मंग शिकायचं कशाला?
रात लय झाली.. डोळा लागला व्हता. झोपेत तान्ह्य़ा लेकराला पाजताना छाती उघडी पडली व्हती. जाग आली तवा येक मानूस जवळ हुबा ऱ्हाऊन येकटक बगत हुता. पदर सारखा केला नि झोपून गेले. पुन्ना जाग आली. कोन तरी अंगाशी चाळा करत व्हतं. शेजारी न्हवरा न्हवता. कोन तरी भलताच मानूस.. ढकलून दिलं! त्यो पळाला पन् माझ्या नशिबी जागनं आलं..
कधी सरायचं पारध्याच्या नशिबाचं हे रस्त्यावरचं लाचार जिणं? कधी सरायचं?
माधुरी ताम्हणे -madhuri.m.tamhane@gmail.com