Untitled-22

‘लोकसत्ता’च्या ‘पर्यावरणाच्या ‘बैला’ला..’ या अग्रलेखावर व्यक्त होताना पर्यावरण या विषयाचा व्यापक आढावा घेणारे पुण्याचे सूरज यादव आणि प्रियांका चव्हाण यंदाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’च्या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.
पहिले सात हजार रुपयांचे बक्षीस मिळविणारा सूरज पुण्याच्या बालेवाडी येथील ‘गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी आहे. तर प्रियांका पुण्याच्याच ‘अबेदा इनामदार वरिष्ठ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया’ची विद्यार्थिनी आहे. तिने दुसऱ्या क्रमांकाचे पाच हजारांचे पारितोषिक पटकावले. बक्षीसाच्या रकमेबरोबरच या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तामिळनाडूमधील ‘जल्लीकट्टू’ या बैलांच्या खेळावरील बंदीच्या निमित्ताने एकूणच पर्यावरणाबाबत केंद्र सरकार घेत असलेल्या भूमिकेची अत्यंत कठोर, तिरकस आणि मुद्देसूद मांडणीतून निर्भत्सना करणाऱ्या या अग्रलेखावर विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडायची होती. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत तीन आठवडय़ांचे विजेते घोषित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षीसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला मिळाले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरूणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते.
लक्षात ठेवावे असे..
* या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.