लोकसत्ता ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या ‘अम्मा गेल्या, अम्मा चालल्या’ या अग्रलेखावर डोंबिवलीतील ‘शिवाजीराव एस. जोंधळे’ या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा दासरवार पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली. तर पुण्यातील ‘सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’ची विद्यार्थिनी श्रुतिका भोसले हिने दुसरे पारितोषिक पटकावले.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची स्पर्धा शिगेला पोहोचली असताना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या शशिकला यांना सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरविले. त्यानंतर पनीरसेल्वम किंवा ‘भाजप’ यांची डोकेदुखी संपेल असे वाटत असले तरी अण्णाद्रमुकची सूत्रे शशिकला यांच्याच हातात असल्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय संस्कृतीत मूलभूत बदल होणार नाही, या मुद्दय़ावर प्रकाशझोत टाकणारा ‘अम्मा गेल्या, अम्मा चालल्या’ हा अग्रलेख ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत या वेळी देण्यात आला होता.

पहिल्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र, तर दुसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करत उत्तम लेखन केले.

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवाशक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात.  विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना यानिमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers   या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची असते.