रोजगारनिर्मितीसाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याच्या वास्तवाला केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी नुकतीच एका कार्यक्रमावेळी मान्यता दिली. यामुळे आपल्या पुढील आर्थिक आव्हानाचे गांभीर्य कळत असून सरकारने केलेले दावे आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यांत भीषण तफावतही लक्षात येते. रूडी यांचे हे वक्तव्य आणि आपल्या इथली शिक्षणव्यवस्था यांच्यावर आज प्रसिद्ध झालेल्या रोजगारशून्यतेचे ‘राजीव’ दर्शन या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

अभियांत्रिकीच्या रिकाम्या जागांबाबत कबुली देऊन केंद्रीय मंत्र्यांनी एक प्रकारे या वास्तवालाच मान्यता दिली आहे. तशी ती देताना स्वत:च्या सरकारकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची असत्यताही त्यांनी मांडली. केंद्र सरकारच्या मजूर खात्याने प्रसृत केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या बेरोजगारीचे पाच टक्के हे प्रमाण गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. या बेरोजगारांना काम द्यावयाचे तर महिन्याला १० लाख इतक्या प्रचंड गतीने रोजगारनिर्मिती व्हावी लागेल. वास्तवात त्याच्या एकदशांशदेखील आपली रोजगारनिर्मिती नाही. त्यामुळे या रोजगारशून्यतेचे हे ‘राजीव’ दर्शन भीतीदायक ठरते, असे मत मांडणाऱ्या या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना आपले मत मांडायचे आहे.

अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे व्हावे यासाठी ‘लोकसत्ता’ने लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे व अवसरी येथील शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिलीप पानगव्हाणे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होईल.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.