लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कर चवताळून अंगावर येणार हे सांगण्यासाठी कोणा थिकटँकची आवश्यकता नव्हती. आधुनिक तंत्रज्ञानामार्फत सीमेवर जागता पहारा ठेवणे ही सुरक्षेसाठीची मूलभूत उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. बुलेटप्रूफ जाकिटे, अग्निरोधक तंबू यांची गरज ओळखण्याऐवजी आपण शत्रुराष्ट्र कोमात गेल्याची भाषा करीत आहोत. आणि त्यातच नगरोटा लष्करी तळावर हल्ला झाल्याने यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी काय उपाय योजावे लागतील यावर ‘जागते रहो’ अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

सीमेनजीकच्या तळावरील तंबू किमान अग्निरोधक कापडाचे असावेत याची काळजीही आपण घेऊ शकलेलो नाही. तेव्हा राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होऊन सरकारला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि आधीच्या सरकारांची नालायकी पुढे काढून आपल्यावरील जबाबदारीही झटकता येणार नाही. असे स्पष्ट प्रतिपादन या अग्रलेखात करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक उत्तरा सहस्रबुद्धे आणि कर्नल (निवृत्त) आनंद देशपांडे यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर वाचता येतील. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे.

लक्षात ठेवावे असे..

स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.  या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. येथे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.