ब्लॉगबेंचर्सविजेत्यांची प्रतिक्रिया

‘लोकसत्ता’तील अग्रलेखावर एखादे मत पूर्ण अभ्यासांतीच व्यक्त करावे लागते. त्याच्यासाठी संदर्भ पुस्तक वाचावे लागले. एकदाच नाही तर अनेक वेळा ब्लॉगबेंचर्ससाठी लिखाण केले. त्यातून वाचनासह लिहिण्यालाही ‘लोकसत्ताच्या ब्लॉगबेंचर्स’ने आम्हाला प्रोत्साहित केले, अशी प्रतिक्रिया विजेते ठरलेले जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंगचे विद्यार्थी विराज भोसले व मुकुल निकाळजे यांनी व्यक्त केले.

येथील एमजीएमच्या इंजिनीअरिंगच्या वर्गात बक्षिसांची रक्कम व प्रमाणपत्र देऊन प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते व विभागप्रमुख डॉ. कदम यांच्या उपस्थितीत विराज भोसले व मुकुल निकाळजे यांना मंगळवारी सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’तील अग्रलेख वाचल्यामुळे विचार करण्याची दृष्टी, अभ्यासपूर्ण लिखाण, संदर्भ ग्रंथाचे वाचन, चर्चा, याविषयी ओढ लागल्याचे सांगितले. मुकुल निकाळजे याने ‘लेकुरे उदंड जाहली’ या अग्रलेखावर मत व्यक्त करण्यासाठी लिखाणातही काही पथ्ये पाळून आपले योग्य ते मत राष्ट्राच्या जडणघडणीत काय घडवू शकते हे मांडल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल आल्यामुळे अभ्यासापेक्षा इतर प्रकारातच रमले जात असल्याचा प्रश्न उपस्थित झाल्याचा संदर्भ हेरून मुकुल याने सामाजिक अभिसरणासाठी समाजमाध्यमांचा वापर केला पाहिजे. लोकसत्तातील अग्रलेखावर लिहिण्यासाठी याच समाजमाध्यमाचा मला उपयोग झाल्याचे सांगितले. समाजमाध्यमांचा योग्य तेथे वापर केला, तर ते निश्चित उपयोगी पडतात, असेही मुकुल म्हणाला. विजयाच्या निर्धारानेच वाचन, लिखाणावर लक्ष केंद्रित केले होते. अनेक प्रयत्नांनंतर विजेता ठरलो. ‘लोकसत्ता’ने वाचनाची नवी दृष्टी देऊन लिहिण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे विराज भोसले म्हणाला. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी या दोघांकडून प्रेरणा घेऊन इतर मुलांनीही लिखाण, वाचनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते व विभागप्रमुख डॉ. कदम यांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’ विजेते विराज भोसले व मुकुल निकाळजे यांना सन्मानित करण्यात आले.