धवल कुलकर्णी

काही काळापूर्वी एका चित्रपटाची टॅग लाईन समाज माध्यमावर खूप गाजली होती. “ती सध्या काय करते?” सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये एक प्रश्न काही काहीशा दबक्या आवाजात विचारला जात आहे. तो प्रश्न म्हणजे, “ते सध्या काय करत आहेत?” इथे “ते” म्हणजे अर्थातच भाजपाचं केंद्रीय नेतृत्व. एरव्ही एखाद्या राज्यात उदाहरणार्थ गोवा, मणिपूर आणि अलिकडे हरियाणामध्ये सत्तास्थापन करण्यासाठी इतर राजकीय पक्षांवर हा-हा म्हणता मात करणाऱ्या भाजपा नेतृत्वाने नेमके महाराष्ट्रातच आखडता हात का घेतला असावा? यावर खुद्द पक्षातच बरेच तर्क लढवले जात आहेत.

केंद्रीय नेतृत्वाला कुठेतरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “धडा शिकवायचा” असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरीसुद्धा, फडणवीसांना बदलून नवा मुख्यमंत्री बसवायचा असेल, तर ते पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वासाठी अगदी लीलया करता येणार काम आहे. त्या नादात पक्ष महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील सत्ता का गमावतोय? असा विचार करून पक्षात उभी हयात गेलेले अनेक भाजपा नेते खजील होत आहेत.

भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, कदाचित पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या या शांततेच्या गर्भात भविष्यातील रणनीती दडलेली असावी. शिवसेनेने भाजपासोबतची तीन दशकं जुनी युती तोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केल्यास हे या तिन्ही पक्षांच्या पाठीराख्यांना मान्य असणार नाही आणि हे सरकार अर्ध्यावरच कोसळेल असे त्या नेत्याला वाटते.

“शेवटी आपण हे लक्षात घ्यायला हवं की लोकांना त्या अर्थाने राजकारण कळत नाही. लोक शेवटी भावनेवर चालतात. आजही अनेकांना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य युतीबाबत तितकासा आनंद झालेला नाही,” असे या माजी मंत्र्यांनी सांगितले. “अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट आहेत. एका गटाला पक्षाने शिवसेनेसोबत जावे असे वाटते, तर दुसरा भाजपाबरोबरच सत्तास्थापनेचा दावा करावा या मताचा आहे. अर्थात या दुसऱ्या गटातील नेत्यांना खरी भीती आहे ती अंमलबजावणी संचनालयासारख्या सरकारी संस्थांच्या संभाव्य कारवाईची. पण समजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत हातमिळवणी केली तर ती युती त्यांच्या शिवसेनेसोबतच्या युतीपेक्षा अधिक सहज असेल. याचे कारण अगदी सोपे आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रभावक्षेत्र वेगवेगळी आहेत. भाजपाच्या शक्तीचे मर्मस्थान हे विदर्भ आहे तर तिथे राष्ट्रवादी अगदी ना के बराबर… भाजपा आणि राष्ट्रवादीच्या पत्रिकांमध्ये ३६ पैकी ३५ गुण नेमके इथे जुळून येतात,” असे या भाजप नेत्याचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीला मूळ काँग्रेस पक्ष संपवायचा आहे व भाजपला शिवसेनेच्या मुळावर घाव घालायची इच्छा आहे. अर्थात, एखादा पक्ष किंवा विचार असा लीलया संपवता येत नसला तरीसुद्धा, अशा कारवाया केल्याशिवाय राष्ट्रवादी व भाजपला महाराष्ट्रात एका प्रमाणापलिकडे वाढता येणार नाही.

या ज्येष्ठ भाजप नेत्यांनी असे सांगितले की, महाराष्ट्रामध्ये भाजपची नीती ही दुहेरी असू शकते. समजा, शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले तरीसुद्धा ते फार काळ चालेल अशी अपेक्षा बाळगणं फोलपणाचं आहे. अंतर्गत दबाव व कुरघोड्यांच्या राजकारणामुळे, कदाचित या कोडबोळ सरकारची अवस्था १९७८ ते ८० च्या दरम्यानच्या जनता पक्षासारखे होऊ शकते. तसे झाल्यास भाजपा ही या पक्षांमधील फुटीर आमदारांच्या भरोशावर सत्तेत येऊ शकते. कारण, नव्याने निवडणुकांचा सामना करण्याची क्षमता इच्छा कुठल्याही आमदारांमध्ये नाही. अर्थात, हे सरकार टिकलं तर भाजपला पूर्ण विरोधी जागा व्यापता येईल.

दुसरं, भाजपाला समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जायचं असेल तर त्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे अत्यंत गरजेच आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळ जवळ एक महिना झाला तरी सुद्धा राज्यात कुणाचेही सरकार अस्तित्वात आलेला नाही. महाराष्ट्रात आतापर्यंतच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. एकूणच अनिश्चिततेच्या वातावरणात नोकरशाहीचे काम जवळजवळ ठप्प होऊन कुठलेही मोठे निर्णय घेतले जात नाहीयेत. त्याचा परिणाम हा अर्थातच अर्थव्यवस्थेवर व सर्वसामान्य लोकांवर होणारच. अशा परिस्थितीत एक असं वातावरण निर्माण होऊ शकतं की स्थिर सरकारसाठी भाजप व राष्ट्रवादीने एकत्र यावं. अशावेळी या सर्व अनिश्‍चिततेमुळे दीर्घकाळ चाललेल्या नाट्याचा खापर अत्यंत सोयीने भाजपला शिवसेनेवर फोडता येईल.