24 October 2020

News Flash

राणीही कंटाळली टाळेबंदीला

राणी आली 'बबल'मधून बाहेर

– सुनिता कुलकर्णी
राजाला रोजच दिवाळी असते तसंच इंग्लंडच्या राणी एलिझाबेथला खरंतर रोजच टाळेबंदी असते. ती आयुष्यभर सोशल डिस्टन्सिंग पाळत आली आहे. राजेशाही जगण्याचा भाग म्हणून तिला कायमच मोजक्या गोष्टींसाठीच घराबाहेर अर्थात बकिंगहॅम पॅलेसबाहेर पडता येतं. आपण गेले सहा महिने अनुभवतो आहेत ते तिने आयुष्यभर अनुभवलं आहे. म्हणूनच इंग्लंडची राणी सहा महिन्यांनी घराबाहेर पडते तेव्हा त्याची बातमी होते.

२१ मार्च २०२० ला विंडसर पॅलेस इथं विलगीकरणात गेलेली ९४ वर्षे वयाची इंग्लडची राणी एलिझाबेथ तब्बल सात महिन्यांनी बाहेर पडली. लंडनमधलं बकिंगहॅम पॅलेस हे राणीचं अधिकृत निवासस्थान. तिथून तिचं सगळं कामकाज चालतं. तर लंडनबाहेर असलेलं विंडसर पॅलेस हे एरवी सुट्टीवर जाण्याचं ठिकाण. पण करोना महासाथीमुळे राणीनं मार्च महिन्यातच ९८ वर्षांचा पती, ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिपसह बकिंगहॅम पॅलेस सोडून विंडसर पॅलेसला प्रस्थान ठेवलं होतं. तिथूनच ती या सात महिन्यांच्या काळात टेलिफोनवरून, व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून तिच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिने आणि प्रिन्स फिलिपने सहा महिने विंडसर पॅलेसला घालवले होते. त्यानंतर सहा आठवडे त्यांनी स्कॉटलंडला बाल्मोराल इथं उन्हाळ्याची सुट्टी घालवली होती.

नुकतीच म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी तिने पती प्रिन्स फिलिप आणि नातू प्रिन्स विल्यम्सबरोबर सॅलिसबरीजवळ असलेल्या ‘डिफेन्स सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी’ला भेट दिली. टाळेबंदी सुरू झाल्यानंतरची तिची ही पहिली सार्वजनिक भे होतीच शिवाय २०१७ नंतर पहिल्यांदाच ती आणि प्रिन्स विल्यम्स एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकत्र दिसले. विशेष म्हणजे राणी आणि प्रिन्स विल्यम्स, दोघांनीही मास्क घातलेले नव्हते. पण त्यांना भेटणारी, त्यांच्या आसपास वावरणारी सगळी माणसं करोना निगेटिव्ह आहेत याची खात्री करून घेतली होती असं डीएसटीएलने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या तिघांनी तिथे विविध शस्त्रांची पाहणी केली. प्रात्यक्षिकं बघितली. तज्ज्ञांना भेटून चर्चा केली. आणि मग राणी विंडसर पॅलेसला परतली.

टाळेबंदी सुरू झाली तेव्हा राणीच्या कामकाजाचा प्रमुख टोनी जॉनस्टॉन बर्टने राणीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी हुकुमनामा काढला होता की करोना संपेपर्यंत या शाही दाम्पत्याचं संरक्षण करण्याच्या मिशनला ‘एचएमएस बबल’ असं म्हटलं जाईल. या काळात वयाच्या तुलनेत राणी सतत कार्यरत असलेली दिसते. करोनाच्या महासाथीच्या सुरुवातीलाच तिने टीव्हीवरून देशाला उद्देशून भाषण केलं होतं. ही खरंतर एरवी सहसा न घडणारी दुर्मिळ गोष्ट होती. ‘आपण सगळे या महासाथीवर मात करू आणि लौकरच पुन्हा भेटू’ असं तिने देशवासियांना सांगितलं. दुसऱ्या महायुद्धातील विजयानंतर युरोपात दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्हिक्टरी युरोप डे (व्ही इ डे) या दिवसाच्या ७५ वर्षाच्या निमित्ताने तिने टाळेबंदीत असलेल्या ब्रिटनवासीयांना सांगितलं की दुसऱ्या महायुद्धातील हिरोदेखील देशवासीयांच्या महासाथीच्या काळातील धैर्याचं कौतुक करतील.

राणीने तिच्या वाढदिवशी सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत ‘ट्रूपिंग ऑफ कलर’ या मानवंदना सोहळ्याला उपस्थिती लावली. खरंतर तिचा वाढदिवस असतो २१ एप्रिल रोजी. पण राणी आपला वाढदिवस नेहमी जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा करते. भर कडाक्याच्या हिवाळ्यात वाढदिवस साजरा केला तर सामान्य जनतेला त्या शाही सोहळ्याला उपस्थित राहता येत नाही. म्हणून राजा दुसरा जॉर्ज याने हिवाळ्यातला वाढदिवस उन्हाळ्यात साजरा करण्याची १८ व्या शतकात पद्धत सुरू केली होती. राणीही तीच पद्धत अवलंबते. या सोहळ्यात १४०० सैनिक, २०० घोडे आणि ४०० संगीतकार प्रात्यक्षिकं सादर करतात. हे सैनिक म्हणजे राणीचे सुरक्षारक्षक असतात. तिकीट असलेला हा सोहळा बघण्यासाठी जगभरातून लोक येतात. या वर्षी हा सोहळा विंडसर पॅलेस इथं आणि अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. सोशल डिस्टंन्सिंगमुळे सर्वसामान्यांना त्याला उपस्थित राहता आलं नाही.

आणखी सहा वर्षांनी राणी एलिझाबेथ तिच्या आयुष्याचं शतक पूर्ण करेल. ब्रिटिश साम्राज्यावरचा ढळलेला सूर्य, दोन्ही महायुद्ध, शीतयुद्ध यासह अनेक घटना तिने आपल्या आयुष्यात पाहिल्या आहेत. करोनाच्या संकटावरही आपण लौकर मात करू हा तिचा आशावाद तिच्या विजिगिषु वृत्तीची साक्ष देणारा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 10:57 am

Web Title: corona virus lockdown queen elizabeth social distance nck 90
Next Stories
1 BLOG: क्रिकेटपटूवरचा राग अभिनेत्यावर…
2 BLOG : सार्वजनिक ठिकाणी सामूहिक हस्त प्रक्षालन, संकल्पना आणि तंत्र
3 BLOG : महत्व हात धुण्याचे आणि आरोग्य राखण्याचे !
Just Now!
X