– मकरंद करंदीकर

मुंबई नगरी म्हणजे एक अजब नागरी आहे. इथे काय तयार होईल, काय विकले जाईल, कुणाला अमाप पैसा मिळेल, कुणाला प्रतिष्ठा मिळेल, कुणाला अफाट प्रसिद्धी मिळेल अशा गोष्टींचे कांही नियम नाहीत. मला आणि माझ्या काही मित्रांना, घरे अगदी छोटी असल्याने शाळा – कॉलेजच्या वाचनालयात जाऊन रात्री उशिरापर्यंत अभ्यास करावा लागे. कॉलेजचे दिवस, नुकतीच फुटलेली अक्कल, विविध उपक्रमांमध्ये घेलेला सहभाग यामुळे अनेक गोष्टी ” पाहूया तरी ” अशी सवय लागली. सुदैवाने कुठलेही व्यसन लागले नाही पण विविध प्रकारची नाटके पाहणे, पुस्तके वाचणे, खाणे, चर्चा – व्याख्याने ऐकणे याचे जबरदस्त व्यसन लागले. यासाठी त्यावेळी खिशात आवश्यक असलेला ‘अल्प निधी ‘ आईकडून गुप्तपणे पुरविला जाई आणि त्याचा हिशेबही मागितला जाई. अनेकविध उपक्रम रात्री उशिरा संपल्यावर, उदरभरणासाठी बाहेर गाडीवर – स्टॉलवर ( खरे तर अगदी आनंदाने ) खावे लागे.

पूर्वी स्टॉलवर रात्री चहा, पाव, बिस्किटे, अंडी, थंड भजी इ. मोजकेच पर्याय असत. १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाल्यावर कै. बाळासाहेब ठाकरे यांनी, कसलेही भांडवल नसलेल्या गरीब मराठी मुलांना बटाटेवडे विकण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. दादर, गिरगाव, लालबाग, परळ अशा ठिकाणी हे स्टॉल शिसेनेच्या शाखेच्या आजूबाजूला लागत असत आणि थेथे ” शिवसेना पुरस्कृत बटाटावडा ” असे फलकही लागत. थोडयाच दिवसात एका पावामध्ये मिरचीचे थोडे लोणचे, गोडसर चटणी, लसणीची चटणी आणि गरम वडा असा ‘ वडापाव ‘ अवतरला. दोन वडापाव खाल्ले की पोट भरू लागले. ( आता हाच वडापाव इतका जगप्रसिद्ध झाला आहे की त्यावर भारतीय टपाल खात्याने नुकतेच एक टपाल तिकीटही प्रसिद्ध केले आहे.) मग कुठे कांदा बटाटा भजी, सामोसे दिसू लागले. मग या स्टॉल्सवर मिसळ आली. अशा विविध खाद्यस्थळाला प्रत्येक आठवड्यात आमची एकदा तरी भेट होई. हे सर्व खात होतो खरे पण त्यामुळे रात्री उशिरा पोटभर खाणे मिळत नव्हते. उडुपी लंच होम्स देखील तशी लवकर बंद होत असत.

दादर स्टेशनच्या बाहेरच्या एका स्टॉलवर आम्ही नियमितपणे खात असू. १९६८ च्या पावसाळ्यानंतर एका रात्री मस्त गारवा असताना या स्टॉलवाल्याने आम्हाला खास बोलावून नवीन पदार्थ देवू केला. एका छोट्याशा तव्यावर अगदी थोड्या तेलावर परतलेली गरम भाजी व एक पाव ! या भाजीत बटाटे, टोमॅटो, कांदा, फ्लॉवर, ढोबळी मिरची ( तेव्हा ती सिमला मिरची झालेली नव्हती ) आणि तिखट मसाला घातला होता. त्याची कोळशाची लोखंडी शेगडी ही सगळीकडून बंद आणि पुढे झाकण व छोटे दार असलेली अशी होती. अर्धा उघडलेला पाव त्याने या तापलेल्या शेगडीवर ( तव्यावर नव्हे ) मिनिटभर दाबून गरम करून दिला. थंड हवा, पोटात तापलेली भूक, गरमागरम भाजी आणि पावसुद्धा …. मजा आली ! मग याची चटकच लागली. हा माणूस मराठी होता त्याने अनेक हॉटेलमध्ये, कॅंटीनमध्ये काम केले होते. तो या भाजीच्या कृतीत मग वेगवेगळे प्रयोग करू लागला. त्यात मटार, कोबी, गाजराचे तुकडे, वरून बारीक चिरलेला कांदा, हिरव्या लसणीची पात असे काही घालत असे. नंतर गरम पावाला थोडे लोणी लावून देत असे तर तेलात केलेल्या भाजीवर थोडे लोणी टाकून देत असे.

एकदा तर गंमत झाली. एक सरदारजी अस्खलित शुद्ध मराठीत या स्टॉलवाल्याशी काहीतरी कुजबुजत होता. बारकाईने पाहिल्यावर लक्षात आले की ते शिवसेना नेते प्रमोद नवलकर होते. ते वेषांतर करून रात्री भटकंती करीत असत. त्यावर आधारलेले विविध विषयांवरील खळबळजनक वृत्तांत ते रविवारच्या नवशक्तीत,” भटक्याची भ्रमंती ” मध्ये लिहीत असत. धाडस अगदी जीवावर बेतते असे वाटले तर ठिकठिकाणी त्यांनी या स्टॉलवाल्यासारखे काही आधार तयार ठेवले होते.

तेव्हा साधारणतः ८ / १० दिवसात आमची काळबादेवी, गिरगाव, लालबाग येथेही आमची खाद्ययात्रा घडत असे. पुढे काही महिन्यातच हा पदार्थ तेथेही पोचला. भाजीची मागणी वाढू लागल्यावर तव्याचा आकार आणि जाडी वाढू लागली. लोखंडी शेगडीवर भाजला जाणारा पाव चक्क तव्यावर आला. भाजी बशीत ( प्लेट नव्हे ) काढली की पावाने तवा पुसून तो लोणी लावून दिला जाऊ लागला. हळूहळू त्याला प्रादेशिक स्वाद येऊ लागला. या भाजीला काळबादेवीला गुजराती मसाल्याची, शिव म्हणजे सायन येथे सांबाराची, लालबाग परिसरात घाटी ( कांदा मसाला) किंवा मालवणी मसाल्याची, अंधेरीला देसाईंच्या गोमंतक भाजीला गोव्याच्या मसाल्याची चव लागत असे. इकडचे गिऱ्हाईक तिकडे जाऊ नये म्हणून मग हळूहळू मसाल्यातही एकजिनसीपणा आला. या भाजीमध्ये वापरायच्या भाज्याही नक्की झाल्या. मग जैन, मश्रुम, खडा, चीझ, डाएट असे पावभाजीचे अनेक अवतार अवतरले. सुरुवातीला ( जसे वडापाव तसे ) याला भाजीपाव म्हटले जात असे. मग केव्हांतरी याची पावभाजी झाली. अनेक वर्षे रस्त्यावर काढल्यावर मग या पावभाजीला उडुपी , प्रतिष्ठित ग्रेडवाल्या ते अगदी स्टार हॉटेलातही प्रवेश मिळाला. मोठ्या पार्ट्यांचा तो एक महत्वाचा मेनू ठरला. मुंबईबाहेर आणि अगदी विदेशातही “बॉम्बे पावभाजी “, बंबईकी स्पेशल पावभाजी, मुंबईनी पाऊं भाजी असे बोर्ड झळकू लागले. एका गरीब मुलीला जणू श्रीमंतांमध्ये प्रतिष्ठा लाभली !

मुंबईतील गरीब कामगारांसाठी कित्येक वर्षांपासून पावभाजी बनवली जात असे असा उल्लेख काही ठिकाणी आहे. पण ती भाजी म्हणजे साधी पातळ भाजी होती. अशा तऱ्हेने विशिष्ट भाज्या वापरून लोण्यावर परतलेली भाजी आणि लोण्यावर परतलेला पाव नक्कीच नाही.
२०१८ या वर्षी या मुंबईच्या पावभाजीला चक्क ५० वर्षे पूर्ण झाली. आता थंडीला सुरुवात होईल. या सुवर्णमहोत्सवी वर्षात या तितक्याच ताज्या पदार्थाचा आस्वाद नव्या चवींनी घेऊया ! या निमित्ताने विविध चवींच्या पावभाज्यांचा एक अनोखा “पावभाजी महोत्सव” भरवायला काय हरकत आहे ?

पावभाजीच्या गमाहद्दल अनेक प्रवाद आहेत. सरदार पावभाजी, सायनची पाबवभाजी, हाजी अलीची पावभाजी इत्यादी. पण याबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अनेकदा भाजी या मराठी शब्दाचा अर्थ पावभाजीची भाजी असा जोडला जातो. तथापि प्रत्यक्षात ही उसळ किंवा पातळ भाजी असायची. याबरोबर पोळीऐवजी पाव खाल्ला आणि वर पाणी प्यायले की गरीब माणसाचे पोट लवकर व स्वस्तात भरत असे.

इतक्या भरमार बटरची भाजी नक्कीच नव्हती आणि ही बटरवाली १९६८ मध्ये आली. नावाच्या साधर्म्यामुळे या भाजीचा गोंधळ झाला आहे. आता मात्र “बटर आणि मस्कायुक्त” पावभाजी हा स्टेटस झाला आहे. मुंबई बाहेरच्या हॉटेलात “बाँबे पावभाजी” असणे हे प्रतिष्ठेचे झाले आहे. “कालाय तस्मै नम:”… चला एका गरीब मुलीला श्रीमंत घर मिळाले खरे!