05 March 2021

News Flash

BLOG : एनर्जेटिक अमृता खानविलकर……

तिचा एनर्जेटिक फोर्स तिचे चैतन्यमय व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठेवतेय

दिलीप ठाकूर

काही काही स्टार्सना कंटाळा म्हणजे काय हे माहितच नसते असे एकूणच त्यांच्या वाटचालीकडे पाहून वाटते. निदान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बोअरपण दिसत नाही. बरं हे चैतन्य फक्त पडद्यावरचे नसते( तेथे ते थीमनुसार आणि व्यक्तिरेखेनुसार असते आणि ते स्वाभाविक आहे) तर त्यांचे परंपरा आणि नाविन्य यांचा समतोल असलेले फोटो सेशन ( कधी त्यात धीटपणाही) आपल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीच्या मुलाखती, इव्हेन्टसमधील कधी उत्फूर्त परफॉर्म्स तर कधी नवीन फॅशनच्या ड्रेसमध्ये चैतन्यमय उपस्थिती, फिल्मी पार्टीमधील सहज वावर यात सगळीकडे ते असते. आणि जोडीला स्टाईलिश स्टार अशी इमेज.

अमृता खानविलकर अगदी तशीच एनर्जेटिक आहे. तिच्या करिअरला किती वर्षे झाली, त्यात तिने किती मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यातले किती हिट झाले, कोणते पडद्यावर आल्या आल्या गेले, छोट्या पडद्यावरची तिची वाटचाल, म्हटलं तर बोल्ड बट ब्युटीफूल दृश्यांनी लक्षवेधक ठरलेली आणि रक्तपाती हिंदी वेबसीरिज ‘डॅमेज ‘ याच्या तपशीलातून तिच्या प्रगती पुस्तकात डोकावता येईल. पण त्या स्कोरकार्डपलिकडे जाऊन तिचं अस्तित्व, तिचं चैतन्य, तिचं ग्लॅमर आहे. ते पडद्यावर दिसते आणि तिच्या ग्लॅमरस फोटो सेशनच्या सातत्यही दिसतेय. असं सातत्य आणि ताजेपण सांभाळणे वाटते तितके सोपे नाही. सतत नवीन चेहरे येतात, त्याकडे चित्रपटसृष्टी, चाहते आणि मिडिया ( अगदी सोशल मिडिया, तो सध्या फार ताकदवान होतोय) यांचे लक्ष जातेच. त्यांनाही ताजेपण हवा असतो. अशा वेळी बसू शकणारा सेटबॅक जाणवू न देणे आणि ‘आजही मी स्टार आहे ‘ हे स्वतःला बजावत इतरांनाही त्याची कृतीतून जाणीव करुन देणे सोपे नाही. त्यासाठी स्वतःची वेगळी मानसिकता, दृष्टिकोन तयार करावा लागतो. स्वतःवर वेगळी मेहनत घ्यावी लागते. आपण ‘तारकांच्या गर्दीत आहोतच, पण आपले स्वतःचं असे काही आहे ‘ हेदेखील कळत नकळतपणे अधोरेखित करावे लागते. जावे स्टारच्या जीवा, तेव्हाच ही सगळी गुंतागुंत येते. मग कधी ‘नटरंग ‘मधील ‘वाजले की बारा….’ लावणीचा तडका करिअरला खणखणीत लिफ्ट देतो. राज्यात/देशात/विदेशात अनेक इव्हेन्टसमध्ये अमृताने ‘अप्सरा आली…’ या लावण्यांवर अगणित वेळा पूर्ण स्टेजचा वापर करीत भारी डान्स करुन अक्षरशः : प्रचंड टाळ्या मिळवल्यात. पण तिची ‘आयटम गर्ल ‘ अशी इमेज अजिबात झाली नाही. स्टेज नृत्यासाठी कमालीची एनर्जी लागतेच लागते, बरं पुण्यातील पब्लिक वेगळा आणि लंडनचा पूर्ण वेगळा. कुठे जोरदार शिट्टी येईल तर कुठे प्रत्यक्ष भेटूनच रसिक तारीफ करतील. ‘नटरंग ‘च्या फक्त एका गाण्यावर अमृता स्टार झाली, पण ‘कट्यार काळजात घुसली ‘तील तिची झरिना तिच्यातील अभिनय क्षमतेचा प्रत्यय देणारी ठरली. ते अमृतासारख्या सतत नवीन काहीतरी शिकण्याची आवड/वृत्ती असलेल्या अभिनेत्रीसाठी खूप महत्त्वाचे आहे. पण आपले करियर एकीकडे हिंदीतील रामगोपाल वर्मा ( भूत २), मेघना गुलजार (राझी) इत्यादी दिग्दर्शकांच्या चित्रपटात लहान तरी महत्त्वाची भूमिका साकारायची तर दुसरीकडे ‘साडेमाडे तीन ‘,’बाझी’ (यात तिने कमी मेकअप केल्याची चर्चा रंगली), ‘चोरीचा मामला ‘सारखे मनोरंजन मराठी चित्रपट अशी समतोल साधण्याची किमया तिला साधली. आज मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरला, मोकळ्या ढाकळ्या फोटो सेशनला सहजता आल्याचे आपण सोशल मिडियात पाहतोय.

मराठी अभिनेत्रींनी इतके बोल्ड असू नये असे परंपरावादी कॉमेन्टस् करतात तर आजचा युथ मात्र मराठी अथवा हिंदी असा भेदभाव करीत नाही. आजच्या ग्लोबल युगात तो कसलीही मर्यादा घालून न घेता अशा फोटोंना भरपूर लाईक्स देतोय. त्यात अमृता बरीच कन्फर्ट तर आहेच पण लीडवर आहे. तो याच व्यवसायाचा वेगळा फंडा आहे. मध्यंतरी ती विदेशात जाताच निळ्याभोर समुद्र आणि नमकीन वाळू यातील आपल्या अतिशय देखण्या फोटो सेशनचा तिने धडाका कायम ठेवला. आपली फिगर छान आहे आणि आपल्यात आत्मविश्वास खच्चून भरलाय, अशा ड्रेसमध्ये आपण आकर्षक कशा दिसतोय, कॅमेरामध्ये आपण कशा आहोत या सगळ्याचा सकारात्मक प्रत्यय ती त्या फोटोतून देत होती. म्हणून त्याना लाईक्स मिळाल्या. अशीच गोष्टी तिला टॉनिक ठरत असाव्यात. स्टार कायमच स्तुतीचा भुकेला असतो असे मागील पिढीतील एका अभिनेत्रीने मला एकदा सांगितले असता मी तिला म्हणालो, आजचे स्टार खरी स्तुती कोणती आणि कशाला हे नेमके ओळखतात. तो गुण अमृतामध्ये आहे, म्हणूनच ती सतत नवीन अनुभवांना सामोरी जाताना दिसते. ती ‘खतरो के खिलाडी ‘साठी प्रचंड साहसी खेळ करुनही कंटाळत नाही आणि ‘मलंग ‘च्या रिलीजचीही वाट पाहते. या क्षेत्रातून ती हे शिकतेय हे जाणवते आणि असे प्रॅक्टीकल शिक्षण कधीच संपत नाही, ते सतत पुढचा मार्ग दाखवते.

कदाचित अमृताला आठवत नसेल, साधारण चौदा पंधरा वर्षांपूर्वी सहारच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘बॉम्बे सालसा’ या हिंदी चित्रपटाच्या पार्टीत तिला आणि मंजिरी फडणीसला मी सर्वप्रथम भेटलो. तेव्हाच तिच्या कमालीच्या उत्साहीपणाचा प्रत्यय आला. तिच्या एकूणच पर्सनालिटीचा लूक पाहता ती हिंदी चित्रपटसृष्टीत चमकावी असेच वाटत होते. पण या क्षेत्रात कोणती संधी कसे वळण घेईल हे सांगता येत नाही. मराठीत स्टार होतानाही आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीत वाव आहे याचे भान तिने स्वतः सोडले नाही, इतरांनाही सोडू दिले नाही. हे सगळे नकळत घडते. पण तेच तर महत्त्वाचे आहे. अशातच एकदा एका स्टुडिओत रणवीर सिंग शुटिंग करतोय हे समजताच अमृता त्याला भेटते त्याची तर खूपच मोठी बातमी होते. उगाच कोणत्याही कलाकाराची प्रत्येक गोष्ट न्यूज होत नाही, पण अमृताची होते. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, फिल्म फेअरच्या ‘फिल्म स्टार अॅण्ड फॅशन’ या न्यूज स्टोरीत चमकलेली एकमेव मराठी स्टार म्हणजे अमृता खानविलकर! हळूहळू या सगळ्याची स्टारला चटक तरी लागते अथवा सवय सुखावते. अमृताच्या बाबतीत असे काहीच होत नाही. ती पुढे पाहते. आणि तेच कौतुकाचे आहे. तिच्या प्रत्येक नवीन भेटीत काही नवेपण जाणवते.
चित्रपटाच्या सेटपासून पार्टीपर्यंत आपल्या आईसोबत आवर्जुन येणारी अमृताच्या मराठी बोलण्यात पूर्वीसारखे इंग्रजी शब्द फारसे येत नाहीत. मुळातच ती पुण्याची आहे म्हटलं. आजही चेहरा स्कार्फने बांधून पुण्यात स्कूटरवरुन फिरतेही. असे मोकळ्या वातावरण फिरायलाच हवे.

आपला वाढदिवस ती अगदी वेगळ्या पध्दतीने साजरा करते. एकदा तिने एड्सग्रस्त मुलांच्या शाळेला भेट दिली. एकदा तिने आपल्या चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला. मुळात ती इमोशनल आहे. पण मनोरंजन क्षेत्रात स्टार म्हणून स्थिर राहताना शोमनशीप खूप महत्वाची ठरते. तेथे एस्क्युज नाही. मिडियाला जाणवणार नाही असेच अंतर ठेवून ती मिडियाच्या जवळ आहे ( हे ती नकळत शिकलीय) आणि आपल्या फॅन्सच्या अफाट रिस्पॉन्सचा स्वीकार करतानाच ती भारावून जात नाही. या सगळ्याचा ती स्वतंत्रपणे विचार नक्कीच करीत असणार, पण तिचा एनर्जेटिक फोर्स तिचे चैतन्यमय व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठेवतेय. तिची ऊर्जा स्वाभाविक आहे तशीच ती आजच्या ग्लोबल युगातील मोठीच गरज आहे. हिंदी तर झालेच पण मराठी चित्रपटसृष्टीत ‘नवीन चेहरे नवीन उर्जा ‘ मोठ्या प्रमाणात येतेय. त्यात अमृता आपल्या फिटनेस, लूक आणि न्यूज यातून आपल्या शैलीने छान रमलीय…..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 12:16 pm

Web Title: marathi actress amruta khanvilkar article by dilip thakur ssj 93
Next Stories
1 BLOG : अरुण सावंत – ड्यूक्स नोजचा शिलेदार
2 BLOG : ओशो नावाचा अवलिया!
3 BLOG : मंटो! समाजाला आरसा दाखवणारा लेखक
Just Now!
X