28 February 2021

News Flash

नोबिताच्या लग्नाची धामधूम!

डोरेमॉनच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता

-जय पाटील

नोबिता, डोरेमॉन, शिझुका, जियान म्हणजे अनेकांचे बालपणीचे सोबती. त्यात थोडासा आळशी, सतत आईचा ओरडा खाणारा, एखादं गॅजेट मिळावं आणि आपली सगळी कामं चुटकीसरशी व्हावीत असं वाटणारा, जियानच्या दांडगाईने हैराण झालेला नोबिता म्हणजे तर अनेक लहान मुलांना स्वतङ्मचं प्रतिबिंब वाटत आला आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांचा हा बालमित्र विवाहबद्ध होणार असल्याचं वृत्त पसरताच समाजमाध्यमांवर धामधूम सुरू झाली आहे.

२०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टॅण्ड बाय मी डोरेमॉन’चा सीक्वेल असलेल्या ‘स्टॅण्ड बाय मी डोरेमॉन- २’ या चित्रपटाचं पोस्टर बुधवारी प्रदर्शित करण्यात आलं. डोरेमॉन मालिकेतील दोन अतिशय लोकप्रिय पात्र असलेले नोबिता आणि शिझुका या चित्रपटात विवाहबद्ध होणार असल्याचं या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. पोस्टरवरील चित्रात हे दोघेही सूट आणि वेडिंग गाऊन अशा खास वधू-वराच्या पोषाखात डोरेमॉनच्या डोक्यावर उभे असलेले दिसत आहेत. खरंतर हा चित्रपट जपानमध्ये नोव्हेंबर २०२०मध्येच प्रदर्शित झाला आहे. येत्या फेब्रुवारीत तो जगभर प्रदर्शित होणार आहे. त्याविषयी डोरेमॉनच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटाचं पोस्टर बुधवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं.

‘सकाळी सकाळी ही बातमी कळली, नोबी आणि शिजू तुम्ही दोघे खूप गोड जोडी आहात, मी तुमच्यासाठी आनंदी आहे’, ‘आता मी शांतपणे अखेरचा श्वास घ्यायला मोकळा’, ‘वाह, नोबिताने शिझुकाशी लग्न केलं. मी खूप खुष आहे. प्रेमाचा विजय होतोच’, ‘आनंदाची बातमी… शिझुका आणि नोबिताचं अखेर लग्न होणार आहे. फक्त यामुळे माझं वय वाढल्याची जाणीव झाली’, ‘या सुंदर जोडीचं मनापासून अभिनंदन. अखेर आमच्या या मित्राला त्याचं बालपणीचं प्रेम मिळालं’, ‘अभिनंदन डोरेमॉन, तुझ्या मेहनतीला फळ आलं’ अशा अभिनंदनाच्या पोस्ट्स, ट्वीटस्चा वर्षाव समाजमाध्यमांवर होत आहे.

‘नोबिता आता शिझुकाशी विवाहबद्ध होत असला, तरी आपण आपल्या बालपणाचा निरोप घेणार आहोत, असा त्याचा अर्थ होत नाही. तो तिच्याशी लग्न करणार हे आपल्याला आधीपासून माहीत होतंच. आपल्यात दडलेल्या लहान मुलाशी संवाद कसा साधायचा हे आपण जोपर्यंत विसरत नाही, तोपर्यंत आपलं बालपण आपल्याला सोडून जात नाही,’ असं ट्विटही एका ट्विटराइटने केलं आहे. समाजमाध्यमांवर नोबिता-शिझुकाच्या लग्नाची सुरू असलेली धामधूम पाहता, याचा शिल्लक असलेल्या बालपणाचाच प्रत्यय अनेकांना येत असावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 11:55 am

Web Title: nobita trends after he ties the knot in latest doraemon movie sas 89
Next Stories
1 ‘द टर्मिनल’ खरंच घडतो तेव्हा…
2 सोनू सूदचं टेलरिंग शॉप
3 माकडदाढी वाढतेय…
Just Now!
X