News Flash

BLOG: शब्दांवाटे व्यक्त होणारा आणि शब्दांवर भरभरुन प्रेम करणारा अवलिया… ‘गुलजार’

गुलजार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग काही आजवर आला नाही. पण, त्यांची भेट घेतलेल्या व्यक्तींना भेटले, यातही मी माझा आनंद शोधला.

गुलजार, GULZAR

सायली पाटील

‘…मोरा गोरा अंग लई ले, मोहे श्याम रंग दई दे’, असं अगदी सहजपणे म्हणणारी नूतन जेव्हा पडद्यावर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं निरागस सौंदर्य आपल्या काळजाचा ठोका चुकवून जातं. पण, त्यासोबतच या गाण्याच्या ओळीसुद्धा कुठेतरी आपल्या मनाचा ठाव घेऊन जातात. या ओळी नव्हे तर कोणा एका स्त्रीच्या मनातील भावनांचे मौल्यवान मोतीच जणू एका रेशमाच्या धाग्यात गुंफले आहेत, ज्यांना तितक्याच मखमली अशा आवाजाची जोड मिळाली आहे. अशा या गाण्याचे शब्द रचणारा अवलिया कोण, हा प्रश्न सध्याच्या घडीला आपल्या मनात घर करत नाही. कारण, आता ती माहिती आपल्याला अगदी सहजपणे मिळत आहे. पण, पहिल्या वेळी जेव्हा या गाण्याच्या गीताकाराविषयी माहिती मिळाली तेव्हा मात्र त्यांच्या मोठेपणाची आणि लेखणीत असणाऱ्या ताकदीची माहिती झाली.

संपूर्ण सिंग कालरा म्हणजेच कवी गुलजार यांच्या शब्दगसुमनांनी ‘बंदिनी’ या चित्रपटातलं हे गाणं साकारलं होतं. गुलजार… नावातच जणू सारंकाही सामावलं आहे.

कित्येक दशकं आपल्या शब्दांच्या बळावर चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या या कवीमनाच्या गुलजारांविषयी मी जाणलं ते म्हणजे त्यांच्या गीतांच्या आणि सोशल मीडियावर उपलब्ध असणाऱ्या व्हिडिओंच्या माध्यमातून. लफ्ज, जज्बात, दिल, जुबाँ या शब्दांवर तर जणू काही त्यांची मालकीच, असा सुरेख वापर ते त्यांच्या रचनांमध्ये करतात. परिस्थिती कोणतीही असो. त्याच्याशी निगडीत गुलजार यांचं एखादं वाक्य किंवा एखादी नज्म नाही, असं फार क्वचितच. ‘ज्यादा कुछ नही बदलता उम्र के साथ, बस बचपन की जिद्द समझौते मे बदल जाती है…’ असं म्हणत अगदी सहज साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये या व्यक्तीने अतिशय सखोल असा अर्थ असणारी परिस्थिती मांडण्याचं काम सुरु ठेवलं. ‘बंदिनी’पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास काल परवाच आपल्या भेटीला आलेल्या ‘इश्क दी बाजियाँ’ पर्यंत येऊन पोहोचला आणि पुढेही सुरुच राहील.

काळ बदलला, वेळही बदलली पण, गुलजार यांच्या लेखणीतून साकारणाऱ्या त्या ओळी मात्र अखंड आणि अविरत अशा आपल्या मनात कालवाकालव करतच राहिल्या. काळानुरुप एखाद्या व्यक्तीने किती आणि कसं बदलावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुलजार. प्रसंग कोणताही असो, अटितटीचा, आणिबाणीचा किंवा मग प्रतिष्ठेचा, गुलजार त्या प्रसंगावर नेमकं काय बोलणार याकडे जणू आपण एखाद्या चातकाप्रमाणे लक्ष देऊन असतो. आणि मग अखेर तो क्षण येतो… हलक्याश्या कातरत्या पण तितक्याच गंभीर आवाजात ज्यावेळी एक कणखर आवाज आपल्या कानावर पडतो तेव्हा याचसाठी केला होता अट्टहास… असेच भाव आपल्या मनात घर करुन जातात.

गुलजार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग काही आजवर आला नाही. पण, त्यांची भेट घेतलेल्या व्यक्तींना भेटले, यातही मी माझा आनंद शोधला. म्हणजे कोणा एका व्यक्तीचा गुलजार यांच्यासोबतचा फोटो पाहून तो व्यक्तीही माझ्यासाठी कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नाही. प्रत्येक गीत किंवा एखादी चारोळी लिहिण्यामागची त्यांची प्रेरणा असो, किंवा मग आपल्या मुलीचं नाव ठेवण्यामागचं एका वडिलांचं हळवं मन असो, त्यांच्या विचारांच्या परिसीमा नेमक्या कुठवर जातात याचा विचारही करणं अनेकदा जवळपास अशक्यच होतं. अर्थात तसं करण्याचा अट्टहासही मन धरत नाही. कारण, एखाद्याची उंची जाणूनच तिच्या टोकाशी जाण्याची जिद्द मनात असली तरीही त्या उंचीचा किंबहुना त्या व्यक्तीच्या आदरापोटी हे धाडस काही होत नाही. प्रेम, राग, मस्तर, द्वेष, इर्ष्या या सर्व भावना त्यांना मध्येच येणारी दु:खाची झालर आणि त्यावरुन क्वचितप्रसंगी होणारा आनंदाचा वर्षाव हे सर्व अगदी पटेल अशाच अंदाजात मांडण्याचं सामर्थ्य गुलजार यांच्यामध्ये आहे. प्रत्येक लेखकाच्या मनात त्यांच्याविषयी निस्सिम प्रेम आणि आदराची भावना आहे, ते म्हणजे आमचा प्रेरणास्त्रोत असं म्हणणाऱ्यांपैकी मीसुद्धा त्यातलीच एक आहे.

फोटो गॅलरी : Happy Birthday Gulzar : जिंदगी गुलजार है!

प्रेमाची चाहूल चागल्यापासून ते विरहाच्या वेदना होईपर्यंत आणि देशाभिमानाने उर भरुन आणण्यापासून ‘ए काफिर…’ असं म्हणत शत्रूत्व आणि विश्वासघाताच्या संतापापर्यंत प्रत्येक प्रसंगाला जणू काही सामोरं गेल्यानंतर एखादा व्यक्ती ज्या आत्मविश्वासाने त्या प्रसंगावर भाष्य करतो अगदी त्याच सराईताप्रमाणे गुलजार त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून या भावनांना कागदावर उतरवतात. कागज आणि कलम म्हणजेच कागद आणि लेखणी यांच्याशी मैत्री करणाऱ्या अशा या शब्दांच्या अवलियाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…

गुलजार यांच्यासाठी लिहिलेल्या काही ओळी, एक छोटासा प्रयत्न…

अल्फ़ाज़ क्या है, जाने उसके मायने आपसे
प्यार के आखर भी, पढे आपहिकी नझ्म से
लिखते है यह, मनो हमारी गलती ही सही
अंदाज-ए-बयां सिखा आपहिकी कलम से….
गुलजार नाम की बुलंद ललकार से….
गलती ही सही, पर की हैं पुरे दिलसे….

sayali.patil@loksatta.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 10:38 am

Web Title: poet gulzar birthday special blog
Next Stories
1 BLOG: मरणाच्या बातम्यांमध्ये कसला ब्रेकिंग न्यूजचा हव्यास!
2 Asian Games 2018 Blog : सुशील कुमार प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड देईल?
3 Asian Games 2018 Blog : टेनिसपटूंकडून भारताला पदकाच्या किती आशा?
Just Now!
X