16 January 2021

News Flash

बालपणीच्या आठवणींना उजाळा

सर्व भारतीयांच्या बालपणीच्या आठवणींत काही ना काही असतंच असतं.

– जय पाटील

मधल्या सुट्टीत आपला डबा इतर वर्गमित्रांबरोबर वाटून खाणं, रात्रंदिवस डोक्यात क्रिकेटचेच विचार सुरू असणं, हातपंपाने पाणी उपसणं, आजी-आजोबांचा सहवास, त्यांच्या लकबी… सर्व भारतीयांच्या बालपणीच्या आठवणींत यातलं काही ना काही असतंच असतं. म्हणूनच अ‍ॅनिमेटर तरुण लाक यांचा इंडिया विग्नेट्स हा अ‍ॅनिमेशन व्हिडीओ अनेक नेटिझन्सना त्या आठवणींच्या वाटेवर घेऊन गेला. या व्हिडीओला एका दिवसात साधारण १० लाख व्ह््यूव्ज आणि लाखभर लाइक्स तर मिळालेच, पण त्या पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी या निमित्ताने आपापला नॉस्टॅल्जिया मोकळेपणाने मांडला.

व्हिडीओची लांबी अवघी एक मिनीट ३१ सेकंद. त्यात मांडलेली दृश्य मोजून पाच. टूडी अ‍ॅनिमेशनमधला, पाहायला गेलं तर अगदी साधा आणि आशयाच्या दृष्टीने अपुरा वाटणारा हा व्हिडीओ. पण यातलं साधेपणंच अनेकांना भावल्याचं कॉमेन्ट्सवरून दिसतं. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालपण हा प्रत्येकाचाच हरवलेला पण हवाहवासा, परत गवसावा असा वाटणारा काळ. त्यामुळे कोणीही सहज त्या आठवणींत रमतं. दुसरं म्हणजे टीव्ही वर २४ तास अचाट कारनामे करणाऱ्या, अगणित भडक रंगांनी भरलेल्या आणि अतिशय वेगवान कार्टून्सना पाहून थकलेल्या डोळ्यांसाठी हा अगदी मोजक्याच फिक्या रंगांतला, संथगतीने चालणारा आणि पाहणाऱ्याला समजून घेण्याएवढा अवधी देणारा व्हिडीओ वेगळा ठरतो. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीयांचा पारंपरिक पेहराव, त्यांचं आपल्या भोवतालाशी असलेलं नातं यात अचूक हेरल्याचं, मांडल्याचं जाणवतं. भारतीयांच्या चालण्या, वागण्यातल्या लकबी तरुणने अतिशय बारकाईने नोंदवून त्या हुबेहुब मांडलेल्या दिसतात. शहाळं सोलून होईपर्यंत शाळकरी मुलाचं गाडीला रेलून उभं राहणं, पाणी भरणाऱ्या आईचं पदर नीट करणं, आजोबांचं पेपर वाचता वाचता जांभई देत, पायानेच टेबल जवळ ओढून, त्यावर पाट पसरवून, पोटावर चश्मा ठेवून झोपी जाणं हे सारं पाहताना प्रत्येकालाच आपल्या किंवा आपल्या आयुष्यातल्या कोणा ना कोणाच्या लकबी सहज आठवतात. पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला दिलेलं पाश्र्वसंगीत. या संथ संगीतामुळे मालगुडी डेजची आठवण झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

अर्थात भारतातल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा, वैविध्यपूर्ण भुगोलाचा, जागोजागी बदलणाºया संस्कृतीचा, पोषाखांचा परिपाक दीड मिनिटांत मांडणं शक्य नाही. प्रत्येकाच्या बालपणाचे दृश्यानुभव वेगळे असतीलच. तशी नाराजीही काही प्रतिक्रियांतून उमटलेली दिसते. हे फार अपुरं आहे, आणखी बरंच काही दाखवता आलं असतं, मजेदार, विनोदी करता आलं असतं, अशाही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पण मजेदार करणं हा तरुणचा हेतूच नसावा, असं हे अ‍ॅनिमेशन पाहताना वाटतं. आणि भारतातलं वैविध्य पाहता सर्वसमावेशकता अशक्यच आहे.

इंडोनेशिया, ब्राझिल सारख्या देशांतील ट्विटराइट्सनेही आपल्या गावाकडच्या जीवनाची आठवण हा व्हिडीओ पाहून झाल्याचं म्हटलं आहे. ‘परदेशांत काम करताना एकमेकांचा डबा शेअर करण्यातली मजा खूप मिस करते,’ असं एका भारतीय तरुणीने म्हटलं आहे. कोणी यातल्या आजोबांना पाहून आपल्या आजोबांची अठवण झाल्याचं नमूद केलं आहे, तर कोणी आपला शाळेतला गोल डबा आठवल्याचं सांगितलं आहे. ‘मी हा व्हिडीओ पाहून काहीशी हळवी झाले, मला अगदी लहानपणीच आईपासून दूर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी पाठवलं गेलं नसतं, तर हे सारं काही मलाही अनुभवता आलं असतं,’ असं भावनिक ट्विटही आहे. थोडक्यात, अगदी साध्याशा वाटणाऱ्या या दीड मिनिटांच्या अ‍ॅनिमेशनने अनेकांच्या बालपणाला उजाळा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 4:37 pm

Web Title: school days memories animation special articles nck 90
Next Stories
1 पाहा चिनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये चाललंय काय?
2 रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल का?
3 तो राजहंस एक
Just Now!
X