डॉ. सौमिल कोठारी

यंदाच्या वर्षी कोविड १९च्या साथीमुळे घरातच अडकून पडावे लागल्यामुळे नेत्रतपासणीअभावी अनेकांच्या दृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या संस्थेत आम्ही अनेक रुग्णांमध्ये मोतिबिंदूवर वेळेत उपचार न झाल्यामुळे डोळ्यावरील ताण वाढल्याचे, रेटिनल डिटॅचमेंटकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आणि डोळ्यांवरील तणावाची तपासणी होत नसल्याचे बघत आहोत. हे सर्व कोविड १९च्या भीतीमुळे होत आहे.
आपल्या सर्व अवयवांमध्ये डोळ्यांचा समावेश सर्वात नाजूक अवयवांमध्ये होतो. पाच विशेष जाणीवांपैकी दृष्टी ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. मात्र, असे असूनही डोळ्यांची योग्य ती निगा राखण्याच्या संदर्भात अनेकदा दुर्लक्ष होते. परिणामी अनेकांना दृष्टी गमवावी लागते.

आजघडीला किमान जगभरातील २२० कोटी लोकांमध्ये दृष्टीदोष वा अंधत्वाची समस्या आहे. म्हणजे, जगातील एकूण लोकसंख्येच्या तब्बल एक तृतियांश लोक! यापैकी अनेकांना केवळ चश्म्याची आवश्यकता आहे, तर काहींना कमी खर्चाची शस्त्रक्रिया, पण प्रत्येकाने नियमितपणे डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेसने (आयएपीबी) नमूद केल्यानुसार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्ती यांना डोळ्यांशी संबंधित दोष उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते.
अंधत्व रोखण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे डोळ्यांची तपासणी. तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत असले तरी डोळ्यांची नियमित तपासणी करावी. लाखो भारतीयांच्या बाबतीत नेमका याचाच अभाव दिसून आला आहे. यंदाच्या वर्षी तर कोविड १९च्या साथीमुळे घरातच अडकून पडावे लागल्यामुळे नेत्रतपासणीअभावी अनेकांच्या दृष्टीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या संस्थेत आम्ही अनेक रुग्णांमध्ये मोतिबिंदूवर वेळेत उपचार न झाल्यामुळे डोळ्यावरील ताण वाढल्याचे, रेटिनल डिटॅचमेंटकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आणि डोळ्यांवरील तणावाची तपासणी होत नसल्याचे बघत आहोत. हे सर्व कोविड १९च्या भीतीमुळे होत आहे. योग्य वेळेत डोळ्यांची तपासणी झाली असती तर या सर्व रुग्णांची दृष्टी वाचवता आली असती.

डोळ्यांची तपासणी म्हणजे ऑप्टिशियनकडून केवळ चश्म्याचा नंबर तपासणे, असा लोकप्रिय समज असला तरी यात यापेक्षा कितीतरी अधिक बाबी असतात. नेत्ररोगतज्ज्ञाकडून डोळ्यांची सखोल तपासणी करून घेणे का गरजेचे आहे, याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे –

१. मोतिबिंदू, ग्लुकोमा आणि वयाशी संबंधित मॅक्युलर डीजनरेशन यांसारख्या आजाराचा लवकरच छडा लागून दृष्टी वाचवता येणे शक्य आहे

२. डोळ्यांच्या तपासणीमुळे मधुमेह, हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल आणि अगदी कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचाही छडा लागू शकतो. अनेक रुग्णांना डोळ्यांच्या तपासणीतूनच आपल्याला अशा प्रकारचा आजार आहे, ही बाब पहिल्यांदा समजते

३. डोळ्यांच्या तपासणीमुळे मुलांना शाळा आणि खेळांमध्ये यश मिळवणे सोपे होते. शाळेतील अनेक उपक्रमांसाठी दृष्टी चांगली असणे महत्त्वाचे असते. तुमच्या पाल्याची दृष्टी चांगली आहे की नाही, हे समजण्याचा एकमेव उपाय डोळ्यांची तपासणी हाच आहे

४. मायोपिया किंवा जवळची दृष्टी अधू होणे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलांमध्ये लहान वयातच हा आजार जडण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यामुळे त्यांना मोतिबिंदू, ग्लुकोमा आणि रेटिनल डिजनरेशन यांसारखे दोष निर्माण होण्याचा धोका कितीतरी पटींनी वाढतो. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांची नियमित तपासणी करणे हा उत्तम मार्ग आहे. योग्य वेळेत मायोपिया नियंत्रणाचे उपाय केल्यास तुमच्या अपत्याला पुढील आयुष्यात गंभीर दृष्टीदोष होण्याचा धोका कमी करणे शक्य होते

५. दृष्टी सुधारल्याने आपल्या दैनंदिन आयुष्याची गुणवत्ताही सुधारते

६. अधू दृष्टीमुळे अनेकदा अपघात होतात – घरी, कार्यालयात किंवा अगदी रस्त्यावरही
त्यामुळे तुम्हाला तुमच्या दृष्टीत काही बदल जाणवले तर ‘आपलं आता वय होत चाललंय’ असे म्हणून दुर्लक्ष करू नका. तसेच, कोविड-१९ हे तुमच्या अंधत्वाचे कारण बनू देऊ नका. त्या भीतीपोटी तुम्ही तुमची दृष्टी गमवू नका.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो. अंधत्व आणि दृष्टिदोष याकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो. यंदा ८ ऑक्टोबर रोजी साजरा झालेल्या जागतिक दृष्टी दिनाचे बोधवाक्य ‘होप इन साइट’ म्हणजेच ‘दृष्टीपथात आशा’ हे होते.

आपण आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून रोखता येण्याजोग्या अंधत्वाला भूतकाळात जमा करू शकतो. त्यामुळे उचला तुमचा फोन आणि त्वरित तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

(लेखक बाँबे सिटी आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर येथे आरोग्य संचालक आहेत)