बेनितो मुसोलिनी हे नाव जगातल्या प्रमुख हुकुमशहांपैकी एक नाव आहे. मुसोलिनीने ३ जानेवारी १९२५ रोजी म्हणजेच आजपासून बरोबर ९५ वर्षांपूर्वी इटलीत हुकुमशाही जाहीर केली होती. त्याने हुकुमशाही जाहीर केल्यानंतर पुढची २० वर्षे ती गाजवली. मुसोलिनीचा जन्म एका लोहार कुटुंबात झाला होता. त्याचे वडील हे पेशाने लोहार होते. आलेसांद्रो मुसोलिनी हे बेनितोच्या वडिलांचे नाव होते. तर मुसोलिनीची आई प्राध्यापिका होती. त्यांचं नाव रोसा मुसोलिनी होतं. २९ जुलै १८८३ ला बेनितोचा जन्म झाला. बेनितो जुआरेज हे मेक्सिकोचे राष्ट्रपती होते. त्यांच्या विचारांचा मुसोलिनीच्या वडिलांवर प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी मुलाचं नाव बेनितो ठेवलं.

बेनितोच्या घरातली आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं. डिप्लोमा झाल्यानंतर काही काळ शिक्षक म्हणूनही काम केलं. मात्र त्यानंतर बेनितो मुसोलिनीने शिक्षकी पेशा सोडला आणि राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जगभरात अनेक विचारधारा समोर येत होत्या. त्याचवेळी धर्माचंही राजकारण समोर येत होतं. अशा काळात १९०२ मध्ये मुसोलिनी हा समाजवादी विचारधारेशी जोडला गेला. स्वित्झर्लंड या ठिकाणी तो वास्तव्य करु लागला. तिथे एक पत्रकार म्हणून त्याने नोकरी स्वीकारली आणि स्वतःची ओळख वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र यामध्ये सुरुवातीला मुसोलिनीला फारसं यश आलं नाही. एका वर्तमान पत्रात काम करत असताना त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली. या वर्तमान पत्रात मुसोलिनीने पहिल्या महायुद्धाच्या वेळी इटलीने घेतलेल्या परराष्ट्रीय धोरणावर उघडपणे टीका केली. तसंच इटली हा देश पहिल्या महायुद्धात सहभागी कसा काय झाला ? यावर प्रश्नही उपस्थित केला. याच काळात पत्रकारितेत त्याचं फारसं मन रमलं नाही म्हणून त्याने ती नोकरी सोडली आणि देशाची सेवा करण्यासाठी तो लष्करात रुजू झाला. मात्र लष्करात वारंवार जखमी झाल्याने त्याला तिथली नोकरीही सोडावी लागली.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

 

 

१९१८ मध्ये त्याने लष्कराची नोकरी सोडली आणि तो पूर्णवेळ राजकारणात आला. राजकारणात आल्यानंतर आंदोलनं आणि रॅली काढल्याने त्याला अनेकदा तुरुंगात जावं लागलं. सातत्याने तुरुंगात जावं लागल्याने आणि मुसोलिनी त्याचे विचार निडरपणे मांडत असल्याने त्याची प्रसिद्धी वाढू लागली. सरकारवर त्याने टीकेचा भडीमार सुरु केला. लोकांना हे पटवून दिले देशात आता सरकार हवं आहे ज्याचा एकछत्री अंमल असेल. त्याच्या भाषण कौशल्याने लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले. आकर्षित होऊ लागले. १९१९ मध्ये मुसोलिनीने मिलान शहरात जाऊन समाजवादी क्रांतिकारी युद्धात भाग घेणाऱ्या सैनिकांना आपल्या बाजूने वळवले. एवढंच नाही तर एका लढाऊ लीगचीही स्थापना त्याने केली. याच काळात त्याने एका राजकीय पक्षाची स्थापना केली. राष्ट्राचा विचार सर्वात आधी ही संकल्पना मुसोलिनीने समोर आणली. त्याची भाषणंही प्रखर राष्ट्रवादाने ओतप्रोत भरलेली असत. पहिल्या महायुद्धानंतर सर्वाधिक नुकसान झालं ते इटलीचं. त्यामुळे देशात अराजक माजलं होतं. ज्याचा पुरेपूर फायदा मुसोलिनीने घेतला. राष्ट्रप्रेम हीच आपल्या पक्षाची भावना आहे असं तो सांगत असे. त्यामुळे त्याच्या पक्षाचा प्रभाव वाढू लागला. जास्तीत जास्त लोक मुसोलिनीला पाठिंबा देऊ लागले.

१९२२ च्या ऑक्टोबर महिन्यात ३० हजार फॅसिस्ट लोकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत रोमवर हल्ला चढवला. या समूहाचे नेतृत्त्व मुसोलिनीने केले होते. त्यानंतर त्याने इथली सत्ता काबीज केली. सुरुवातीची दोन वर्षे लोकशाही मार्गाने सरकार चालवलं. मात्र ३ जानेवारी १९२५ रोजी या ठिकाणी हुकमशाही जाहीर केली. इटलीच्या इतिहासात तो पहिला सर्वात तरुण पंतप्रधान ठरला. त्याने २० वर्षे इटलीवर राज्य केलं. अॅडॉल्फ हिटलर आणि मुसोलिनी या दोन हुकुमशहांचा कालखंड एकच होता आणि या दोन हुकूमशहांना मरणही एकाच कालखंडात आलं. मुसोलिनी आणि हिटलर यांच्यात मैत्रीचे संबंध होते मात्र मनातून मुसोलिनी हिटलरचा द्वेष करत होता असेही सांगितले जायचे. हिटलरची लोकप्रियता चांगलीच वाढू लागली ज्याबाबत मुसोलिनीला असूया वाटत असे.

दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात मुसोलिनीने जर्मनीची (हिटलर) साथ देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्याच्या विरोधात जाणारा ठरला. त्याच्या नेतृत्त्वावर प्रश्न निर्माण होऊ लागले. १९४३ मध्ये इटलीच्या राजाने मुसोलिनीचे सरकार बरखास्त केले आणि त्याला कैद केले. मात्र याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात हिटलरने मुसोलिनीला सोडवलं. १९४५ च्या दरम्यान जेव्हा ही बाब स्पष्ट झाली की हिटलर म्हणजेच जर्मनी दुसरं महायुद्ध हरणार आहे तेव्हा मुसोलिनीने स्वित्झर्लंड या ठिकाणी पळून जाण्याचा प्रय़त्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. त्याच्या प्रेमिकेसह त्याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर मुसोलिनी, त्याची प्रेयसी आणि इतर १३ जणांना गोळी मारुन ठार कऱण्यात आलं. या सगळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह मिलान या ठिकाणी आणले गेले. तिथे एका मैदानावर हे मृतदेह फेकण्यात आले. यावर लोक थुंकले, अनेकांनी या मृतदेहांना लाथा मारल्या. त्यानंतर एका गॅस स्टेशनच्या छताला हे मृतदेह उलटे टांगण्यात आले. ज्यावर लोकांनी दगड मारले. मृतदेहांची यथेच्छ विटंबना करुन झाल्यानंतर एका अज्ञात स्थळी ते पुरण्यात आले. अशा रितीने इटलीतल्या एका पर्वाचा अंत झाला.