श्रुति गणपत्ये
साधारण १९व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या जॉर्जिया प्रांतात गुलामांचा वापर अक्षरशः फुकट मजूर म्हणून कापसाच्या शेतीसाठी होत असतो. त्यांचं शारिरीक-मानसिक शोषण आणि मालकीची वस्तू असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. त्यावेळी मालकाला काहीतरी खटकतं आणि तो एका लहान मुलाला चाबकाने फटके देण्याची शिक्षा फर्मावतो. त्याला फटके मारलेले सहन न होऊन एक कोरा नावाची १७-१८ वर्षांची मुलगी त्याला वाचवायला मध्ये पडते. त्यामुळे तिचीही पाठ फोडली जाते. त्या असह्य वेदना, शेतातले कष्ट, एखाद्या कीडामुंगीप्रमाणे आयुष्य याचा तिला उबग येतो आणि आपल्या आणखी एका गुलाम सहकाऱ्याबरोबर ती पळून जायचं ठरवते. कुठे, कसं, कधी हे सगळं ती त्याच्यावर सोपवते. एका रात्री ते निघतात आणि सर्व अडचणी पार करून एका जमिनीखालील रेल्वे थांब्यावर जाऊन पोहोचतात. त्यांची जॉर्जियामधून सुटका होते. इथूनच कोराचा गुलामगिरीविरुद्धचा प्रवास सुरू होतो आणि अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये या गुप्त भूमिगत रेल्वेच्या मदतीने ती पळत राहते. टोकाची क्रूरता, वर्णद्वेष, हिंसा, वर्चस्ववाद, माणसांमधली विकृती अशा अति टोकाच्या भावनांनी भरलेली आणि गुलामगिरीच्या प्रथेविरोधात अंगावर काटा आणणारी ही मालिका आहे.

गेल्यावर्षी अमेरिकेमध्ये वर्णद्वेषाविरोधात झालेल्या चळवळीला बरोबर एक वर्ष झालं. मिनेसोटामध्ये जॉर्ज फ्लॉइड या एका काळ्या वर्णाच्या माणसाचा गोऱ्या पोलिसांनी केलेल्या शारीरिक जबरदस्ती, छळामुळे २५ मे २०२० रोजी मृत्यू झाला. कोविडचा काळ असूनही त्याविरोधात “ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर” ही चळवळ उभी राहिली आणि प्रगतीशील अमेरिकेतही कसा वर्णद्वेष ठासून भरला आहे याच्या कहाण्या बाहेर आल्या. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन प्राइमवर “द अंडरग्राऊंड रेलरोड” नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. दिग्दर्शक बेरी जेनकिन्स दिग्दर्शित मालिका असून कोलसन व्हाईटहेड या लेखकाच्या पुलित्झर पारितोषिक मिळालेल्या पुस्तकावर ही आधारित आहे. गुलामगिरी प्रथेला विरोध करणाऱ्यांनी गुलामांच्या सुटकेसाठी विविध मार्ग अवलंबले होते. भूमिगत रेल्वे हा त्यातलाच एक मार्ग होता. ज्या राज्यांमध्ये गुलामगिरी नाही किंवा कायदे आहेत अशा ठिकाणी या गुलामांना पळण्यासाठी मदत करणारी ही गुप्त रेल्वेलाइन होती. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे १९९८ मध्ये या गुप्त मार्गाचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली. हा मार्ग थेट कॅनडापर्यंत घेऊन जायचा कारण ती ब्रिटिशांची वसाहत होती आणि तिथे १९३०च्या दरम्यानच गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली होती.

कोरा तिच्या आईसोबत जॉर्जियामध्ये शेतमजूर म्हणून राहत असते. पण तिची आई तिला सोडून जाते आणि त्यामागे नक्की काय कारण होतं हे तिला माहित नसतं. त्यांच्यावर देखरेखीचं आणि पळून गेलेल्या गुलामांना पकडून आणण्याचं काम अरनाल्ड रिग्वे या अत्यंत क्रूर आणि विकृत माणसाकडे असतं. त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला तो मागेपुढे पाहत नाही. कोरा आणि तिचा साथीदार पळून गेल्यावर तो तिचा पाठलाग करत विविध ठिकाणी फिरत राहतो. रिग्वेने आपल्या बरोबर होमर नावाचा एक काळा लहान मुलगा मदतनीस म्हणून ठेवलेला असतो. खबरा काढणे आणि मालकाला खूष ठेवणं हीच त्याची जबाबदारी असते. आयुष्य जगण्यासाठी जो विरोधाभास असतो तो इथे उत्तम उभा केला आहे. कारण होमर स्वतःच्या वर्ण मित्रांविरोधात कारवाया करत राहतो. कोरा पळून जाऊन दक्षिण कॅरोलिना प्रांतात जाते. तिथे तिला अत्यंत चांगली वागणूक मिळते. लिहायला वाचायला शिकवलं जातं. पण काळ्या वर्णाचं उच्चाटन करण्यासाठी ही वागणूक असल्याचं तिच्या लक्षात येतं आणि तिथूनही तिला पळावं लागतं. मग ती दक्षिण कॅरोलिनामध्ये जाते. तिथे गावात प्रवेश करतानाच काळ्या लोकांचे मृतदेह झाडांवर लटकलेले असतात. त्या गावामध्ये काळ्या वर्णाशी संबंधित काहीही शिल्लक ठेवायचं नाही, असा ठराव झालेला असतो. पण एका घरामध्ये तिला राहण्याची जागा मिळते. अर्थातच ते उघडकीस येतं आणि तिला शोधत आलेला क्रूर रिग्वे कोराला पकडतोच. पुढच्या एका कथेमध्ये ती इंडियाना प्रांतात जाते जिथे गुलामगिरीविरोधात कायदे असतात. काही काळ्या वर्णाचे लोक एकत्र येऊन जमीन विकत घेऊन त्यावर द्राक्षांची लागवड करतात आणि त्यापासून वाईन बनवतात. त्यांचं आयुष्य खूप चांगलं सुरू असतं. पण गोऱ्या वर्चस्ववादाला ते पटत नाही आणि पुढे ते गाव नष्ट करण्याचे प्रयत्न होतात. या गुलामांच्या कितीतरी पिढ्या या कीडा-मुंगीप्रमाणे चिरडून टाकल्या आहेत. सुमारे ४०० वर्ष ही प्रथा अमेरिकेमध्ये होती आणि ती नष्ट करण्यामागे मोठा संघर्ष आहे.

या सगळ्या संघर्षामध्ये गुप्त भूमिगत रेल्वे ही या गुलामांसाठी एक मोठा आधार असतो. काही जण या मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात तर काही जण हरतात, मारले जातात. खरंतर रेल्वेचा वापर एका स्वप्नाप्रमाणे या मालिकेमध्ये केला आहे. प्रत्येक पळून जाणाऱ्या काळ्या माणसाची विचारपूस करणं, त्याची कथा लिहून ठेवणं, त्यांना चांगली वागणूक देणं, खायला-प्यायला देणं असं एक मॅजिक रिअलिझम सारखं वातावरण काही स्टेशन्स आणि गाडीमध्ये निर्माण केलं आहे. कोराच्या प्रवासामध्ये एक थरार आहे, भीती आहे आणि रेल्वे तिची साथी आहे.

या मालिकेची दुहरी जमेची बाजू म्हणजे उत्कृष्ट दृश्य परिणाम. रात्र, पहाट, निर्जन जंगल, कापसाची शेती याचं चित्रीकरण एकदम मनात भरतं. प्रत्येक दृश्यावर, फ्रेमवर बारकाईने काम केल्याचं जाणवत राहतं. कोराची भूमिका करणारी साउथ आफ्रिकन थुसो बेदू या तरुण अभिनेत्रीने तर प्रत्येक भागामध्ये तिचा संघर्ष जीवंत केला आहे. या प्रवासामध्ये तिला अनेक लोक भेटतात, ती प्रेमात पडते, काही चांगले असतात, काही वाईट. प्रत्येक वेळेला ती पकडली जाते आणि पळून जाण्यासाठी, जगण्यासाठी धडपडत राहते. मात्र हार मानत नाही. सातत्याने क्रूर वातावरणात राहून, शारिरीक छळ सहन करूनही तिची जगण्याची उर्मी आणि चांगल्या आयुष्याची आशा कायम राहते.

shruti.sg@gmail.com