scorecardresearch

Premium

नेत्यांच्या पोस्टरवर लहान मुलांकडून मूत्रविसर्जन! पुढच्या पिढीवर हे कुठले संस्कार?

“माणसाने माणसाशी माणसासम वागणे”, माणुसकी हरवलेल्या तुमच्या आमच्यातील लोकांची गोष्ट

10- 12 years Old Boys Made To Pee on Posters Of Shinde Fadnavis Modi Pawar Disgusting Video Goes Viral Where Society Is Headed
सुरुवातीला मूक मोर्चाच्या रूपात सुरु झालेलं आंदोलन आता अत्यंत आक्रमक झालं आहे.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आज सकाळी, नेहमीप्रमाणे कामाला बसण्याच्या आधी फोन हातात घेतला. काम ऑनलाईन असल्याने सोशल मीडिया चाळल्याशिवाय कामाची सुरुवात होत नाही त्यामुळे एक एक करून ट्रेंडिंग विषय व संबंधित व्हिडीओ, फोटो तपासून बघत होते. इतक्यात स्क्रोल करताना असं काही डोळ्यासमोर आलं की मन अगदी विषण्ण झालं. मागील काही महिन्यांपासून आरक्षण संबंधित वाद खूप चिघळला आहे, सुरुवातीला मूक मोर्चाच्या रूपात सुरु झालेलं आंदोलन आता अत्यंत आक्रमक झालं आहे. यातील खरी- खोटी बाजू, कोणाचं चुकतंय, कोणी समजुतीने घ्यायला हवं हे मुद्दे व्यक्तिसापेक्ष नक्कीच बदलू शकतात पण या एकूण आंदोलनात आज पाहिलेलं दृश्य हे माणुसकीला, संस्कृतीला, संस्काराला लाजवणारं आहे.

संवेदनशील विषय असल्याने हा व्हिडीओ इथे आपल्याला दाखवता येणार नाही पण, बीड जिल्ह्यातील गेवराई येथील हे दृश्य असल्याचं या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. यामध्ये केंद्रीय, राज्य मंत्र्यांचे फोटो एका बॅनरवर लावून ते रस्त्यावर पसरवण्यात आले होते. आजूबाजूला लोकांची प्रचंड गर्दी असून साधारण १० ते १२ वर्षांची मुलं यामध्ये मंत्र्यांच्या फोटोवर मूत्रविसर्जन करताना दिसत आहेत. साहजिकच या मुलांना ज्यांनी हे कृत्य करायला भाग पाडलाय किंबहुना प्रोत्साहन दिलंय ती मंडळी आजूबाजूला फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मजकुरात “लहान मुलांकडून सर्व नेत्यांना मूत्र अभिषेक” असं लिहिलेलं आहे.

Parenting Mistakes That Spoil Children
आई-वडीलांच्या ‘या’ चुकामुळे मुलांवर होतात चुकीचे संस्कार! मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवताना पालकांनी काय काळजी घ्यावी?
10 Habits of Successful People
यशस्वी लोकांच्या फक्त ‘या’ १० सवयींमुळे बदलू शकते तुमचे आयुष्य; त्या सवयी कोणत्या आहेत, जाणून घ्या….
Health Special
Health Special : पॉझिटिव्ह पालकत्व म्हणजे काय?
Todays parents are literally living two lives how and why
सांदीत सापडलेले.. ! एका जगण्यात दोन आयुष्यं!

खरंतर जहाल पद्धतीने स्वातंत्र्य मिळवताना सुद्धा कधी असे प्रकार मुद्दाम झाल्याचे दाखले आपल्या इतिहासात नाहीत. त्यामुळे २१ व्या शतकात, सुसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात अशा घटना घडणं हे कितपत योग्य आहे, हा मुख्य प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यावर मनात येतो. कुठलीही मागणी (चूक किंवा बरोबर) पूर्ण करण्यासाठी पवित्रा निवडताना कुठल्याही जातीच्या आधी आपल्याला माणूस असल्याचं लेबल लागलंय हे आज प्रत्येक स्तरावरील व्यक्ती विसरताना दिसतेय. ज्या नेत्यांच्या फोटोवर मूत्र विसर्जन करण्यात आलं त्यांच्या बाबत आंदोलनकर्त्यांच्या मनात कितीही राग असला तरी हे नेते हे नेते असण्याआधी तुमच्या आमच्या सारखीच माणसं आहेत, हे आपणही लक्षात घ्यायला हवं.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात अशा प्रकारची घटना प्रत्यक्ष घडली होती त्यावेळेस सुद्धा किळसवाणा प्रकार करणाऱ्या व्यक्तीवर प्रचंड टीका झाली होती. दुर्बलांना बळ देण्यासाठी त्यावेळेस समोर आलेली जनता हा गुन्ह्यांच्या मालिकांमध्ये काहीसा आशेचा किरण होती. पण आज त्याच पद्धतीची घटना अभिमानाने व्हायरल केली जात आहे हे पुन्हा समाजाला स्वार्थाच्या काळोखात ढकलून देण्यासारखं आहे.

या संपूर्ण घटनेत मनाला चटका लावून जाणारा एक प्रकार म्हणजे ज्यांनी कोणी हा व्हिडीओ बनवलाय, त्यांनी फक्त आपला एक मुद्दा मांडण्यासाठी व्हिडिओत बोलावून आणलेल्या लहान मुलांच्या डोक्यात आयुष्यभरासाठी विषारी विचार रुजवले आहेत. ज्या पिढीच्या भविष्यासाठी हे आंदोलन सुरु आहे त्याच पिढीला अशा प्रकारे रस्त्यावर आणून नागवं करणं, त्यांच्या प्रायव्हेट पार्टसचे क्लिप्स बनवून ते व्हायरल करणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. एरवी राजकारण्यांवर साध्या भोळ्या जनतेचा वापर केल्याचा आरोप लावणाऱ्या या लोकांनी निरागस मुलांचा असा गलिच्छ वापर करून घेताना एकदा तरी स्वतःच्या मनाला “आपण करतोय ते योग्य आहे का?” असा प्रश्न केला असेल का?

ज्यांनी या मुलांना एवढं क्रांतिकारी काम करायला बोलावून आणलंय ते स्वतः जर या मुलांचे पालक असतील तर आपल्याच मुलांच्या अब्रूची अशी धिंड काढताना त्यांना काहीच वाटलं नाही ? सोशल मीडियावर व्हायरल होणारी गोष्ट कितीही डिलीट केली तरी या ना त्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध असतेच. त्यामुळे उद्या जेव्हा ही मुलं मोठी होतील, त्यांच्या कर्तबगारीने कुठे नाव करू पाहतील आणि तेव्हा त्यांच्या ओळखीला या घटनेचा काळ डाग असेल तर त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल?

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात लहान मुलांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर आक्षेपार्ह्य पद्धतीने पोस्ट करणे हे गैर असल्याचे सांगितले होते. वय, लिंग, धर्म, जात याशिवाय ‘गोपनीयतेचा हक्क’ हा प्रत्येक नागरिकाला आहे. अशावेळी लहान मुलांची गोपनीयता सांभाळण्याची जबाबदारी ही पालकांची असते. या व्हिडिओमधील मुलांच्या पालकांनी आपली जबाबदारी तर सोडा आपल्या मुलांविषयीची आत्मीयता सुद्धा कुठल्यातरी अडगळीत टाकून दिली असावी असं दिसतंय.

आता हा व्हिडीओ व्हायरल झालाच आहे, उद्या आंदोलन आणखी कुठल्या पद्धतीने पेटेल. आज ना उद्या जे सत्य, योग्य व कायद्याला धरून आहे त्या गटाचा विजय होईल. पण आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी ‘अशा’ पद्धतीचा वापर करावा हा धडा ज्या लोकांनी लहान मुलांना दिलाय त्यांनी आता हा ही विचार करावा की, समजा उद्या जर तुमच्या या अत्यंत जगावेगळ्या कृतीने तुम्हाला हवी ती गोष्ट साध्य झाली, तर हीच मुलं भविष्यात तुमच्याकडे हट्ट करताना कुठल्या पद्धतीचा अवलंब करतील?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 10 12 years old boys made to pee on posters of shinde fadnavis modi pawar disgusting video goes viral where society is headed svs

First published on: 30-10-2023 at 14:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×