vaishnavi.karanjkar@loksatta.com
“चुकली दिशा तरीही हुकले ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे”
विं. दा. करंदीकरांच्या कवितेच्या या ओळी अनिल अवचटांच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी तंतोतंत शोभणाऱ्या आहेत. डॉक्टर, समाजाचे डॉक्टर, संशोधक, पत्रकार, लेखक, साहित्यिक, कवी…फक्त कविता लिहिणारा नव्हे, तर दोहेसुद्धा लिहिणारा, गायक, वादक, संगीतज्ञ, चित्रकार, ओरिगामी कलाकार, निसर्गोपासक आणि बरंच काही! थोडक्यात काय? जगण्याचा आनंद जिथून कुठून घेता येईल, त्या प्रत्येक ठिकाणहून तो उपभोगण्याच्या प्रयत्नात असलेला एक वेडा मुसाफिर! रुग्णांच्या शारिरीक वेदनांवर उपचार करताना त्यांच्या मानसिक वेदनांनाही बरं करणारा हा डॉक्टर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये येऊन समाजावरही उपचार करत होता.




मराठी साहित्य, समाजकारण, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देणारे अनिल अवचट यांचं व्यक्तिमत्त्व नव्या-जुन्या प्रत्येक पिढीला प्रेरणादायी असंच होतं. प्रत्येक गोष्टीबद्दल वाटणारं कुतुहल, त्यातून आलेली निरिक्षणं, कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्याची वृत्ती आणि ती गोष्ट समाजासमोर मांडण्याची तळमळ ही अनिल अवचटांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांची सामाजिक विषयांवरची पुस्तकं म्हणजे ‘माणसं’, ‘संभ्रम’, ‘धार्मिक’, ‘धागे आडवे उभे’, ‘प्रश्न आणि प्रश्न’, ‘कार्यरत’ हा सगळा समाजघटकांशी संवाद आहे, कार्यकर्त्यांशी संवाद आहे. जे मनात आलं, जे बोलावं वाटलं, ते सगळं तसंच्या तसं प्रामाणिकपणे कागदावर उतरवल्याने त्यांचे लिखाण काळजाला थेट भिडते. आपल्या लिखाणासाठी प्रेरणा कशी मिळते याबद्दल त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की आश्चर्य वाटणं ही प्रक्रिया लिखाणाच्या मुळाशी असते. एखाद्या गोष्टीचं कुतुहल वाटणं, ती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणं आणि मग त्याच्या खोलात जाणं हा लिखाणाचा प्रेरणास्त्रोत.
कागदावर उतरवलेले त्यांचे अनुभव वाचनीय ठरतात ते ह्यामुळेच. बिहारमध्ये जाऊन त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. त्या दुष्काळाचं त्यांनी मांडलेलं भीषण वास्तव वाचून डोळ्यात पाणी तरळतं कारण अवचटांनी ते वास्तव जगलेलं आहे. बिहारमध्ये अन्नछत्र सुरू असताना भुकेनं त्यासमोरचं प्राण सोडलेली वृद्धा असो किंवा मैला साफ कऱणाऱ्या कामगारांसोबत मैला उचलणं असो. हे सगळं ते जगले आणि त्यामुळे आपल्या लेखणीतून प्रभावीपणे व्यक्त होऊ शकले.
हेही वाचा – पुन: प्रकाशित : मोठी त्याची सावली…; अनिल अवचट यांच्या मुलीच्या लेखणीतून
त्यांच्या सामाजिक लिखाणाला कृतीचीही जोड होती. युवक क्रांती दल, मुस्लीम सत्यशोधक चळवळ अशा चळवळींच्या माध्यमातून कार्यरत असणं, ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना, तिथल्या रुग्णांना मित्र समजून त्यांना नशामुक्त करणं, देवदासी, भटके, कोळी, भंगी अशा अनेक दुर्लक्षित समाजघटकांचं आयुष्य प्रत्यक्ष जगणं यामुळे त्यांचं लिखाण जिवंत वाटतं. भंगी समाजाच्या प्रश्नाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष त्या लोकांसोबत जाऊन मैला वाहिल्या आहेत. दुसऱ्यांच्या मैलांच्या स्पर्शाने काय होतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हे कामही केलं. शब्द बापुडे केविलवाणे… दृश्य थेट आत जाऊन बसतं, असं म्हणत त्यांनी लिखाण करण्याआधी त्यांच्या समस्यांचा सामना केला.
अवचटांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेलं लिखाण हे स्वयंप्रेरणेतून आलेलं आहे. कुणी पैसे दिले म्हणून, लिहायला सांगितलं म्हणून लिहिलेलं नाही. त्यांच्या लिखाणाला कुतुहल आणि आपुलकीचा गंध आहे. त्यांच्या कामाची ही शैली पाहता त्यासाठी प्रचंड मेहनत लागत असणार हे निश्चितच. मात्र त्यांच्या लिखाणात या मेहनतीतून येणाऱ्या थकव्याचा, वणवणीचा मागमूसही नसतो. म्हणूनच आजही हे लिखाण बऱ्याच अंशी कालसुसंगत आणि जिवंत वाटतं. लिखाणातली ठराविक चौकट, रुढ मार्ग त्यांनी नाकारले. स्वतःची उत्स्फूर्त शैली तयार केली. जे मनात आलं, जे बोलावंसं वाटलं ते त्यांनी लिहिलं आणि त्यामुळेच त्यांच्या शैलीत बंडखोरीची छटाही आढळते.
लिखाणाव्यतिरिक्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा बऱ्याच जणांना अज्ञात असतील. अवचटांना चित्रकला, फोटोग्राफी, काष्ठशिल्प, ओरिगामी, पाककला, बासरीवादन अशा अनेक कला अवगत होत्या. त्यांच्यातल्या कुतुहलापोटी त्यांनी हे सर्व शिकून घेतलं होतं. ओरिगामी कलेतले तर ते तज्ज्ञ मानले जातात. या विषयावरचं त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं असून दुसरंही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. बासरी वाजवण्याबरोबर उत्तम संगीत ऐकणं हाही त्यांचा आवडता छंद होता.
अशा या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने महाराष्ट्राच्या साहित्य, कला, विज्ञान, समाजकारण अशा अनेक क्षेत्रांची कधीही भरून न येणारी हानी निश्चितच झाली आहे. मात्र त्यांच्या अनुभवसमृद्ध लिखाणातून अवचट कायमच आपल्यासोबत राहतील आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये कुतुहल जागृत ठेवण्यासाठीचे प्रयत्न करत राहतील, हे निश्चित. शेवटी त्यांनीच संत कबीरांच्या प्रेमात असताना रचलेल्या एका दोह्यातल्या या काही ओळी त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट मानता येतील अशाच आहेत. अनिल अवचट म्हणतात,
ऐसा कर कुछ बंदे जिससे
दुख किसीका कम हो जाये
चाहे बने ना महल तुम्हारे
आँसू किसीके पोंछे जाये|