ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी अवचट यांचं निधन झालं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येत आहे. अनिल अवचट यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जातेय.

व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली आणि आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून अनेक लोक जोडली. मात्र अनिल अवचट हे एक वडील म्हणून कसे आहेत याबद्दल त्यांची कन्या यशोदा वाकणकर यांनी लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये २४ ऑगस्ट २०१९ रोजी एक विशेष लेख लिहिला होता. २६ ऑगस्ट २०१९ रोजी अनिल अवचट यांच्या ७५ व्या वाढदिवानिमित्त त्यांच्याच मुलीने एक समाजसेवक, साहित्यिक वडिलांच्या जीवनावर या लेखातून प्रकाश टाकला होता. हा लेख आम्ही पुन:प्रकाशित करत आहोत.

Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

माझा बाबा डॉ. अनिल अवचट, हा नुसता लेखक नसून एक हरहुन्नरी माणूस आहे. खूप सरळ मनाचा माणूस. ‘बाबा’ हा शब्द जरी उच्चारला, तरी मनात मायेची ऊब पसरते. खूप सुरक्षित वाटायला लागतं. आईबाबांनी आम्हाला कधीही ‘हे चांगलं, ते वाईट’ किंवा ‘गरिबी म्हणजे काय, दुष्काळ म्हणजे काय’ हे घरी बसून सांगून उपदेशाचे डोस पाजले नाहीत, तर त्या गोष्टी सहजतेने दाखवल्या. अनुभवायला शिकवलं आणि त्यामुळेच आम्ही वास्तव जगत गेलो. कधीही कसलाही हट्ट केला नाही. उलट ताई आणि मी आमच्या गोष्टी इतरांना देत राहिलो. दोघीही लहानपणापासून संवेदनशील. या गोष्टी अनुभवल्यामुळे ती संवेदनशीलता अधिकच वाढत गेली.

रोज सकाळी स्वयंपाक करताना मला बाबाची आठवण येते. माझ्या लहानपणी बाबा अनेकदा घरातला स्वयंपाक करायचा. लोणची घालणं, चिवडे, खोबऱ्याच्या वडय़ा करणं, अशाही गोष्टी तो निगुतीने करायचा. तेव्हा तो नेहमी सांगायचा, की मनापासून केलेला स्वयंपाक म्हणजे खराखुरा चवदार स्वयंपाक! चवदार स्वयंपाक म्हणजे, आपण ज्यांच्यासाठी स्वयंपाक करतो आहोत, त्यांच्याबद्दल चांगला विचार करून केलेला स्वयंपाक. मनात थोडासा जरी किंतु असेल, तर चव बिघडते. राग राग करत केलेल्या स्वयंपाकात मीठ, तिखट हमखास कमी-जास्त होतं आणि स्वयंपाकात चव कशाने येते? तर प्रेमाच्या इसेन्सने. बाबाच्या या विचारांची आठवण आली, की मी स्वत:शीच हसून छान विचार करत स्वयंपाक करू लागते.

रोज सकाळचा चहा बाल्कनीतल्या झाडांबरोबर घेताना मला आई आणि बाबा दोघंही आठवतात. कारण आईला मोठय़ा कुंडय़ांमधली फुलांची झाडं लावायला आवडायची आणि बाबाला छोटय़ा छोटय़ा कुंडय़ांमधली कॅक्टस व सक्युलंटस! माझ्या गॅलरीत हे दोन्ही छोटे आणि मोठे प्रकार गुण्यागोविदाने नांदतात. त्यामुळे आई-बाबा कसे मनापासून बागकाम करायचे, ते आठवतं. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये आनंद घेणं हा आमच्या कुटुंबाचा स्थायिभाव माझा बाबा डॉ. अनिल अवचट, हा नुसता लेखक नसून, एक हरहुन्नरी माणूस आहे. खूप सरळ मनाचा माणूस आहे. ‘बाबा’ हा शब्द जरी उच्चारला, तरी मनात मायेची ऊब पसरते. खूप सुरक्षित वाटायला लागतं आणि आपण कितीही अडचणींमधून जात असलो, तरी नुसत्या बाबाच्या आठवणीनेसुद्धा आयुष्य खूप साधं, सरळ आणि सोपं वाटू लागतं. बाबाशी दोन मिनिटं फोनवर बोललं, त्याच्याशी आपल्या अडचणींविषयी आपण बोललो नाही, तरीही मनातले ताण आपोआप दूर होतात. त्याच्यासारखेच आपण सरळ विचार करू लागतो. कारण बाबा कितीही प्रसिद्ध असला, तरी स्वत:भोवती कुठलीही वलयं घेऊन न वावरता, एक छान मोकळाढाकळा, सगळ्यांशी अतिशय सरळ सोपं वागणारा माणूस आहे.

मी आणि माझी थोरली बहीण मुक्ता(पुणतांबेकर), आमचं बालपण खूप सुंदर गेलं. कारण ते इतरांपेक्षा खूप वेगळं होतं आणि परिस्थिती अगदी बेताची असूनदेखील घरात खूप सकारात्मक आणि आनंदी वातावरण होतं. आई, डॉ. अनिता अवचट, ही मानसोपचार तज्ज्ञ होती. पुण्यातल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ पदावर काम करायची. त्यामुळे आई दुपारी भेटायची; पण बाबा लेखक आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं, तर हाऊस हजबंड! म्हणजे तो घर सांभाळायचा आणि आम्हा दोघींना सांभाळायचा, पण तरी ‘सांभाळायचा’, असं म्हणताच येणार नाही. कारण तो आमच्यात मिसळून खेळायचा. त्यामुळे तो आम्हाला सांभाळतोय, असं वाटायचंच नाही. अनेकदा आम्ही दोघी आमच्या आम्ही खेळत असायचो आणि बाबा टेबलावर सतत लिहीत बसलेला असायचा. आम्ही दंगा जरी केला, तरी त्याच्या लिहिण्यात जराही खंड पडायचा नाही. तो मधे मधे उठून, आमच्याशी थोडं खेळून परत लिहायला बसायचा. असं बाबाचं घरी असणं आणि त्याला आम्ही ‘ए बाबा’ म्हणणं, हे त्या काळी खूप वेगळं होतं; पण तरीही मला त्याची रोजची सवय झाली असल्याने मी ते गृहीत धरायचे.

कधी कधी ताई आणि मी बाबाला जाऊन विचारायचो, ‘‘तू काय लिहितोस बाबा?’’ (बाबा सांगतो, की आम्ही तेव्हा ‘लिवतोस’ म्हणायचो). मग बाबा सांगायचा की, तो कुठल्या खेडय़ात जाऊन आला, त्याला कोणती माणसं भेटली, त्याने तिथे काय अडचणी पहिल्या वगैरे. आम्ही हळहळायचो. ‘‘असं असतं बाबा?’’ असं विचारायचो. आम्ही अगदी पहिली-दुसरीत होतो, तरी बाबा आम्हाला त्याच्या लेखांबद्दल खरंखुरं सांगायचा, ही फार वेगळी गोष्ट होती!

एखाद्या दिवशी बाबा लिहीत नसला, की आम्हा दोघींना व्हेस्पा स्कूटरने कुठे कुठे फिरवून आणायचा. जवळच असलेल्या मुळा नदीवर, बागेत वगैरे. आम्ही येरवडय़ाला गावाबाहेर राहायचो. त्यामुळे तिथे खूप मोठमोठी जाड बुंध्यांची झाडं होती. एक खूप जाड खोड असलेलं झाड, आधी थोडं सरळ वाढून मग आडवं झालं होतं. त्या आडव्या बुंध्यावर आम्ही तिघे बसून गप्पा मारायचो. त्या झाडाचं नाव आम्ही ‘राजेश खन्ना’ ठेवलं होतं आणि त्याच्या शेजारी एक सरळसोट उंचच्या उंच झाड होतं, त्याचं नाव आम्ही ‘अमिताभ’ ठेवलं होतं. आम्ही अनेकदा हिरवळीवर चपला न घालता फिरायचो. आंबट चुका खायचो. बाबा आम्हाला वेगवेगळी झाडं आणि पानांचे आकार दाखवायचा.

आईबाबांनी जाणीवपूर्वक ताईला आणि मला जवळच्या झोपडपट्टीतल्या कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं होतं. आम्ही दोघी सोडून, शाळेतले सगळे विद्यार्थी झोपडपट्टीत राहणारे. माझी पहिलीपासूनची मत्रीण नीतू आणि ताईची मत्रीण आरती. नीतूचे वडील ‘मेंटल हॉस्पिटल’मध्ये कर्मचारी होते. पहिलीतल्या नीतूवर घरातली भांडी घासायची जबाबदारी असायची. त्यांच्या दोन खोल्यांच्या छोटय़ा घरात अनेक जण राहायचे. शेजारीच सार्वजनिक शौचालय. आईबाबांनी आम्हाला कॉर्पोरेशनच्या शाळेत घातल्यामुळे खराखुरा समाज आम्ही लहानपणापासून पाहिला. गरिबी म्हणजे काय, हे आम्हाला कधी वेगळं सांगावंच लागलं नाही.

एखाद्या वर्षी धोधो पाऊस झाला की झोपडपट्टीत पाणी शिरायचं. मग सगळी वसाहत आठवडाभर आमच्या शाळेत राहायला यायची. शाळा बंद. मग बाबा आम्हाला ते दाखवायला घेऊन जायचा. झोपडपट्टीत शिरलेलं पाणी, शाळेत राहणाऱ्या आणि तात्पुरत्या चुली मांडलेल्या आमच्या मत्रिणी वगैरे. हे सगळं बघून आम्ही घरी यायचो, तेव्हा मी खूप विचार करत बसायचे. आपलं सुरक्षित घर, वेगवेगळ्या खोल्या, दिवे, पंखे, बाथरूम या सगळ्याचं महत्त्व न सांगताच समजायचं. या गोष्टी पाहून आल्यावर कधी कधी मला रडूदेखील यायचं.

तसंच एकदा दुष्काळ पडला होता, तेव्हा आम्ही मे महिन्यात बाबाबरोबर ओतूरला गेलो होतो. एरवी खळाळून वाहणारी मांडवी नदी तेव्हा पूर्ण कोरडी झाली होती. एरवी आम्ही नदीकिनारी बसून नदीचं सौंदर्य पाहायचो, पाण्यात खेळायचो; पण दुष्काळ होता तेव्हा आम्ही तिघंही शांतपणे त्या कोरडय़ा पात्रातून चालत गेल्याचं आठवतं.

आईबाबांनी आम्हाला कधीही ‘हे चांगलं, ते वाईट’ किंवा ‘गरिबी म्हणजे काय, दुष्काळ म्हणजे काय’ हे घरी बसून सांगून उपदेशाचे डोस पाजले नाहीत. तर त्या गोष्टी सहजतेने दाखवल्या, अनुभवायला शिकवलं आणि त्यामुळेच आम्ही वास्तव जगत गेलो. कधीही कसलाही हट्ट केला नाही. उलट ताई आणि मी आमच्या गोष्टी इतरांना देत राहिलो. दोघीही लहानपणापासून संवेदनशील. या गोष्टी अनुभवल्यामुळे ती संवेदनशीलता अजूनच वाढत गेली.
बाबाचं लेखक असणं, ही गोष्ट मी खूप गृहीत धरत असे; पण त्याच्या नावे राज्य शासनाचे आणि इतरही अनेक पुरस्कार जाहीर होऊ लागले आणि त्या पुरस्कार प्रदान समारंभांना आम्ही चौघंही जाऊ लागलो, तेव्हा जाणवायला लागलं, की आपला बाबा वेगळा आहे. तेव्हा जाणवलं, की इतर ‘अहो बाबा’ नोकऱ्या करतात, चांगले कपडे घालून रोज ऑफिसला जातात, घरातल्यांना त्यांचा धाक असतो; तसा आपला बाबा मुळीचच नाही. तो खूप वेगळा आहे. तो लेखक आहे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाची दखल घेतली जात आहे. आणि तरी तो रोज आपल्याशी खेळतोय.

गंमत म्हणजे, बाबाची पुस्तकं मी खूप उशिरा, म्हणजे सहावी-सातवीत गेल्यावर वाचायला लागले. त्यानेही कधी आग्रह केला नाही. पण जेव्हा वाचू लागले, तेव्हा झपाटूनच गेले. आपला बाबा इतका चांगला लेखक आहे, हा साक्षात्कारच झाला जसा! बाबाचा लेखनप्रवास आम्ही मुलींनी अगदी जवळून पाहिला. त्याच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्याचं पहिलं पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध झालं. त्यानंतर लगेच ‘वेध’ पुस्तक. तेव्हापासून बाबाला लिहिण्याची जी ‘शोधक पत्रकार’ नस सापडली, ती खास ‘अवचट शैली’ म्हणून रुळूनच गेली. बाबाचे सगळे लेख जरी सहज भाषेत लिहिले असले, कोणताही अभिनिवेश न आणता लिहिले असले, तरीही त्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले आहेत हे जाणवतं. एखाद्या साध्या घटनेविषयी लिहिताना बाबा फक्त ती घडलेली घटना लिहून थांबत नाही, तर त्याच्याशी संबंधित अनेकांना भेटतो, त्यांच्या मुलाखती घेतो. शिवाय मुलाखतीत उल्लेख झालेल्या स्थळांनाही भेट देऊन येतो. याचं उदाहरण म्हणजे, ‘माणसं’ पुस्तकात उस्मानाबादला दुष्काळ पडल्याने तिथले अनेक गरीब शेतकरी आणि मजूर पुण्यास स्थलांतरित झाले आणि पुणे स्टेशनवर राहू लागले. त्यांच्याबद्दल कुतूहल वाटल्याने बाबा रोज त्यांना स्टेशनवर जाऊन भेटू लागला. पुण्यातील इतर भागांतील स्थलांतरितांच्या वस्त्यांनाही भेट देऊ लागला. यानंतर तो स्वत: एसटीने उस्मानाबादला जाऊन तिथला दाहक दुष्काळ पाहून आला, अनुभवून आला आणि मगच त्याने हा लेख लिहिला. हे सगळं त्याने स्वयंप्रेरणेने केलं. कुठली ‘असाइनमेंट’ म्हणून नाही. हे तर नुसतं एका लेखाचं उदाहरण आहे. त्याने असे शेकडो लेख लिहिले आणि त्यामुळेच त्याच्या लेखनात एक सच्चाई आणि प्रामाणिकपणा सतत दिसत राहिला.

आमच्या घरी लेखक मंडळींची ये-जा कायमच असायची. खूप प्रसिद्ध लेखक येऊन जायचे. बाबा आमची ओळख करून द्यायचा. मी त्यांना सांगायचे की, आम्हाला मराठीच्या पुस्तकात तुमचा अमुकतमुक धडा आहे, वगैरे. (माझा बिनधास्त स्वभाव तेव्हा जगप्रसिद्ध होता.) मी विचारायचे, या धडय़ाखाली प्रश्न आहे, की यातून लेखकाला काय म्हणायचे आहे? (बाबा आणि ते लेखक हसू लागायचे!) काही लेखक गडबडून म्हणायचे, मला काही नाही बुवा म्हणायचं! काही लेखक सारांशाने सांगायचेसुद्धा! अशा चर्चामुळे मराठी विषय खूप आवडायचा. बाबाने माझा फक्त मराठीचा अभ्यास घेतला. तोही खूप गोडीगुलाबीने घेतला. त्यामुळे मराठी व्याकरण लहानपणापासून आवडू लागलं. शिवाय निबंध लिहिण्याबद्दल बाबाने सांगितलं, की जे खरंखुरं मनापासून वाटतं, तेच लिहायचं. भाषा साधी सोपी वापरायची. लिहिण्याआधी मुद्दे काढायचे. या गोष्टी मी पाळायचे, तेव्हा निबंध लिहिणं सोपं जायचं. नंतर तर लिहिणं ही आवडच बनली!

लिहिणं ही माझी इतकी आवड बनली, की ती नुसती आवड न राहता जगण्याचा अविभाज्य भाग बनून गेली. साधी सोपी भाषा वापरणं आणि मोकळ्या मनाने लिहिणं, हा माझ्या लिहिण्यावरचा बाबाचा प्रभाव. बाबाचं लिखाण, हा त्या काळच्या आणि आजच्याही अनेक नवोदित लेखक पत्रकारांसाठी ‘टìनग पॉइंट’ ठरला. या प्रभावाचे खूप सारे फायदे झाले आणि थोडे तोटेही झाले! फायदे म्हणजे, बाबाच्या सोप्या भाषेने, आणि रिपोर्ताज पत्रकारितेने नव्या पिढीला लिखाण सोपे वाटू लागले. त्याआधी जड आणि क्लिष्ट भाषा वापरायची पद्धत होती आणि मोकळेपणाने लिहायची पद्धत नव्हती. बाबाचे लिखाण वाचून आमच्या पिढीतले अनेक जण लिहिते झाले. हा मोठा फायदा आणि तोटा म्हणायला गेलं, तर त्याची मुलगी असणं! कारण पंधरा वर्षांपूर्वी मी लिहू लागले, माझे लेख दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले, तेव्हा एखादा लेख आवडला की, वाचक पत्र लिहून विचारायचे, ‘तुम्हाला लेख अनिल अवचटांनी लिहून दिला आहे का?’ मला एवढं वाईट वाटायचं आणि रागही यायचा; तेव्हा बाबा हसून म्हणायचा, की तू हे ‘कॉम्पलिमेन्ट’ समजून लिहीत रहा! नंतर नंतर माझी मला लिहिण्याची दिशा मिळत गेली व हे प्रश्न बंद झाले.

घरी लेखक मंडळींपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांचा वावर जास्त असायचा. आमच्या घराच्या दाराला कधीच कडी नसायची. दिवसा दार सताड उघडं आणि रात्री लोटलेलं. हॉलमध्ये कायम एक जास्तीचं उशी-पांघरूण ठेवलेलं. किती तरी कार्यकत्रे रात्री आमचं दार लोटून आत यायचे आणि हॉलमध्ये झोपायचे. ते सकाळी उठल्यावर समजायचं. अनेक प्रसिद्ध व अप्रसिद्ध कार्यकत्रे असायचे. बाबाशी त्यांच्या होणाऱ्या चर्चा आणि ते कानावर पडल्याने माझ्या मनात सुरू होणारं विचारचक्र. ते कार्यकत्रे गेल्यावर कधीकधी मी बाबाला त्याविषयी शंकासुद्धा विचारायचे. त्यामुळेच सामाजिक कार्याविषयी माझ्या मनात खूप आधीपासूनच आस्था निर्माण होऊ लागली.

आईबाबाच्या पाठिंब्याने, ताई आणि मी साधारण सातवी-आठवीत असताना आम्ही ‘प्रयत्न’ नावाचा ग्रुप सुरू केला. दर रविवारी आम्ही दोघी व आमच्या मित्रमत्रिणी पुण्यातल्या ‘सेवाग्राम’ अनाथाश्रमात लहान मुलांचा अभ्यास घ्यायला किंवा कधी त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायला जायचो. त्या वयात आम्हाला अनाथाश्रमातले प्रश्न व दाहकता दिसत गेली.

बाबा म्हणजे खूप साऱ्या कलांमध्ये पारंगत. सतत काही ना काही करत राहण्याचा त्याचा अस्वस्थ स्वभाव. चित्र काढणे, गाणे म्हणणे, पेटी वाजवणे, बासरी वाजवणे, लाकूडकाम, ओरिगामी असे अनेक त्याचे छंद! चित्रं काढायची त्याची एखादी थीम सुरू व्हायची. मोराची चित्रं, झाडाची चित्रं वगैरे. या सगळ्याच कलांमध्ये तो आम्हालाही प्रोत्साहन द्यायचा; पण सक्ती नाही करायचा. लहानपणापासून आजतागायत, मला चित्र काढत बसलेला बाबा बघायला खूप आवडतं. त्याचं एका प्रकारचं चित्रं काढणं सुरू झालं, की ते महिनोंमहिने चालतं. अगदी त्या प्रकारात सगळे प्रयोगही होतात. आमच्या लहानपणी बाबा मोराची चित्रं काढायचा. त्यात त्याने असंख्य चित्रं काढली असतील. एखादं चित्र काढून दुसऱ्याला सहज भेटसुद्धा द्यायचा. तीच चित्रं आमच्या, आईच्या कुडत्यावर यायची आणि आई त्यावर भरतकाम करायची. हे मोराचं फक्त एक उदाहरण. त्यानंतर त्याच्या गाई, म्हशी, चेहरे, प्रेमी युगुलं, झाडं अशा किती तरी फेजेस झाल्या, त्यावर प्रयोग झाले. मुख्य म्हणजे हे सगळं तो स्वानंदासाठी करत राहिला. चित्र तर मी नेहमीच काढायचे, पण शास्त्रीय संगीताची ओळखसुद्धा मला बाबाच्याच गायन-वादनाने आपोआप होत गेली. मी गाण्याचा क्लास सुरू करण्याच्या आधीच अनेक राग ओळखू लागले होते, ते बाबाने खूप सोप्या पद्धतीने शिकवल्यामुळेच!

बाबावर आजीचा प्रभाव होता. बाबामधली कला ही आजीच्या माहेरून आली. आजी स्वत: उत्तम कलाकार. तिच्या पिढीत तिला कलाकार होण्यासाठी काही वावच नव्हता. पण तिची कला दिसली ती रोजच्या जगण्यातून, मोठमोठय़ा रांगोळ्यांमधून. आकर्षक रीतीने रोजच्या पोळ्या डब्यात मांडण्यावरून. आजीनेच बाबाला शिकवलं, की कला ही स्वानंदासाठी असते. तसेच आजीचा एक साध्या तऱ्हेने ‘गोष्टी सांगण्याचा’ स्वभाव. आम्ही नातवंडं आणि तिची मुलं, कोणत्याही विषयावर गप्पा मारत असलो तरी आजीचा त्यात छान सहभाग असायचाच. याचं कारण म्हणजे तिची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि चौफेर वाचन! रोज सगळी वृत्तपत्रं, मासिकं, इत्थंभूत वाचणं आणि चौफेर पुस्तकवाचन करणं, यामुळेच ती कशाहीविषयी गप्पा मारू शकायची. आईच्या मृत्यूनंतर आजी पुण्याला बाबाबरोबर राहायला आली, ती शेवटपर्यंत, म्हणजेच नंतरची वीस र्वष राहिली. त्या दोघांचं मायलेकरांचं सुंदर नातं अगदी पाहत राहण्यासारखं!

बाबाकडून शिकलेली एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहृदयता. तो कधीच कुणाविषयी मनात रागराग करत बसला नाही की कुढत बसला नाही. शक्य असेल तिथे दुसऱ्याला पटकन माफ करून गोष्ट विसरून गेला किंवा ज्या व्यक्तीशी तितकंसं जुळत नाही, त्या व्यक्तीपासून दूर झाला आणि तेही मनात अढी न ठेवता! त्याच्या बाबतीत घडलेल्या अशा घटना जवळून पाहिल्याने अनेकदा मनात येऊन गेलं, की प्रसिद्ध लेखक असण्यापेक्षा एक सहृदयी माणूस असणं किती महत्त्वाचं!

लहानपणी मला अचानक एपिलेप्सीच्या फिट्स सुरू झाल्या, तेव्हा बाबा खूप कळवळायचा. तो काही बोलला नाही तरी मला ते कळायचं, की त्याला वाईट वाटतंय. आम्ही मुली म्हणजे त्याचा हळवा कोपरा! मी त्या फिट्सचं फारसं काही वाटून घ्यायचे नाही, त्यामुळे कधीकधी मीच त्याला समजावायचे. मला महिन्याला दहा-बारा फिट्स यायच्या, तरी आईबाबांनी मला अतिशय सकारात्मकतेने वाढवलं. अगदी नॉर्मल मुलीसारखं वाढवलं. किंबहुना, त्यापेक्षा जास्त. मी सायकलने शाळेत जायचे यायचे; पण बाबाला मनात माझी काळजी वाटायची म्हणून तो कधीकधी स्कूटरने हळूहळू माझ्यामागे यायचा! आईबाबा तेव्हा मला, ‘तुला एपिलेप्सीमुळे काय करता येत नाही, त्यापेक्षा काय करता येतंय त्यावर लक्ष दे,’ हे नेहमी सांगायचे. शिवाय बाबा नेहमी सांगायचा, ‘आपल्यावर आलेल्या संकटाला संधी समजून त्याचं सोनं करावं!’ – आईबाबांचा हा प्रभाव मला पुढे एपिलेप्सी क्षेत्रात मोठी संस्था उभारायला खूपच मोलाचा ठरला.

आईबाबांचं सुंदर नातं, हा माझा अत्यंत आवडता विषय. लहानपणापासून आम्ही त्यांचं हृद्य नातं, एकमेकांच्या मताचा राखलेला मान, आणि एकमेकांना दिलेली पुरेशी ‘स्पेस’ हे जवळून बघत आलो. आईला जेव्हा कर्करोग झाला, तेव्हा बाबा सगळं सोडून तिच्या बरोबरीने उभा राहिला. बाबाने जी काही आईची सुंदर काळजी घेतली, त्याला कसलीच तोड नाही! आईचा आजार हा फक्त आमच्या कुटुंबासाठी नव्हे, तर जोडलेल्या शेकडो कुटुंबांसाठीसुद्धा धक्का होता. पण आमच्या घरातली आईबाबांनी निर्माण केलेली सकारात्मकता कामी आली. आईने कुठलंही काम कमी न करता त्या काळातच बाबाच्या मदतीने ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र’ उभं केलं. माझी ताई मुक्ता ही आईसारखीच ‘स्कॉलर’. पुणे विद्यापीठातून क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एम.ए. करताना विद्यापीठात पहिली आली, आणि ‘चान्सेलर्स गोल्ड मेडल’पण मिळवलं. त्यानंतर ताई आईबरोबर मुक्तांगणमध्ये काम करू लागली. पाच र्वष आईबरोबर काम करून ती आईच्या हाताखाली छान तयार झाली होती. १९९७ मध्ये जेव्हा आई हे जग सोडून गेली, तेव्हा ‘मुक्तांगण’चं रोपटं चांगलं वाढून त्याचा डेरेदार वृक्ष बनला होता. आईनंतर मुक्ताने बाबा आणि ‘मुक्तांगण’च्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर मुक्तांगणची धुरा चांगलीच पेलली आणि खूप बाजूंनी कामात प्रगतीसुद्धा केली.

आईचं सोडून जाणं बाबा कसं पचवेल, असं अनेकांना वाटलं होतं. पण बाबा त्यानंतर त्याचे तो सकारात्मक मार्ग काढत गेला. त्याने जोडलेली माणसं, त्याच्या कला आणि मुक्तांगणचे कुटुंब, याची त्याला मदत झाली. आणि मुक्तालाही ‘मुक्तांगण’चा अनुभव असल्याने त्याचा संस्थेच्या पुढच्या प्रवासाला खूपच उपयोग झाला. बाबा लवकर सावरला. आईच्या छान आठवणींत राहिला.

आई गेल्यावर, एपिलेप्सीमधून पूर्ण बरी झाल्यावर, मी जेव्हा ‘संवेदना फाऊंडेशन’ ही एपिलेप्सी असलेल्यांसाठी संस्था काढायची ठरवली, तेव्हा माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या दोन भक्कम व्यक्ती म्हणजे – माझा नवरा पराग आणि अर्थातच बाबा! क्षणोक्षणी त्यांचा मानसिक आणि आíथक पाठिंबा मिळत गेला. दुसरं म्हणजे लहानपणापासून आईबाबांचं जे सामाजिक काम पाहत आले त्यात पूर्ण रुजलेली मुळं कामी आली. गेली पंधरा वर्षे एपिलेप्सी क्षेत्रात अव्याहतपणे काम करत असलेली आमची संस्था एका महान वटवृक्षाला मानते; तो वृक्ष म्हणजे- अनिल अवचट!

(मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)