दिलीप ठाकूर

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटाचा गुजराती भाषेत रिमेक झाल्यावर आता दिग्दर्शक कृष्णा वामसी याच चित्रपटाची तेलुगू भाषेत रिमेक करताहेत ही बातमी एव्हाना तुम्हालाही माहितीये आणि कसदार कलाकृतीचा असा प्रवास इतर भाषांमधून होत असल्याचा तुम्हाला आनंदही झाला असेलच.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ची (२०१६) झिंगाट क्रेझ असतानाच त्याची प्रथम कन्नड भाषेत आणि मग हिंदीत (‘धडक’ या नावाने) रिमेक आला आणि आता पंजाबी भाषेत रिमेक येतोय. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ची गुजराती भाषेत रिमेक आला.

एखाद्या भाषेतील चित्रपटाचा इतर भाषेत रिमेक अर्थात पुनर्निर्माण ही अधिकृतपणे (म्हणजे रितसर परवानगीने) आणि अनधिकृतपणे (म्हणजे आपण असे काही करतोय यावर अजिबात काही बोलायचेच नाही) अशी जगभरात होणारी गोष्ट आहे. रिमेक, डब आणि सबटायटल्स या चित्रपट माध्यम व व्यवसाय यातील महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे एका भाषेतील चित्रपट अन्य भाषेतील चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचतात. एका अर्थाने, चित्रपटाचा विस्तारवाद होतो आणि ते गरजेचे आहे.

रिमेक या गोष्टीवर भरपूर संदर्भ/माहिती/किस्से सांगता येतील. इतके की, एकाच रशियन  चित्रपटाच्या कॉन्स्पेक्टनुसार बासू चॅटर्जींचा ‘खट्टा मिठ्ठा’ हा खेळकर, तर उमेश मेहराचा ‘हमारे तुम्हारे’ हा गंभीर चित्रपट निर्माण झाला. ‘खट्टा मिठ्ठा’ चुरचुरीत, मार्मिक, मिश्किल आणि अगोदर रिलीज झाल्याने यशस्वी ठरला आणि ‘हमारे तुम्हारे’बद्दलची उत्सुकताच संपली. मॉस्को चित्रपट महोत्सवात मूळ चित्रपट पाहून दोघेही इम्प्रेस झाले आणि मुंबईत आल्यावर आपापल्या कामाला लागले. मराठी चित्रपटाची हिंदी अथवा गुजराती, तमिळ, कन्नड वगैरे भाषेत रिमेक आणि हिंदी अथवा अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची मराठीत रिमेक यावर फोकस टाकताना अनेक गोष्टी सांगता येतील.

चित्रपती व्ही शांताराम यांनी आपल्या दिग्दर्शनात काही चित्रपट एकाच वेळेस मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत निर्माण केले. माणूस (हिंदीत ‘आदमी’), कुंकू (दुनिया न माने), शेजारी (पडोसी) या त्यांच्या चित्रपटांचा खास उल्लेख हवाच. कालांतराने त्यांनी आपला ‘पिंजरा ‘ हा चित्रपट तुफान हिट ठरल्यावर काही काळाने ‘पिंजडा’ या नावाने रिमेक केली. खुद्द दिग्दर्शकच आपल्या चित्रपटाची अन्य भाषेत रिमेक करतो तेव्हा जास्त हितकारक असते. पूर्वी काही पटकथा लेखक मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांत काम करीत तेव्हा काही रिमेक आल्या. राम केळकर यांनी ‘दाम करी काम’ची हिंदीत ‘पैसा पैसा पैसा ‘ या नावाने रिमेक लिहिली. मराठीत सुमती गुप्ते यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा हिंदीत नूतनने साकारली. चांगली आशयघन गोष्ट हिंदी चित्रपटाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी हाच त्यामागचा हेतू होता.

मराठी चित्रपटाची हिंदीत रिमेक झाल्याची उदाहरणे अनेक. त्यातील महत्त्वाची सांगायची तर पाठलाग (मेरा साया), आम्ही जातो आमुच्या गावा (तीन चोर), एकटी (प्यासी आँखे), मुंबईचा जावई (पिया का घर), मधुचंद्र (लव्ह मॅरेज), दोन घडीचा डाव (नॉटी बॉय) इत्यादी इत्यादी..     तर हिंदी चित्रपटाची मराठीत रिमेक झाल्याची काही उदाहरणे द्यायची तर, सीता और गीता (चोरावर मोर), सत्ते पे सत्ता (आम्ही सातपुते), गजब (भुताचा भाऊ), दो फुल (चंगू मंगू), प्यार किये जा (धूम धडाका), खिलौना (खरा वारसदार), मदर इंडिया (अरे संसार संसार), कटी पतंग (अनुराधा) ,  पडोसन (पटली रे पटली) , स्वर्ग नरक (तुझी माझी जमली जोडी) इत्यादी इत्यादी..

दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’वरुन हिंदीत ‘दो हवालदार ‘ आला, तर खुद्द दादांनीच आपल्या या चित्रपटावरुन गुजरातीत ‘चंदू जमादार’चा रिमेक केला. आपल्या आणखीन एक दोन चित्रपटांची त्यांनी गुजरातीत रिमेक केली. तर दादांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताना आपल्या मराठी चित्रपटांचीच हिंदीत रिमेक केला. तेरे मेरे बीच मे (रामराम गंगाराम), अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में (तुमचं आमचं जमलं), आगे की सोच (मुका घ्या मुका) ही त्यांची उदाहरणे. तर सचिन पिळगावकरने गंमत जंमतवरुन प्रेम दीवाने, महेश कोठारेने ‘माझा छकुला’वरुन ‘मौसम’ हिंदीत पडद्यावर आणला. महेश मांजरेकरनेही ‘काकस्पर्श’चा हिंदीत रिमेक केली असून हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे. तर देवेन्द्र गोयल यांनी आपला ‘आदमी सडक का’ या चित्रपटावरुन मराठीत ‘मित्र असावा असा’ची निर्मिती केली.

विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ हा खणखणीत यशस्वी ठरलेला चित्रपट.. खरं तर ‘माहेरनी चुरनी ‘ या राजस्थानी चित्रपटाची रिमेक आहे. पण ते करताना पटकथा व संवाद लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांनी भरपूर मेलोड्रामा टाकला. इतका की पडद्यावर खाष्ट सासू ( उषा नाडकर्णी) आपल्या सोशिक  सूनेचा ( अलका आठल्ये) छळ करताना ग्रामीण भागातील महिला प्रेक्षकांना हुंदका येई, डोळ्यात पाणी येई. टीकाकाराना हे हास्यास्पद वाटले, पण रिमेक करताना कलाकाराची इमेज आणि त्या भाषेतील चित्रपटाची संस्कृती विचारात घेणे गरजेचे आहे हेच यावरून अधोरेखित होते. याउलट ‘माहेरची साडी ‘वरुन दिग्दर्शक कल्पतरु यांनी हिंदीत ‘साजन का घर’ बनवला पण जुही चावला कोणत्याही अॅन्गेलने सोशिक नायिका वाटलीच नाही. चित्रपटही कमालीचा लॅव्हीश असल्याने गोष्टीतील साधेपण हरवले. तर राजा नवाथे दिग्दर्शित ‘गुमनाम ‘ची मराठीत ‘अशाच एका बेटावर ‘ या नावाने तर अनिझ बज्मी दिग्दर्शित ‘नो एंट्री ‘वरून मराठीत ‘नो एंट्री पुढे धोका आहे ‘ अशा रिमेक आल्या आणि कसलाही प्रभाव न पडता गेल्यादेखील. पहिल्यात क्लायमॅक्सपर्यंत रहस्य चकमा देते, पण मराठीत तो पंच आला नाही आणि प्रत्येक दृश्यानुसार रिमेक केली. नो एन्ट्रीचे यश अगदी ताजे असतानाच त्याच्या रिमेकची घाई का केली हे आश्चर्याचे वाटले. पण आजच्या मराठी चित्रपटसृष्टीला कोणी रोखठोक प्रश्न विचारलेले अथवा दोष दाखवून दिल्याचे अजिबात आवडत नाही. चित्रपट फ्लॉप होणे हेच त्यावरचे उत्तर असते. या दोन्ही चित्रपटात सई ताह्मणकरने आकर्षक  बिकिनी रुपात दर्शन घडवल्याने तिची बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल तारका अशी प्रतिमा निर्माण झाली, पण त्याने थिएटरमध्ये गर्दी झाली नाही. सगळे काही यशासाठीच तर करायचे असते तसेच ते रिमेकचेही गणित जमायला हवे.

अधूनमधून कोणी तरी ‘शोले’ची मराठीत रिमेक करण्याची घोषणा करताना ठाकूर बलदेवसिंग, गब्बरसिंग, जय, वीरु, बसंती यांच्या भूमिकेत मराठीत कोण असेल असे जाहीर करतो (खुद्द त्या कलाकारांनाही त्याची माहिती नसते) आणि फिल्म मिडिया त्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ही करते. पुढे काहीच होत नाही अशाने नेमके काय साध्य होते तेच समजत नाही. खुद्द हिंदीत ‘शोले’च्या रिमेक फसल्या तर मग मराठीचे स्वप्न कशाला पाहायचे? ‘शोले’ न पाहिलेला प्रेक्षक मिळणे अवघड अशा वेळी त्याचा तरी रिमेक करुच नये. यशस्वी चित्रपटाची रिमेक करण्यामागची महत्वाची गोष्ट म्हणजे, अगदी तसेच यश आपल्याही चित्रपटाला लाभावे. पण हा हेतू अधेमधेच साध्य होतो. मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ची राजदत्त दिग्दर्शित ‘अरे संसार संसार’ ही रिमेक लोकप्रिय ठरली याचे कारण हा चित्रपट पूर्णपणे मराठी मातीतील घडवला आणि रंजनाने प्रचंड मेहनतीने भूमिका साकारली. नुसतंच आपले एका भाषेतील चित्रपटाची इतर भाषेत रिमेक करुया असे म्हणून ‘चालत’ नाही. इतके हे माध्यम व व्यवसाय सोपा मार्ग  नाही. त्यात पुन्हा आता जग जवळ आल्याने परस्पर रिमेक होत नाहीत, पूर्वी ‘इर्माला ड्यूस ‘ वरुन शम्मी कपूरने ‘मनोरंजन ‘ दिग्दर्शित केला. आज एक तर रिमेकची बातमी मूळ प्रॉडक्शन हाऊसला लागते आणि मग कॉपी राईटचा प्रश्न येतो. त्यापेक्षा रितसर कॉन्ट्रॅक्ट करुन निर्मिती करावी. अर्थात त्यासाठी योग्य किंमत द्यायची तयारी हवी.

काही हुशार पटकथा लेखक आणि दिग्दर्शक चांगल्या कॉन्स्पेप्टच्या शोधात देश विदेशातील अनेक चित्रपट पाहतात (आता तर ऑनलाईन) आणि एखादा चांगला जर्म घेऊन पूर्णपणे वेगळा चित्रपट बनवतात. त्यासाठी प्रतिभा आणि मेहनत लागते. तो थोडा लांबचा रस्ता आहे. तेवढा वेळ नसणारे एकदम हुबेहुब रिमेक करायला जातात. आणि अनेकदा मूळ चित्रपटाचे व्यक्तिमत्व पुसता न आल्याने अपयशी ठरतात.

चित्रपटाच्या जगात अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात, त्यातील काही क्लिक होतात. ‘सैराट’च्या रिमेकला यश मिळाले नाही पण ‘नटसम्राट’ची गुजराती भाषेतील रिमेक लोकप्रिय ठरली असेही घडते. दोन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागताहेत आणि अशानेच रिमेकचा प्रवास कधी यश, कधी अपयश असा चाललाय…आणि यापुढेही तो सुरु राहिल. एका भाषेतील चांगले आणि यशस्वी चित्रपट इतर भाषेतील रसिकांपर्यंत पोहचवायचा तो (आणि डब देखील) चांगला मार्ग आहे.