Women Freedom Fighters in Indian History राणी वेलू ही शिवगंगाईच्या तामिळ राज्याची शूर राणी होती, तिने आपले राज्य ब्रिटिशांकडून परत घेतले आणि मृत्यूपर्यंत राज्य केले. तिला तमिळ लोक वीरमंगाई म्हणून ओळखतात. या राणीने हैदर अलीचे सैन्य, सरंजामदार, मारुथु बंधू, दलित सेनापती आणि थंडावरायण पिल्लई यांच्या पाठिंब्याने ईस्ट इंडिया कंपनीशी लढा दिला होता. आपण या वर्षी स्वातंत्र्याची ७६ वर्षे साजरी करत आहोत, त्यानिमित्ताने अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या शूर राणीचे स्मरण करणे समयोचित ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेलू नचियार यांचा जन्म १७३० साली रामनाथपुरमच्या राजघराण्यात राजा चेल्लामुथू विजयरगुनाथ सेतुपथी आणि राणी सकंदीमुथल यांच्या पोटी झाला होता. आई वडिलांना मुलगा नसल्याने त्यांनी आपल्या मुलीचाच सांभाळ मुलाप्रमाणे केला होता, वेलू नचियार यांना लहानपणापासूनच घोडेस्वारी, वालारी (वालारी हे एक पारंपारिक शस्त्र आहे, जे प्रामुख्याने भारतीय उपखंडातील तमिळ लोक वापरतात. वलारी हे बूमरँग सारखे वापरले जाते. तामिळ लोक प्राचीन युद्धांमध्ये, रानटी जनावरांपासून गुरांचे रक्षण करण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी हे वापरत असतं), सिलांबम (सिलंबम हा भारतीय मार्शल आर्टचा प्रकार आहे जो भारतीय उपखंडातील दक्षिण भारतातील तमिळनाडू येथे उगम पावला. तमिळ संगम साहित्यात या शैलीचा उल्लेख आढळतो.) आणि तिरंदाजीचे उत्तम प्रशिक्षण मिळाले होते. वेलू नचियार यांचे इंग्रजी, फ्रेंच आणि उर्दू भाषेवर चांगले प्रभुत्व होते. वेलू नचियार यांचे वयाच्या १६ व्या वर्षी शिवगंगाईचा राजा मुथुवदुगनंतूर उदयाठेवर यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना वेलाकी नावाची मुलगी होती.

आणखी वाचा: भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?

वेलू नचियार यांचा स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश

इंग्रजांनी शिवगंगाई राज्यावर आक्रमण करून ते राज्य मिळविण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात वेलू नचियार यांचे पती राजा मुथुवदुगनंतूर उदयाठेवर हे कलैयरकोइल येथे १७८० मध्ये मारले गेले, इंग्रजांनी केलेल्या या हल्ल्यात वेलू नचियार आपल्या मुलीसह पळून जाण्यात यशस्वी झाल्या तरी त्यांनी आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा आणि राज्य परत मिळविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी राज्यातून परागंदा झाल्यावर दिंडुगल येथील आपले हितचिंतक आणि मारुथू बंधूं यांच्याकडे आठ वर्षे आश्रय घेतला. दिंडुगल येथील मारुथु बंधू यांनी त्यांना राज्य मिळविण्यासाठी आणि राजाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले. या वर्षांमध्ये, वेलू नचियार यांनी अनेकांशी युती केली यात हैदर अली, वेगवेगळे व्यापारी, टिपू सुलतान यांचा समावेश होता आणि ब्रिटिशांकडून आपले राज्य परत मिळविण्याची योजना त्यांनी आखली.

म्हैसूरच्या सुलतान हैदर अली आणि वेलू नचियार यांची युती

इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात वेलू नचियार यांनी म्हैसूरचा सुलतान हैदर अली याची मदत मागितली, आधी हैदर अली यानी मदत देण्याचे नाकारले होते. कालांतराने त्याने स्वातंत्र्याच्या लढाईत पाठिंबा देण्याचे मान्य केले आणि ब्रिटिशांवर हल्ला करण्यासाठी आवश्यक शस्त्रे दिली. वेलू नचियार यांच्या सैन्यात ५००० पायदळ आणि ५००० घोडदळ होते, वेलू नचियार या ८ वर्षांच्या आपल्या वनवासाच्या कालावधीत इंग्रजांना गोंधळात टाकण्यासाठी सतत आपले तळ बदलत राहिल्या.

आणखी वाचा: स्वातंत्र्य दिन विशेष: कुठे गेले होते स्वतंत्र भारतात स्त्रियांना देण्यात येणारे ‘स्वातंत्र्य’?

मुख्य लढाई

वेलू नचियार यांना मानवी बॉम्बची कल्पना आणि त्याद्वारे आत्मघातकी हल्ला करणाऱ्या पहिल्या व्यक्ती मानले जाते. १७८० साली , जेव्हा वेलू नचियार यांना ब्रिटिशांची दारुगोळा आणि शस्त्रे ठेवण्याची जागा सापडली तेव्हा त्यांनीआत्मघातकी हल्ला केला. त्यांची सेनापती कुयली हिने स्वतःला तेल आणि तुपात भिजवून पेटवून घेतले आणि अखेरीस ब्रिटीशांच्या स्टोअरहाऊसमध्ये ठेवलेला दारूगोळा उडवला. काही दंतकथांनुसार कुयली ही वेलू नचियार यांची दत्तक मुलगी मुलगी होती.

शत्रूंनी आणलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता नवीन सैन्य आणि युतींच्या मदतीने वेलू नचियार यांनी निर्भयपणे पुन्हा शिवगंगाईत प्रवेश केला. ब्रिटीशांना राज्य काबीज करण्यास मदत करणाऱ्या गद्दारांना त्यांनी पकडले आणि ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला. त्यांनी पराक्रमाने ब्रिटीश सैन्याशी लढा दिला आणि राज्य परत घेतले आणि पुन्हा शिवगंगाईची राणी म्हणून त्या विराजमान झाल्या. त्यामुळे नचियार ही इंग्रजांविरुद्ध उठाव करणारी पहिली राणी ठरली.

१७९० मध्ये, शिवगंगाई राज्याचे सिंहासन त्यांची मुलगी वेलाकी हिला वारशाने मिळाले. १७८० मध्ये वेलू नचियार यांनी आपल्या मुलीला राज्याच्या कारभारात मदत करण्यासाठी मारुथु बंधूंना (पेरिया मारुथु आणि चिन्ना मारुथु) अधिकार दिले; परंतु कालांतराने ब्रिटिशांनी त्यांना पकडून फाशीची शिक्षा दिली. काही वर्षांनंतर, २५ डिसेंबर १७९६ रोजी वेलू नचियार यांचे निधन झाले. वेलू नचियार या १७०० च्या उत्तरार्धात प्रशिक्षित महिला सैनिकांची सेना स्थापन करणाऱ्या पहिल्या भारतीय राज्यकर्ती होत्या. महिलांचे भारतीय स्वातंत्र्यात योगदान या इतिहासात वेलू नचियार आणि त्यांच्या सोबत लढणाऱ्या महिलांचे योगदान नेहमीच स्मरणात ठेवले जाईल.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias 77th independence day 2023 freedom fighters in indian women status in freedom struggle of india history women freedom fighter tamil queen velu nachiyar used the first human bomb in the freedom
First published on: 14-08-2023 at 06:30 IST