vaishnavi.karanjkar@loksatta.com

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतातला सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. १२८ पुरस्कार विजेत्यांची भली मोठी यादी समोर आली, पण नजर मात्र त्या ३४ नावांवरच खिळून राहिली. साहित्य, कला, व्यापार, वैद्यकशास्त्र, विज्ञान आणि अभियांत्रिकी…प्रत्येक क्षेत्रामधली ती आकारान्त नावं पाहिली आणि उर अभिमानाने भरून आला आणि काही क्षण मन बरीच वर्षे मागे गेलं.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

१८ वं शतक असेल ते. घरात, उंबऱ्याच्या आत अडकून पडलेल्या बायका. साधी अक्षरओळखही नाही. मग अधिकार आणि हक्कांची जाणीव तर लांबच. चूल आणि मूल या पलीकडे जगच माहित नसलेल्या, आपल्या पदराच्या आड आपली कल्पकता, सृजनशीलता दडवून ठेवणाऱ्या बाईपणाचा तो काळ. कोण होती तेव्हा बाई? काय किंमत होती तिची? स्वतःशीच अनोळखी असलेल्या बाईला आपल्या स्वत्वाची जाणीव करून देणं त्याकाळी किती महत्त्वाचं होतं. पण ही महत्त्वाची जबाबदारी पेलली सावित्रीमाई, ज्योतिबा फुले, राजा राम मोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे यांनी आणि यांच्यासारख्या कित्येकांनी. या थोर व्यक्तिमत्त्वांनी आपली आयुष्य झिजवली आणि बाईला स्वत्वाची जाणीव करून दिली.

स्त्री ते पद्म’स्त्री’पर्यंतचा प्रवास…

दोन शतकं लोटली, काळ भराभर बदलला. चूल आणि मूल इतकंच जग असलेल्या बायका स्वयंपाकघरातून पडवीत, पडवीतून उंबऱ्यावर आणि उंबऱ्यावरून अंगणात आल्या. तिथून त्यांनी जी झेप घेतली ती थेट गगनाला भिडण्यासाठीच. आता माघार नाही. आपल्या अंगी असलेल्या नवनिर्मितीच्या आणि सृजनशीलतेच्या बळावर बाईने घेतलेली भरारी उल्लेखनीय ठरते. पुरुषसत्ताकाच्या बेड्या तोडून, समानतेच्या वाटेवर प्रवास करत असताना तिला अनेक अडथळे आले पण तिने खचून न जाता फक्त सत्याची आणि स्वाभिमानाची कास धरली.

बाईपणाच्या या गौरवशाली प्रवासाची आठवण करून देण्याचं एकमेव कारण म्हणजे यंदाचे पद्म पुरस्कार. यंदा १२८ पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. सामाजिक कार्य, साहित्य व शिक्षण, कला, उद्योग व व्यापार, क्रीडा, विज्ञान व अभियांत्रिकी अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. यातल्याच काही नवदुर्गांच्या कर्तृत्वाचा इथं उल्लेख करणं भाग आहे.

…पण हार मानेल ती बाई कसली!

गुजरातमधल्या रमिलाबेन गमित. चारचौघींसारखीच घरसंसारात रमलेली ४०-४५ वर्षांची सामान्य बाई. उघड्यावर शौच करणं किती लाजिरवाणं आहे, याची जाणीव झाली आणि तिनं आपल्यासारख्याच इतर बायकांनाही या गोष्टीची जाणीव करून दिली आणि गावाला हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला. स्वतः शौचालय उभारणीचं प्रशिक्षण घेतलं आणि एक शौचालयही उभारलं. आपल्या इतर मैत्रिणींनाही शौचालय उभारणीसाठी प्रेरणा दिली. पण मार्ग कठीण होता. डोंगराळ भाग…तिथं बांधकामाचं सामान नेणं कठीण, डोंगरउतारावर बांधकाम करणं कठीण…..पण हार मानेल ती बाई कसली! रमिलाबेननेही कंबर कसली आणि तब्बल ३१२ शौचालयं उभारली. आपलं गाव तर हागणदारी मुक्त केलंच पण त्यासोबतच शेजारपाजारची ९ गावं हागणदारी मुक्त केली. आपल्या सखीशेजारणींना घेऊन तयार केलेल्या गटासोबत त्यांनी आपलं हे काम सुरुच ठेवलं आणि यातून असंख्य जणींना रोजगारही मिळवून दिला.

केरळातली रबिया….वयाच्या १७ व्या वर्षी पोलिओ आजारामुळं दिव्यांगत्व माथी आलं. पदवीचं शिक्षणही अर्धवट सोडावं लागलं, कारण तिला इतर कोणाच्या मदतीशिवाय हलताही येत नव्हतं. त्यामुळे खचून जाऊन घरी रडत बसण्याचा पर्यायही तिच्यापुढे होता. पण हार मानेल ती बाई कसली! रबियाने आता विडा उचलला तो समाजाला साक्षर करण्याचा. केरळ राज्यातला साक्षरतेचा दर सर्वाधिक आहे. त्यासाठी १९९०साली केरळ सरकारने चालवलेल्या राज्य साक्षरता अभियानाचा ती भाग झाली. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना ती शिकवू लागली, अक्षर ओळख करून देऊ लागली. तिच्या वर्गात आज ८ वर्षांपासून ८० वर्षांपर्यंत सर्व वयोगटातले विद्यार्थी आहेत. पुढे रबियाने समाजकार्याचा वसा घेतला आणि गावातल्या अनेक प्रश्नांना ती वाचा फोडू लागली. गावात रस्ते बनवणं, वीज आणणं, टेलिफोन, नळ कनेक्शन आणणं यासाठी ती पुढाकारू घेऊन प्रयत्न करू लागली. पुढे तिने एक स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली. ही संस्था लहान मुलांना शिक्षण देते, लोकांना स्वच्छतेचं, निरोगी आयुष्याचं महत्त्व पटवून देते, महिलांना प्रशिक्षण देते. गावात वाचनालय, लघुउद्योग, शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी विविध उपक्रम राबवण्याचं काम रबियानं केलं.

रबिया आणि रमिलाबेनचं काम तर तुम्ही जाणून घेतलंत. पण आता ज्या योद्ध्याची ओळख आपल्याला होणार आहे त्याची हिंमत आणि इच्छाशक्ती खरोखरच प्रेरणादायी आहे. आपली पुढची स्त्रीशक्ती आहे शकुंतला चौधरी. शकुंतला यांचं वय आहे फक्त १०२ वर्षे. १०२ वर्षांची ही युवती गांधीवादी विचारांची असून सध्या गुवाहाटीमधल्या उलुबरी इथल्या कस्तुरबा आश्रमात सुपरवायझर म्हणून काम करत आहे. १९४७ साली आपलं आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या शकुंतला चौधरी यांनी स्वच्छता, शिक्षण, स्वयंरोजगार, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. शंभरी उलटली तरी अजूनही त्या थांबलेल्या नाहीत. येणाऱ्या पिढ्यांनाही आपल्या विचारांचा वारसा देण्याचं त्यांचं काम आजही सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाकडून देण्यात येणारा वयोश्रेष्ठ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

संघर्षातून मांडलेला स्त्रीवाद…

पद्म पुरस्कार प्राप्त ३४ महिलांपैकी या काही जणींची जीवनकथा आपल्यासमोर आली. बाकीच्यांच्याही वेगळ्या कथा आहेत. प्रत्येकीचा वेगळा संघर्ष आहे. कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान….नाव घेऊ त्या क्षेत्रात आज या महिलांनी आपल्या गौरवशाली कामगिरीची मोहोर उमटवली आहे. पुरुषांना कमी लेखणं हाच स्त्रीवाद आहे असा गैरसमज बाळगणाऱ्यांनी या प्रतिभावान स्त्रीयांच्या आयुष्यावर एक नजर जरूर टाकावी. प्रत्येकीची कथा स्त्रीवादाचा एक वेगळा अर्थ सांगेल. समानतेचं एक नवं जग निर्माण करणं, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ समाजाला पटवून देणं, पुरुषांना कमी लेखून नव्हे तर त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासह संपूर्ण समाजासाठी आपल्यातल्या नवनिर्मिती आणि सृजनशीलता या गुणांचा वापर करणं हाच खरा स्त्रीवाद आहे याची जाणीव तुम्हालाही नक्कीच होईल!